शुक्रवार, १० नोव्हेंबर, २०२३

मिठाई व इतर अन्न पदार्थांची खरेदी करताना दक्षता घेण्याचे आवाहन

सांगली, दि. 10 (जि.मा.का.) : दिवाळी सणाच्या कालावधीत नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात मिठाई, इतर अन्न पदार्थांची खरेदी केली जाते. या कालावधीत दुग्धजन्य पदार्थांचा मोठ्या प्रमाणात वापर होत असल्याने नागरिकांनी असे अन्न पदार्थ खरेदी करताना योग्य ती दक्षता घ्यावी, असे आवाहन अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त नि. सु. मसारे यांनी केले आहे. मिठाई व इतर अन्न पदार्थ खरेदी करताना व सेवन करताना नागरिकांनी पुढीलप्रमाणे खबरदारी घ्यावी. मिठाई, दुध व दुग्धजन्य पदार्थ खरेदी करताना ती ताजी आहे याची खात्री करून किमान आवश्यकतेनुसार खरेदी करावी. बिलाशिवाय मिठाई, दुध व दुग्धजन्य पदार्थ खरेदी करू नये तसेच दुध व दुग्धजन्य पदार्थ नोंदणीधारक व परवानाधारक व्यावसायिकांकडूनच खरेदी करण्याबाबत आग्रही रहावे. उघडयावरील मिठाई, खवा (मावा) खरेदी करू नये, तसेच फेरिवाल्याकडून खवा (मावा) खरेदी करणे टाळावे. माव्यापासून तयार केलेल्या मिठाईचे सेवन शक्यतो २४ तासांच्या आत करावे, तसेच, त्याची साठवणूक योग्य तापमानास / फ्रिजमध्ये करण्यात यावी. बंगाली व तत्सम मिठाईचे सेवन शक्यतो ८-१० तासांच्या आत करावे. मिठाईवर बुरशी आढळून आल्यास तिचे सेवन न करता ती नष्ट करावी. मिठाई खराब झाल्याची शंका असल्यास अथवा चवीत फरक जाणवला तर त्याचे सेवन न करता मिठाई नष्ट करावी. ग्राहकांना गुणवत्तेविषयी काही तक्रार असल्यास सहायक आयुक्त (अन्न), अन्न व औषध प्रशासन, सांगली यांच्याकडे ०२३३-२६०२२०१ या दूरध्वनीवर तक्रार नोंदवावी. अन्न व्यावसायीकांनी ताजे अन्न पदार्थ विकावेत, मुदतबाह्य किंवा शिळे अन्न पदार्थ विक्री करू नये. दिवाळी कालावधीमध्ये अन्न व औषध प्रशासनाकडून स्वीट मार्ट, तात्पुरते फराळ विक्रेते व इतर अन्न पदार्थ यांच्या तपासण्या व अन्न नमुने घेण्याचे कामकाज सुरु राहणार असल्याचेही श्री. मसारे यांनी कळविले आहे. 00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा