शनिवार, ४ जुलै, २०२०

जिल्ह्यात लॉकडाऊनचा कोणताही विचार नाही अफवांवर विश्वास ठेवू नका स्वयंशिस्त मात्र पाळा - जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत चौधरी

सांगली दि. ४ (जि.मा.का.) : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात लॉकडाऊन करण्याच्या अफवा काही समाज विघातक प्रवृत्तींकडून पसरविल्या जात आहेत. याची दखल घेऊन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत  चौधरी यांनी जिल्ह्यात पुन्हा लॉकडाऊन करण्याचा सध्या कोणताही विचार नसून याबद्दल प्रशासन स्तरावर कोणतीही चर्चा नाही. प्रशासन सर्व परिस्थितीवर बारकाईने नजर ठेवून आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. विनाकारण पॅनिक होऊ नये. तसेच जीवनावश्यक वस्तूंचा अनावश्यक साठा करू नये, असे सांगितले आहे. लॉकडाऊन वाढविण्याच्या पसरविण्यात येत असणाऱ्या चर्चांवर अफवांवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये तर स्वयंशिस्त मात्र पाळावी. सोशल डिस्टंसिंगचे नियम काटेकोरपणे पाळावेत, वैयक्तिक स्वच्छता राखावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे .
अनलॉकच्या काळात जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत आहे‌. त्याच वेळी कोरोनाच्या प्रादुर्भावाचा धोकाही वाढला आहे. त्यामुळे नागरिकांनी स्वच्छतेचे सर्व नियम काटेकोरपणे पाळावेत. वारंवार आपले हात धुवावेत. डोळे, नाक, तोंड यांना स्पर्श करू नये. मास्कचा वापर अनिवार्यपणे करावा. विनाकारण घराबाहेर पडू नये. ताप, सर्दी, खोकला, डोकेदुखी, अंगदुखी, श्वसनाचा त्रास, मळमळ आदी कोणतीही लक्षणे जाणवल्यास तात्काळ फिवर केंद्रांशी, आरोग्य यंत्रणेशी संपर्क साधावा. मधुमेह, रक्तदाब, हृदयाशी संबंधित, श्वसनाची संबंधित विकार असणाऱ्यांनी, 65 वर्षावरील नागरिक, दहा वर्षाखालील मुले, गरोदर स्त्रिया यांची अधिक काळजी घ्यावी, असे आवाहनही जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले आहे.

00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा