शुक्रवार, २४ जुलै, २०२०

वॉनलेस हॉस्पीटल मिरज, घाटगे मल्टी स्पेशालिटी हॉस्पीटल आणि विवेकानंद हॉस्पीटलमध्ये त्वरित कोविड उपचार सुविधा सुरू करा - जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

सांगली, दि. 24, (जि. मा. का.) : वॉनलेस हॉस्पीटल मिरज, घाटगे मल्टी स्पेशालिटी हॉस्पीटल सांगली आणि विवेकानंद हॉस्पीटल बामणोली मध्ये त्वरित कोविड उपचार सुविधा सुरू करा, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले.
कोविड-19 उपचारासाठी वॉनलेस हॉस्पीटल येथील 100 बेड्स चा सेटअप महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत चालविले जातील. तसेच याच ठिकाणी आणखी 50 बेड्सचा सेटअप सशुल्क असेल. सदर हॉस्पीटलमध्ये रूग्णांना विना अडथळा सुविधा व उपचार मिळावेत यासाठी उपविभागीय अधिकारी मिरज, उपायुक्त महानगरपालिका, असिस्टंट चॅरिटी कमिशनर, मिरज सिव्हील हॉस्पीटलचे डॉ. निरगुंडे, डॉ. सोमनाथ, डॉ. दिक्षीत यांची प्रशासकीय समिती नियुक्त करण्यात आली आहे. महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत असलेले बेड्स व सशुल्क उपचारांसाठी राखीव असणारे बेड्स या दोन्हींचे नियंत्रण प्रशासकीय समिती मार्फत करण्यात येईल, असेही जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी स्पष्ट केले.
तसेच घाटगे मल्टी स्पेशालिटी हॉस्पीटल, सांगली आणि विवेकानंद हॉस्पीटल बामणोली ही देखील कोविड-19 उपचारासाठी अधिगृहित करण्यात येत असून वरील तीनही हॉस्पीटल्समध्ये त्वरीत कोविड रूग्णांवर उपचार सुरू करावेत, असे निर्देशित करण्यात आले आहे.
कोविड उपचारासाठी अधिगृहित करण्यात येणारी हॉस्पीटल्स ही संबंधित हॉस्पीटलच्या व्यवस्थापनामार्फतच चालविण्यात येतील. आवश्यक तेथे प्रशासकीय यंत्रणा मदत पुरविण्याचा प्रयत्न करेल, असे जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी परखड शब्दात स्पष्ट केले. यावेळी त्यांनी मिरज मेडिकल कॉलेजने अधिगृहित करण्यात येणाऱ्या हॉस्पीटल्सना विस्तृत ट्रेनिंग पुरवावे, असेही त्यांनी यावेळी निर्देशित केले. तसेच संबंधित हॉस्पीटल्सनी त्यांच्याकडील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांची त्वरीत यादी उपलब्ध करून द्यावी, असे सांगून जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी जी हॉस्पीटल सद्या महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेमध्ये सूचिबध्द नाहीत, अशा हॉस्पीटल्समधील जेवढ्या संख्येचे बेड्स कोविड-19 च्या उपचारासाठी अधिगृहित करण्यात येत आहेत तेवढे बेड्‌स महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेत समाविष्ट करण्यात येतील, असे सांगितले.
सांगली जिल्ह्यात कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव व वाढती रूग्ण संख्या पहाता खाजगी हॉस्पीटलमध्ये बेडस्‍ कोविड-19 विषाणू बाधित रूग्णांसाठी उपलब्ध करून घेणे व त्यावर देखरेख ठेवणे याकरिता समिती गठीत करण्यात आली असून सदर समिती विविध रूग्णांलयांना भेटी देवून तेथील उपलब्ध साधन सामग्री व सुविधा याबद्दल अहवाल सादर करते. त्यानुसार जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली निर्णय घेण्यात येतो. आत्तापर्यंत जिल्ह्यातील सेवासदन हॉस्पिटल मिरज, मेहता हॉस्पिटल टिंबर एरिया, सांगली, श्वास हॉस्पिटल गारपीर रोड, सांगली, कुल्लोळी हॉस्पिटल विश्रामबाग, सांगली यांचे अधिग्रहण करण्यात आले असून या ठिकाणी डेडिकेटेड कोविड उपचारांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. अधिगृहित करण्यात आलेल्या रूग्णांलयांमध्ये रूग्णांना आवश्यक सुविधा विना अडथळा मिळाव्या तसेच रूग्णालयातील प्रशासकीय नोंदी व लेखे तपासणी यासाठी प्रशासकीय समिती नियुक्त करण्यात येत आहे.
दरम्यान महानगरपालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी डॉ. शरद घाटगे यांचे घाटगे मल्टी स्पेशालिटी हॉस्पीटल सांगली हे अधिगृहित केले असून या हॉस्पीटलमध्ये शनिवार दि. २५ जुलै पासून कोविड रूग्णांवर उपचार देण्याबाबत आदेश जारी केले आहेत.


000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा