सोमवार, २० जुलै, २०२०

महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत क्षेत्रामध्ये पुन्हा लॉकडाऊन तर उर्वरित ग्रामीण भागात जनता कर्फ्यू - पालकमंत्री जयंत पाटील

- 22 जुलै रात्री 10 पासून लॉकडाऊन व जनता कर्फ्यूला सुरूवात
-  नागरिकांनी सहकार्य करावे   
   
    सांगली, दि. 20, (जि. मा. का.) : जिल्ह्यातील सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत क्षेत्रामध्ये 22 जुलै रोजीच्या रात्री 10 वाजल्यापासून ते 30 जुलै अखेर लॉकडाऊन ठेवण्यात येईल. या काळात उर्वरित ग्रामीण भागातील जनतेने उत्स्फूर्तपणे स्वयंशिस्तीने जनता कर्फ्यू पाळावा. लॉकडाऊन व जनता कर्फ्यू या दोन्हींमध्ये जनतेने संपूर्ण सहकार्य द्यावे, असे आवाहन  राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी केले.
    जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोनाच्या सद्यस्थितीचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. यावेळी सहकार व कृषि राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, खासदार संजय पाटील, आमदार सुरेश खाडे, आमदार सुधीर गाडगीळ, आमदार अनिल बाबर, आमदार सुमनताई पाटील, आमदार मानसिंगराव नाईक, आमदार विक्रम सावंत, जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, महानगरपालिका आयुक्त नितीन कापडणीस, अप्पर जिल्हाधिकारी गोपीचंद कदम, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर नणंदकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे, निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी चौगुले-बर्डे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भूपाल गिरीगोसावी आदि उपस्थित होते.
    कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत असून आजूबाजूच्या जिल्ह्यांच्या तुलनेत सांगली जिल्ह्यात कोरोना बाधीतांची संख्या मर्यादीत ठेवण्यात यश आले आहे. प्रशासनाने केलेल्या अंमलबजावणीचे व त्यास लोकांनी दिलेल्या सहकार्याचे हे यश आहे, असे सांगून पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, जिल्ह्यातील कोरोना बाधीतांची संख्या यापुढेही मर्यादीत रहावी यासाठी 22 जुलै रोजीच्या रात्री 10 वाजल्यापासून ते 30 जुलै अखेरपर्यंत सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत क्षेत्रामध्ये संपूर्ण लॉकडाऊन व उर्वरित ग्रामीण भागात जनता कर्फ्यू पाळण्याचा निर्णय या बैठकीत सर्वानुमते घेण्यात आला. जनता कर्फ्यूच्या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे नागरिकांनी स्वयंप्रेरणेने पालन करावे. लॉकडाऊन 22 जुलै रात्री 10 नंतर सुरू होणार असल्याने नागरिकांच्या हातात पुरेसा वेळ आहे. त्यामुळे कोणीही अनावश्यक गर्दी करू नये. खरेदीसाठी झुंबड उडू नये, नागरिकांनी गर्दीत जाणे टाळावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
    या बैठकीत जिल्ह्यातील कोरोना सद्यस्थितीचा पालकमंत्री जयंत पाटील यांनी आढावा घेतला. यामध्ये जिल्ह्यात उपचाराखाली 545 रूग्ण असून आजतागायत 1 हजार 13 रूग्ण पॉझिटिव्ह ठरले आहेत तर 33 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. महानगरपालिका क्षेत्रात आजतागायत 332 रूग्ण पॉझिटिव्ह ठरले आहेत. या सर्व बाबींचा अत्यंत सूक्ष्म आढावा घेऊन जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या झालेल्या मृत्यूंची कारणमिमांसा पालकमंत्री जयंत पाटील यांनी जाणून घेतली. यामध्ये अनेक रूग्ण शेवटच्या क्षणी ॲडमिट होतात तसेच कोरोनाच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करतात. उशिरा उपचार सुरू झाल्याने मृत्यू दर वाढण्याचा धोका जास्त संभवत असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी सांगितले. यावेळी पालकमंत्री जयंत पाटील यांनी कोरोना बाधितांपैकी आत्तापर्यंत किती रूग्णांचे सिटी स्कॅन केले, गंभीर रूग्णांवर कोणत्या पध्दतीचे उपचार, त्यांना देण्यात आलेले औषधोपचार याची इत्यंभूत माहिती घेऊन गंभीर रूग्णांची मोठ्या प्रमाणावर काळजी घ्या व जिल्ह्यातील मृत्यू दर वाढणार नाही याची आवश्यक ती सर्व खबरदारी घ्या, असे निर्देश दिले. यावेळी त्यांनी महानगरपालिका क्षेत्रात रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेता कंटेनमेंट झोन एरियात मोठ्या प्रमाणावर रॅपीड ॲन्टीजेन टेस्ट घेण्यात याव्यात असे निर्देशित केले.
    सद्यस्थितीत जिल्ह्यात आरोग्य यंत्रणेकडे असलेल्या सुविधांच्या उपलब्धतेबाबत पालकमंत्री जयंत पाटील यांनी सविस्तर आढावा घेतला. यावेळी महानगरपालिका क्षेत्रात कोविड केअर सेंटर्स मध्ये 870 बेडस् ची व्यवस्था उपलब्ध आहे. यामध्ये सद्या 125 रूग्ण आहेत. तर गा्रमीण भागात इस्लामपूरमध्ये 340 बेडस् त्यामध्ये 8 रूग्ण, विट्यामध्ये 128 बेडस् त्यामध्ये 4 रूग्ण, जतमध्ये 225 बेडस् त्यामध्ये 12 रूग्ण, आटपाडी मध्ये 90 बेडस् त्यामध्ये 15 रूग्ण, पलूसमध्ये 50 बेडस् त्यामध्ये 8 रूग्ण, शिराळा येथे 50 बेडस् त्यामध्ये 4 रूग्ण, कवठेमहांकाळ येथे 25 बेडस् त्यामध्ये 6 रूग्ण, तासगाव येथे 30 बेडस्, चिंचणी येथे 50 बेडस् त्यामध्ये 6 रूग्ण अशी स्थिती असल्याचे यंत्रणेकडून सांगण्यात आले.
    डेडिकेटेड कोविड हॉस्पीटलमध्ये मिरज सिव्हील येथे 315 बेडस् उपलब्ध  असून भारती हॉस्पीटलमध्ये 100 बेडस् ठेवण्यात आले आहेत. तर मिरज मिशन येथे सद्यस्थितीत 90 बेडस् आहेत. या ठिकाणी डीसीएच सुविधा आवश्यकतेनुसार वाढविण्यात येते, असे सांगून महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजनेत संलग्न असणारी 3 खाजगी रूग्णालये सद्या कोविड-19 वरील उपचारासाठी घेण्यात आली असून यापुढेही खाजगी हॉस्पीटल्स कोविड-19 वरील उपचारासाठी घेण्यात येतील, असे जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी सांगितले.
    राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी उपविभागीय अधिकारी व तहसिलदार यांची बैठक घेऊन प्रत्यक्षात क्षेत्रीय स्तरावर येणाऱ्या अडचणींबाबत व्यवहार्य मार्ग काढावेत असे निर्देशित करून कोरोनाची साखळी खंडीत करणे सद्यस्थितीत अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी शहरी व ग्रामीण भागातील सर्व नागरिकांनी सहकार्य द्यावे, असे आवाहन केले.
    खासदार संजय पाटील यांनी कंटेनमेंट झोन मधील लोकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे कंटेनमेंट झोन संबंधित नियमांमध्ये व्यवहार्य बदल करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले.

कोरोनाचे संकट मोठे आहे
खाजगी रूग्णालयांनी संपूर्ण सहकार्य द्यावे - पालकमंत्री जयंत पाटील

    या बैठकीनंतर पालकमंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत सांगली, मिरज येथील इंडियन मेडीकल असोसिएशनचे पदाधिकारी व वैद्यकीय व्यवसायीक यांची प्रशासकीय यंत्रणांसोबत बैठक संपन्न झाली. यामध्ये कोरोना बाधितांची वाढती संख्या लक्षात घेता खाजगी रूग्णालये कोविड-19 रूग्णांच्या उपचारासाठी घेणे क्रमप्राप्त आहे. त्यामुळे सर्व खाजगी व्यवसायिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पालकमंत्री जयंत पाटील यांनी केले. संकट मोठे असताना सर्वांनी मदतीचा दृष्टीकोन ठेवावा, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
    या बैठकीत जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी मेस्मा अंतर्गत नोटीस काढण्यात येणार असून खाजगी वैद्यकीय व्यवसायीकांनी आपल्या सर्व मनुष्यबळाला परिस्थिती समजून सांगावी व सर्वांनीच यामध्ये सहकार्य करावे. डॉक्टर्स व पॅरामेडिकल स्टाफची लिस्ट प्रत्येक हॉस्पीटल्सने प्रशासनाला उपलब्ध करून द्यावी. तसेच सर्व हॉस्पीटल्सनी पाँईंट ऑफ केअरला रॅपीड ॲन्टीजेन टेस्ट सुविधा उपलब्ध करून द्यावी. वैद्यकीय सुविधेची 80 टक्के क्षमता ही खाजगी रूग्णांलयामध्ये आहे. रूग्ण वाढीचा दर पहाता खाजगी हॉस्पीटल्सकडून डीसीएच सुविधा उपलब्ध होणे आवश्यक असल्याचे सांगितले.

00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा