शुक्रवार, ६ सप्टेंबर, २०१९

सांगलीत कृष्णेची पातळी 29.3 फूटावर स्थिर ; कोणतीही धोकादायक स्थिती नाही नागरिकांनी घाबरू नये सतर्कता बाळगावी - जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

सांगली, दि. 6, (जि. मा. का.) : सध्या कोयना धरणातून 41 हजार 514 व वारणा धरणातून 14 हजार 851 क्युसेक विसर्ग सुरु आहे. शुक्रवार, दिनांक 6 सप्टेंबर दुपारी 2 वाजल्यापासून सांगली येथे कृष्णा नदीची पाणी पातळी 29 फूट 3 इंचावर स्थिरावली असून आयर्विन पूलाजवळ असणाऱ्या 40 फूट या इशारा पातळीपेक्षाही सद्याची पाणी पातळी जवळपास 10 फूट कमी आहे. पर्जन्यमान व विसर्ग सध्या प्रमाणेच राहिल्यास पाणी पातळी कमी होईल. कोणतीही धोकादायक स्थिती नाही. नागरिकांनी घाबरू नये. नदीकाठावरील व सखल भागातील नागरिकांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले आहे.
            शुक्रवार, दिनांक 6 सप्टेंबर रोजी सायं 5 वाजेपर्यंत कोयना 42 मि.मी., महाबळेश्वर 21 मि.मी., नवजा 44 मि.मी., वळवण 33 मि.मी., अशी पर्जन्यवृष्टी झाली आहे. कोयना धरण पाणीसाठा 103.30 टी.एम.सी (98 टक्के) इतका झालेला आहे. कोयना धरणाचे दरवाजे 8 फुटांवरुन 4.50 फूट करण्यात आले आहेत. तर  पाण्याचा विसर्ग 70 हजार 404 क्युसेस वरुन 41 हजार 514 क्युसेक्स इतका करण्यात आला आहे. तसेच वारणा धरणातील विसर्ग  14 हजार 851 क्युसेक्स इतका आहे. अलमट्टी धरणातून 1 लाख 74 हजार 812 क्युसेक्स इतका विसर्ग सुरू आहे. आयर्विन पूल येथील पाणीपातळी सध्या 29 फुट 3 इंच इतकी स्थिर असून सध्यस्थितीनुसार विसर्ग राहिल्यास यापुढे ती स्थिर राहील अथवा यामध्ये घट होईल. कृष्णा पूल कराड येथे पाणी पातळी सकाळी 6 वाजता असणारी 24 फूट 10 इंच पाणी पातळी कमी होवून दुपारी 4 वाजेपर्यंत ती 21 फूट 1 इंचावर आली होती. तर भिलवडी येथे दुपारी 12 वाजता 35 फूट 10 इंच असणारी पाणी पातळी कमी होवून दुपारी 4 वाजता 35 फूट 5 इंचावरती आली होती. याचे अवलोकन करता पाणी पात्राबाहेर जाणार नाही.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार सातारा व कोल्हापूर जिल्ह्यात पुढील दोन दिवस अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. त्या अनुषंगाने पाटबंधारे विभाग व जिल्हा प्रशासन यामध्ये समन्वय आहे. आपल्याकडील पाणी पातळीत काही बदल संभवल्यास 24 ते 48 तास आधी नागरिकांना याबाबत सूचित केले जाईल व सुरक्षिततेची आवश्यक खबरदारी घेतली जाईल. सद्यस्थितीत नागरिकांनी घाबरून जाण्याचे कोणतेही कारण नाही. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, केवळ सावधानता व सतर्कता बाळगावी. कोणत्याही आपत्तीमध्ये मदत हवी असल्यास जिल्हाधिकारी कार्यालयात सुरू असणाऱ्या आपत्ती निवारण कक्षाशी ०२३३-२६००५०० किंवा टोल फ्री क्रमांक १०७७ वर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले आहे.
00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा