सोमवार, ६ नोव्हेंबर, २०२३

माविममार्फत वेलणकर मंगल कार्यालयात 7 ते 9 नोव्हेंबर कालावधीत दिवाळी मेळावा

सांगली, दि. 6 (जि.मा.का.) : नवतेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्पांतर्गत स्थापित महिला स्वयंसहाय बचत गटातील महिलांनी उत्पादित वस्तू व उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध व्हावी व त्यांच्या मालाची विक्री वाढावी या उद्देशाने महिला आर्थिक विकास महामंडळातर्फे दि. 7 ते 9 नोव्हेंबर 2023 या कालावधीमध्ये तीन दिवशीय दिवाळी मेळावा 2023 आयोजित करण्यात येत आहे. हा मेळावा सकाळी 9 ते रात्री 10 या वेळेत वेलणकर मंगल कार्यालय, राममंदिर-काँग्रेस भवन रोड सांगली येथे संपन्न होत आहे. या मेळाव्याचे उद्घाटन मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्याहस्ते 7 नोव्हेंबर रोजी दुपारी 12 वाजता होणार आहे. या कार्यक्रमास जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी विजयमाला माने-खरात, जिल्हा माहिती अधिकारी संप्रदा बीडकर, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक विश्वास वेताळ, नाबार्डचे उपमहाव्यवस्थापक निलेश चौधरी, पशुसंवर्धन उपायुक्त अजयनाथ थोरे-पाटील, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. किरण पराग हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. या प्रदर्शनात 35 बचत गट सहभाग नोंदविणार असून दिवाळी निमित्त बचत गटातील महिलांनी उत्पादित केलेले दिवाळी फराळ, फराळाचे विविध मसाले, ड्राय फ्रुट्स, कलाकुसरीच्या वस्तू, आकाश कंदील, पणत्या, लाईटच्या माळा, लहान मुलांची खेळणी, अगरबत्ती, सुवासिक अत्तरे, उटणे, ज्वेलरी, लहान मुलांची कपडे, केरसुणी व झाडू, विविध खाद्यपदार्थ इत्यादी वस्तू एका छताखाली मिळणार आहेत. तसेच महिलांच्या कलागुणांना वाव देणारा संगीतमय कार्यक्रमही होणार आहे. सर्व नागरिकांनी दिवाळी मेळाव्याला भेट द्यावी, असे आवाहन महिला आर्थिक विकास महामंडळाचे वरिष्ठ जिल्हा समन्वय अधिकारी कुंदन शिनगारे यांनी केले आहे. 000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा