बुधवार, २२ जुलै, २०२०

सांगली जिल्हात नागरी भागात लॉकडाऊन सायंकाळी 7 ते सकाळी 5 पर्यंत संपूर्ण संचारबंदी - जिल्हादंडाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

प्रतिबंध सूट दिलेल्या बाबी जाहीर

सांगली, दि. 22 , (जि. मा. का.) : सांगली जिल्ह्यात कोरोना बाधित रूग्णांची संख्या दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत आहे. तसेच कोराना बाधितांच्या संपर्कात अनेक व्यक्ती येऊन साथीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात फैलावण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोरोनाची संपर्क साखळी खंडित करणे अनिवार्य आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हादंडाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दि. 22 जुलै 2020 रोजी रात्री 10 वाजल्यापासून ते दि. 30 जुलै 2020 रोजीचे रात्री 12 वाजेपर्यंत सांगली जिल्हा स्थलसीमा हद्दीतील नागरी भागात महानगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत स्थलसीमा हद्दीत सायंकाळी 7 वाजल्यापासून ते पहाटे 5 वाजेपर्यंत अंत्यविधी करीता 10 व्यक्ती मर्यादेपर्यंत वैद्यकीय सेवा वगळता संपूर्ण संचारबंदी लागू केली आहे.
वरील कालावधीसाठी पहाटे 05.00 वाजल्यापासून ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत नागरी भागात (महानगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत स्थलसीमा हद्दीत) पुढीलप्रमाणे आदेश दिले आहेत.
 जिल्ह्यातील नागरी भागात पुढील बाबी पूर्णपणे बंद राहतील - सांगली जिल्ह्याबाहेरील जिल्ह्यातील ग्रामीण भागातून सांगली जिल्ह्यातील नागरी भागात येणारे तसेच नागरी भागातून बाहेर जाणारे सर्व प्रवासी वाहने प्रतिबंधित असतील. लग्न, साखरपुडा, मुंज, वाढदिवस इत्यादी कार्यक्रम, सर्व सार्वजनिक   खाजगी प्रवासी वाहने, सर्व किराणा दुकाने, सर्व किरकोळ ठोक विक्रेते, कृषी सेवा केंद्रे, सर्व इतर व्यवसाय करणारे व्यापारी दुकाने इतर सर्व दुकाने आस्थापना बंद राहतील. उपहारगृह, बार, लॉज, हॉटेल्स, रिसोर्ट, मॉल, बाजार, मार्केट, वाईन शॉप, बिअर शॉपी, देशी दारू दुकाने तत्सम आस्थापना, सार्वजनिक ठिकाणी मॉर्निंग ईव्हिनींग वॉक करणे, सर्व केश कर्तनालये, सलुन /स्पा/ब्युटी पार्लर तत्सम आस्थापना, सर्व कृषी उत्पन्न बाजार समिती, बेकरी, किरकोळ ठोक विक्रीची ठिकाणे मोंढा / आडत भाजी मार्केट / फळे विक्रेते / आठवडी दैनिक बाजार / फेरीवाले, मटन, चिकन, अंडी, मासे इत्यादीची विक्री, सर्व प्रकारची खाजगी बांधकाम /कंन्स्ट्रक्शनची कामे (अत्यावश्यक सेवेची बांधकामे उदा. रूग्णालये ज्या बांधकाम ठिकाणी कामगारांची निवासी राहण्याची व्यवस्था आहे, अशी बांधकामे वगळून), सर्व प्रकारच्या खाजगी आस्थापना कार्यालये. जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडील दि. 30 जून 2020 रोजीच्या आदेशान्वये प्रतिबंधित करण्यात आलेल्या पुढील बाबी या आदेशाच्या कालावधीत प्रतिबंधित असतील - सार्वजनिक /खाजगी क्रिडांगणे/मोकळ्या जागा, उद्याने, बगीचे, शाळा, महाविद्यालय, शैक्षणिक संस्था, प्रशिक्षण संस्था सर्व प्रकारचे शिकवणी, सामाजिक/राजकीय/क्रिडा/मनोरंजन/सांस्कृतिक/धार्मिक कार्यक्रम सभा, सर्व चित्रपटगृह, व्यायामशाळा, जलतरण तलाव, करमणूक व्यवसाय, नाट्यगृह, कलाकेंद्र, प्रेक्षागृह, सभागृह, खाजगी सार्वजनिक धार्मिक स्थळांच्या ठिकाणी विधिवत पूजेसाठी असणाऱ्या धर्मगुरू अथवा पुजारी यांना वगळून इतर सर्व नागरिकांना धार्मिक स्थळांना भेटी देणे प्रतिबंधित करण्यात आले आहे. तसेच पुढील सूट देण्यात आलेल्या बाबीव्यतिरिक्त इतर सर्व अस्थापनाही प्रतिबंधित करण्यात आल्य आहेत.

सदर बंदी आदेशातून पुढील बाबींना सुट देण्यात आली आहे -
अत्यावश्यक सेवा आस्थापना - सर्व खाजगी सार्वजनिक वैद्यकीय सेवा, पशूचिकित्सा सेवा, औषध सेवा, हॉस्पीटल संलग्न सेवा देणाऱ्या आस्थापना, रक्तपेढी (Blood Bank),   बँक एटीएम, कॅश रीप्लेनिशिंग एजन्सी (CRA) ची कामे बँकिंग आणि आरबीआय मार्फत नियंत्रित होणाऱ्या इतर सेवा, मा. न्यायालये सर्व राज्य केंद्र सरकारी कार्यालये सुरु राहतील. दैनिक वर्तमानपत्रे, नियतकालिके, यांची छपाई वितरण व्यवस्था तसेच डिजीटल/प्रिंट मिडिया यांची कार्यालये शासकीय नियमानुसार सुरु राहतील. वर्तमानपत्रे वितरण अनुज्ञेय राहील. सर्व वैद्यकीय, परिचारिका, पॅरामेडिकल कर्मचारी, सफाई कर्मचारी ॲम्ब्यूलन्स तसेच अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी यांना वाहतूकीसाठी परवानगी राहील. त्यासाठी वेगळा पास अथवा परवानगी घेण्याची आवश्यकता नाही. पेट्रोल/डिझेल पंप फक्त अत्यावश्यक सेवेतील खाजगी शासकीय वाहने, वैद्यकीय सुविधा पुरवणारी वाहने शासकीय धान्य पुरवठा करणारी वाहने, प्रसारमाध्यमे, वृत्तपत्रे, मिडियाचे कर्मचारी यांची वाहने इत्यादीसाठीच सुरु राहतील. वृध्द आजारी व्यक्तीकरिता नियुक्त केलेले मदतनीस यांच्या सेवा सुरु राहतील. शिवभोजन थाळी योजना सुरु रहील.
 जीवनावश्यक सेवा आस्थापना -  दुध संकलन त्यासंबंधित वाहतूक, किरकोळ दुध विक्री घरपोच दुधाचे वितरण, एलपीजी गॅस घरपोच वितरण करणाऱ्या आस्थापना वाहने, सांडपाणी, घनकचरा व्यवस्थापन पिण्याचे पाणी पुरवठा करणाऱ्या आस्थापना वाहने, दुरध्वनी, इंटरनेट बँक एटीएम संबंधीत आस्थापना, वंदे भारत योजनेंतर्गत तसेच कोविड-19 करिता वापरात असलेले हॉटेल, डॉक्टर्स, स्टाफ, नर्स संस्थात्मक अलगीकरणासाठी घेतलेले हॉटेल, लॉज इतर इमारती, सांगली जिल्ह्यात सुरु असलेले राष्ट्रीय प्रकल्प शासकीय कामे, जलनिःसारण तसेच पूर्वपावसाळी पावसाळ्या दरम्यान करावयाची अत्यावश्यक कामे, वीजपुरवठा, इंधन (डीझेल-पेट्रोल) टँकर, गॅस, उर्जा पुरवठा, सर्व प्रकारची माल वाहतूक सुरू राहील.
    उद्योगधंदे बांधकाम - सर्व उद्योगधंदे सुरु राहतील. सदर उद्योग/ कारखाने / कंपनी मध्ये कामास असणाऱ्या कामगार / कर्मचारी यांना ग्रामीण भागातून नागरी भागात येण्यासाठी नागरी भागातून ग्रामीण भागात जाण्यासाठी परवानगी असणार आहे. अशा कामगार / कर्मचारी यांना सबंधित कंपनीचे मालक / प्रोप्रायटर यांनी त्यांचे कामगार / कर्मचारी यांना वाहन परवाना देणे बंधनकारक असणार आहे. वाहन परवाना देण्यात आलेल्या कामगार / कर्मचारी यांची यादी उद्योग महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र अथवा महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यापैकी ज्यांचे अधिकार क्षेत्रात येते त्यांच्याकडे तसेच स्थानिक पोलीस ठाणे यांच्याकडे सादर करणे बंधनकारक असणार आहे. या आस्थापनेमधील सर्व अधिकारी / कर्मचारी /कामगार यांनी त्यांचे ओळखपत्र सोबत बाळगणे बंधनकारक राहील. या ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्याकरिता सॅनीटायझर, मास्क, सामाजिक अंतर याबाबत योग्य प्रकारे अंमलबजावणी करणे उद्योजकांवर बंधनकारक राहील.
इतर - महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या परिवहन बसेस मार्फत होणारी प्रवासी वाहतूक व्यवस्था संपूर्ण जिल्ह्यात पूर्णपणे बंद राहील. अन्न, औषधी, वैद्यकीय उपकरणे, विद्युत आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणांसह सर्व वस्तू आणि वस्तूंची                   ई-कॉमर्स वितरण सेवा सुरु राहील. कुरिअर सेवा सुरु राहील. ई-पास सुविधेचा वापर करून सांगली जिल्ह्यातील फक्त ग्रामीण भागातच येता येईल. तसेच फक्त ग्रामीण भागातील जनतेसच या कालावधीत ई-पासचा वापर करून बाहेर जाता येईल.
वरील प्रमाणे सूट देण्यात आलेल्या ठिकाणी कामास असलेल्या कामगार, कर्मचारी यांना ग्रामीण भागातून नागरी भागात येण्यासाठी नागरी भागातून ग्रामीण भागात जाण्यासाठी परवानगी असणार आहे. सर्व सूट असणाऱ्या कामगार, कर्मचारी यांना सबंधित आस्थापना प्रमुखांनी ओळखपत्र देणे बंधनकारक असणार आहे. तसेच बंदी आदेशातुन सूट देण्यात आलेल्या काम करणाऱ्या कर्मचाऱ्याकरिता तसेच सर्व सेवा आस्थापनांमध्ये वावरणाऱ्या व्यक्तींनी पूर्ण वेळ सॅनीटायझर, मास्क, सामाजिक अंतर याबाबत योग्य प्रकारे अंमलबजावणी करणे बंधनकारक राहील.
    सांगली जिल्ह्यातील ग्रामीण भागात यापूर्वी शासन निर्देशाप्रमाणे जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून लॉकडाऊन बाबत पारित करण्यात आलेले आदेश अंमलात राहतील.
सांगली जिल्ह्यात वेळोवेळी प्रतिबंधात्मक क्षेत्र (कंटेनमेंट झोन) म्हणून अधिसूचित करण्यात आलेल्या प्रत्येक स्थलसीमा हद्दीत यापूर्वी जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून पारित केलेले सर्व प्रतिबंधात्मक आदेश लागू राहतील.
या आदेशाचे पालन करणाऱ्या कोणतीही व्यक्ती अथवा संस्थेवर भारतीय दंड संहीता 1860 (45) च्या कलम 188, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 साथ रोग नियंत्रण कायद्यातील तरतुदी प्रमाणे फौजदारी कारवाई करण्यात येईल. सदर आदेशाची अंमलबजावणी स्थानिक स्वराज्य संस्थेचे सक्षम अधिकारी, संबंधित विभाग प्रमुख पोलीस विभाग यांनी करावयाची आहे.
सदर आदेशाचा भंग करणाऱ्या व्यक्ती विरुद्ध भारतीय साथ रोग नियंत्रण अधिनियम 1897, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 नुसार गुन्हे दाखल करण्याकामी सांगली जिल्ह्यातील सबंधित पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी / कर्मचारी यांना या आदेशाद्वारे प्राधिकृत करण्यात आले आहे. सदर आदेशाचा कालावधी  संपल्यानंतर शासन निर्देशाप्रमाणे जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून लॉकडाऊन बाबत पारित करणयात आलेले आदेश अंमलात राहतील, असे जिल्हादंडाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी स्पष्ट केले आहे. सदराचा आदेश भारतीय साथ रोग नियंत्रण अधिनियम 1897, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये प्राप्त अधिकारानुसार जिल्हादंडाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी जारी केला आहे.
00000




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा