सोमवार, १३ जुलै, २०२०

कराड ते तासगाव राष्ट्रीय महामार्गाचे काम गतीने होण्यासाठी सीमांकन व मोजणीचे काम तातडीने पूर्ण करा - पालकमंत्री जयंत पाटील

सांगली, दि. 13, (जि. मा. का.) : कराड ते तासगाव राष्ट्रीय महामार्ग क्र. 266 चे काम गतीने पूर्ण व्हावे यासाठी सीमांकन व मोजणीचे काम तातडीने पूर्ण करावे. तसेच सीमांकन व मोजणीसाठी यंत्रणांना नागरिकांनीही सहकार्य करावे, असे आवाहन जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कराड-तासगाव एनएच 266 घोगांव ते बांबवडे या रस्त्याच्या कामासंदर्भात संघर्ष समितीच्या प्रतिनिधींसोबत बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, सार्वजनिक बांधकाम विभाग (राष्ट्रीय महामार्ग) चे अधिक्षक अभियंता प्रशांत आवटी व कार्यकारी अभियंता सचिन सागावकर, मिरज उपविभागीय अधिकारी डॉ. समीर शिंगटे, कडेगाव उपविभागीय अधिकारी गणेश मरकड, वाळवा उपविभागीय अधिकारी नागेश पाटील, जिल्हा अधिक्षक भूमी अभिलेख श्री. जाधव आदि उपस्थित होते.
राष्ट्रीय महामार्गाच्या भूसंपादनामध्ये समाविष्ठ मोजणीच्या अनुषंगाने संघर्ष समितीने उपस्थित केलेल्या मुद्यांवर यावेळी चर्चा झाली. सार्वजनिक बांधकाम विभाग (राष्ट्रीय महामार्ग) चे अधिक्षक अभियंता प्रशांत आवटी यांनी राईट ऑफ वे मध्ये असलेल्या जमिनीवरच राष्ट्रीय महामार्गाचे काम केले जाईल आणि सार्वजनिक बांधकाम विभागाकडील लँड प्लॅन नुसार व गावनकाशावर राईट ऑफ वे नुसार रस्ता असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. राईट ऑफ वे खेरीज जादा जमीन घ्यावयाची असल्यास ती मोजणी अंती निश्चित करून अशी जमीन रितसर संपादीत केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. त्यावर पालकमंत्री जयंत पाटील यांनी त्यानुसार लवकर मोजणी पूर्ण करण्याचे निर्देश भूसंपादन संस्था, सार्वजनिक बांधकाम विभागातील राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी व जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख यांना दिले.

00000








कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा