मंगळवार, ७ जुलै, २०२०

प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील निवास व्यवस्था प्रदान करणारी हॉटेल्स, लॉज, गेस्ट हाऊस अटी व शर्तींच्या अधीन राहून 33 टक्के क्षमतेने सुरू करण्यास परवानगी - जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

सांगली, दि. 7, (जि. मा. का.) : महाराष्ट्र शासनाच्या दिनांक 6 जुलै 2020 च्या आदेशानुसार राज्यातील हॉटेल्स आणि इतर आदरातिथ्य सेवा अटी शर्तींचे पालन करून सुरू करण्यास परवानगी दिली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हादंडाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दि. 6 जुलै रोजीच्या शासन निर्देशानुसार सांगली जिल्हा स्थलसीमा हद्दीतील प्रतिबंधित (कंटेनमेंट) क्षेत्राबाहेरील निवास व्यवस्था प्रदान करणारी हॉटेल्स, लॉज, गेस्ट हाऊस या आस्थापना अटी शर्तींच्या अधीन राहून 33 टक्के क्षमतेने सुरू करण्यास परवानगी दिली आहे. तसेच ज्या आस्थापनांचा जिल्हा / स्थानिक प्रशासनाकडून संस्थात्मक विलगीकरणासाठी (इन्स्टिट्युशनल क्वारंटाईन) वापर करण्यात येत आहेत, अशा आस्थापनांचा पुढील आदेशापर्यंत संस्थात्मक विलगीकरणासाठीच वापर करण्यात येईल, असे आदेश जारी केले असून या आदेशाची अंमलबजावणी दिनांक 8 जुलै 2020 रोजीचे 00.01 वाजल्यापासून करण्याचे आदेश जारी केले आहेत.
    जिल्हादंडाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी भारतीय साथ रोग नियंत्रण अधिनियम 1897, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005, महाराष्ट्र शासन क्र. करोना 2020 प्र.क्र. 58/आरोग्य6 दि. 14 मार्च 2020 अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार तसेच महाराष्ट्र शासन महसूल वन, आपत्ती व्यवस्थापन, मदत पुनर्वसन, मंत्रालय यांच्याकडील दि. 6 जुलै 2020 रोजीच्या शासन निर्देशानुसार सदर आदेश निर्गमित केले आहेत.
निवास व्यवस्था प्रदान करणारी हॉटेल्स, लॉज, गेस्ट हाऊस इत्यादींच्यासाठी आवश्यक अटी सेवा शर्ती पुढीलप्रमाणे.
    (अ) सर्व निवासी व्यवस्था प्रदान करणाऱ्या आस्थापना पुढील अतिरिक्त व्यवस्था करतील -  कोविड-19 विषयी प्रतिबंधात्मक उपायांवर पोस्टर्स / स्टँडिज / एव्ही मीडिया (ऑडीओ - व्हीज्युअल) या माध्यमातून मार्गदर्शक तत्त्वे स्पष्टपणे दिसतील अशा पध्दतीने ठळक अक्षरामध्ये दर्शनी भागामध्ये लावावीत. सदर आस्थापनामध्ये त्याच्या बाहेरील आवारात जसे की पार्किंग इतर मोकळ्या जागामध्ये गर्दी होणार नाही यासाठी योग्य ती व्यवस्था करावी. सामाजिक अंतर राखण्यासाठी बैठक व्यवस्थेच्या ठिकाणी तसेच बाहेरील बाजूस रांगांसाठी बसण्याच्या व्यवस्थेसाठी विशिष्ट खुणा सूचनाच्या माध्यमातून व्यवस्था करावी. आस्थापनेच्या प्रवेशव्दारामध्ये थर्मल स्क्रीनिंगची तरतूद करणे. स्वागत कक्ष / ठिकाणी संरक्षक काच बसविणे आवश्यक आहे. अतिथींसाठी पेडल ऑपरेटेड डिस्पेंसर हँड सॅनिटायझर्स / ऑटोमॅटीक सेन्सर असलेले डिस्पेंसर हँड सॅनिटायझर्स, स्वागत कक्ष, अतिथी खोल्या आणि सार्वजनिक जागांवर (लॉबी, पार्कीग इत्यादी) विनामूल्य उपलब्ध करून द्यावीत. फेस कव्हर्स (face cover) / मास्क, ग्लोव्ह्ज इ. वैयक्तिक संरक्षणासाठी निर्धारित केलेली योग्य साधने, आस्थापनेव्दारे अतिथींना कर्मचारी यांना उपलब्ध करुन द्यावीत. संपर्क टाळण्यासाठी आस्थापनांमध्ये चेक-इन, चेक-आउट आणि इतर सर्व सुविधांसाठी क्यूआर कोड, ऑनलाइन फॉर्म, डिजिटल पेमेंट्स, इ-वॉलेट इत्यादी सारख्या प्रणालींचा वापर करावा. सामाजिक अंतराचे योग्य निकष पाळण्यासाठी लिफ्टमधील अतिथींची संख्या मर्यादित ठेवावी. वातानुकूलन संयंत्रणांचे बाबतीमध्ये CPWD (सेंट्रल पब्लिक वर्कस डिपार्टमेंट) यांनी निर्धारित केलेल्या मार्गदर्शक सुचनांचे पालन करावे जसे की, वातानुकूलीत यंत्रांचे तापमान हे 24-30 डिग्री सेल्सिअस या मर्यादेत ठेवावे, सापेक्ष आर्द्रता 40-70 टक्केच्या श्रेणीत असावी, शक्य तितकी हवा खेळती राहील याची व्यवस्था करावी.
    (ब)  अतिथी/ प्रवाशांसाठी - आस्थापनांमध्ये फक्त कोरोना सदृष्य कोणतीही लक्षणे नसलेल्या अतिथींनाच प्रवेश देणे बंधनकारक असेल. आस्थापनांमध्ये केवळ फेस कव्हर (face cover) / मास्क वापरत असलेल्या अतिथींना प्रवेश देणे. तसेच वरील सर्व ठिकाणी फेस कव्हर (face cover) / मास्क नेहमीच परिधान करणे बंधनकारक असेल. स्वागत कक्षाच्या ठिकाणी अतिथीचा / प्रवाशांचा संपूर्ण तपशील जसे की प्रवासाचा इतिहास, वैद्यकीय स्थिती इ., फोटो असलेले ओळखपत्र आणि स्वयंघोषणापत्रासह सर्व माहिती नोंदवही मध्ये नोंदविणे बंधनकारक असेल. अतिथी / प्रवाशांनी आरोग्य सेतु ॲप वापरणे बंधनकारक असेल. अतिथींना आस्थापनांमधील हाऊस कीपिंग (housekeeping) सेवांचा कमीत कमी वापर करण्यास प्रोत्साहित करावे.
   (क) सुविधांचा वापर - रेस्टॉरंटस साठी निर्गमित केलेल्या पुढील तपशीलवार मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे बंधनकारक असेल -    सामाजिक अंतर सुनिश्चित करण्यासाठी आसन व्यवस्थेची पुनर्रचना करावी.मेनू कार्ड ऐवजी ई-मेनू आणि डिस्पोजेबल पेपर, नॅपकिन्स यांचा वापर जास्तीत जास्त करावा. जेवणासाठी एकत्र बसणेएवजी रूम सर्व्हिस (room service) किंवा टेक-अवे (takeaway) यांचा वापर करावा. रेस्टॉरंटस् फक्त निवासी अतिथींसाठी उपलब्ध राहील. आस्थापनांमधील गेमिंग आर्केड / मुले खेळण्याचे क्षेत्र / जलतरण तलाव / व्यायामशाळा (जेथे लागू असेल त्या ठिकाणी) बंद ठेवणे बंधनकारक असेल. आस्थापनांच्या आवारामध्ये मोठी संमेलने / एकत्र येणे हे कायमच निषिद्ध राहील. तथापि, मीटिंग हॉलचा वापर 33 टक्के क्षमतेने, परंतु कमाल 15 व्यक्तींच्या मर्यादेपर्यंत करण्यास परवानगी असेल.
  (ड) साफसफाई, स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण - आस्थापनांमध्ये प्रत्येक वेळी अतिथी / प्रवासी यांनी खोली सोडल्यानंतर त्यांनी वापर केलेल्या खोली आणि इतर सेवा / जागांची स्वच्छता निर्जंतुकीकरण करणे बंधनकारक असेल. अतिथी / प्रवासी / ग्राहक यांचा मुक्काम संपल्यानंतर सदर खोली किमान 24 तास कोणत्याही इतर अतिथी / प्रवासी / ग्राहक यांना देता रिकामी ठेवावी. अतिथी / प्रवासी / ग्राहक यांनी खोली सोडल्यानंतर सर्व प्रकारची कपडे, टॉवेल्स, बेडशीट, पिलो कव्हर बदलणे बंधनकारक असेल. आस्थापनांमधील स्वागत कक्ष, अतिथी खोल्या आणि सार्वजनिक जागांवर (लॉबी, पार्कीग इत्यादी) आवारात प्रभावी आणि वारंवार स्वच्छता निर्जंतुकीकरण करणे प्रामुख्याने शौचालये, स्वच्छतागृहे आणि हात धुण्यासाठी असलेली ठिकाणे / क्षेत्रांवर विशेष लक्ष केंद्रित करणे बंधनकारक असेल. आस्थापनांमधील स्वागत कक्ष, अतिथी खोल्या आणि सार्वजनिक जागांवर (लॉबी, पार्कीग इत्यादी) सर्व अतिथी सेवा क्षेत्रात आणि सामान्य भागात वारंवार स्पर्श केलेल्या पृष्ठभागाची जसे की दरवाजाचे हॅण्डल, लिफ्ट मधील बटण, रेलिंग, बसण्यासाठी असलेल्या खुर्च्या, टेबल, स्वच्छतागृहातील सर्व ठिकाणी यांची साफसफाई आणि नियमित निर्जंतुकीकरण 1 टक्के सोडियम हायपोक्लोराइट वापरून करणे बंधनकारक असेल. सर्व वॉशरूमची नियमितपणे साफसफाई, स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण करणे बंधनकारक असेल. आस्थापनांमध्ये अतिथीं / प्रवासी / ग्राहक यांनी वापरलेली तसेच कर्मचाऱ्यांनी वापरलेली चेहरा कव्हर / मास्क / ग्लोव्हजची योग्य विल्हेवाट लावणे बंधनकारक असेल.
    (इ) आस्थापनांच्या आवारामध्ये संशयित / Confirmed Covid-19 Case आढळून आल्यास करावयाची कार्यवाही - आजारी असलेल्या एखाद्या व्यक्तीचे आस्थांपनांमधील इतरांपासून विलगिकरण करण्यात यावे. अशा परिस्थितीमध्ये जवळचे शासकीय रुग्णालय / क्लिनिक, अथवा जिल्हा तसेच राज्य हेल्पलाईन क्रमांकावर तात्काळ माहिती कळविण्यात यावी. नियुक्त केलेल्या सार्वजनिक आरोग्य प्राधिकरणाद्वारे (जिल्हा आरआरटी / उपचार करणारे चिकित्सक) यांच्याकडून जोखीम मूल्यांकन केले जाईल आणि त्यानुसार सदर प्रकरणामध्ये संबंधिताचे उपचार, contact tracing आणि निर्जंतुकीकरणाची कार्यवाही करण्यात येईल.जर व्यक्ती कोरोना +ve आढळली तर संपूर्ण परिसर निर्जंतुकीकरण करावा.
    जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून वेळोवेळी कंटेनमेंट झोन म्हणून अधिसूचित करण्यात आलेल्या प्रत्येक स्थलसीमा हद्दीत सदरचा आदेश लागू राहणार नाही. तथापि अशा क्षेत्रापुरते यापूर्वी जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून पारित केलेले सर्व प्रतिबंधात्मक आदेश लागू राहतील. या आदेशाचा भंग करणाऱ्या व्यक्ती विरुद्ध भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 नुसार, गुन्हे दाखल करण्याकामी सांगली जिल्ह्यातील संबंधित पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी / कर्मचारी यांना या आदेशाद्वारे प्राधिकृत करण्यात आले आहे, असे आदेश जिल्हादंडाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी जारी केले आहेत.

00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा