गुरुवार, २२ डिसेंबर, २०१६

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पुनीत सांगली जिल्हा

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने सांगली जिल्हा पुनीत झाला आहे. मुंबई येथे उभारण्यात येणाऱ्या शिवरायांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकासाठी याच जिल्ह्यातील नद्यांमधील पाणी आणि किल्ल्यावरील माती नेण्यात येत आहे. छत्रपतींचे पाय सांगली जिल्ह्यातील ज्या भूमीला लागले, त्याच ठिकाणच्या मातीचे आता या भव्य स्मारकाशी कायमचे नाते जोडले जाणार आहे. जिल्ह्यातील तमाम शिवभक्तांच्या दृष्टीने ही आनंद आणि अभिमानाची बाब आहे.
    छत्रपती शिवरायांच्या काळात सांगली जिल्ह्याचा बहुतांशी भाग हा अदिलशाही मुलखात समाविष्ट होता. त्यामुळे हा भाग स्वराज्यात सामील व्हावा, म्हणून छत्रपती शिवरायांनी अनेकदा प्रयत्न केलेले दिसतात. अफजलखानाच्या वधानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी सन 1660 मध्ये मिरजेच्या किल्ल्यास वेढा घालून तो प्रांत आपल्या ताब्यात आणण्याचा प्रयत्न केला होता. याबाबतचा अस्सल कागद नेदरलँड येथील डचांच्या दफ्तरखान्यात आहे.
    छत्रपती शिवाजी महाराज हे इ.स. 1660 मध्ये मिरजेत आले होते. 1659 च्या नोव्हेंबर महिन्यात अफजलखानाचा वध केल्यानंतर शिवाजी महाराज आणि नेताजी पालकरांच्या फौजा विजापूरची अदिलशाही पादाक्रांत करण्यासाठी निघाल्या होत्या. त्यांनी वाईपासून दक्षिण महाराष्ट्रातील अनेक गावे जिंकून घेतली. शिवचरित्राचे अस्सल साधन मानले गेलेल्या 'शिवभारता' मध्ये या गावांची नावे दिली आहेत. यामध्ये सध्याच्या कराड, वाळवा, तासगाव आणि मिरज तालुक्यातील काही गावांचा समावेश आहे.
शिवाजी महाराजांच्या या मिरज स्वारीचे वर्णन तत्कालीन डच अधिकाऱ्यांनी 5 मे 1660 रोजी वेंगुर्ल्याहून पाठविलेल्या एका पत्रात केले आहे. डच भाषेतील हे अस्सल पत्र सध्या नेदरलँडमधील हेग शहरातील 'नॅशनाल अर्काइफ' मध्ये आहे. शिवाजी महाराज मिरजेत येऊन गेल्याचा हा अस्सल पुरावा आहे. हे पूर्ण पत्र डच भाषेत आहे. या पत्रावरून छत्रपती शिवाजी महाराज सुमारे दोन महिने मिरजेत होते, हे स्पष्ट होते. त्यामुळे शिवरायांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या मिरजेच्या मातीला मुंबईजवळच्या अरबी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्मारकाचा सार्थ अभिमान आहे. राजभवनापासून जवळच असणाऱ्या समुद्रातील बेटावर जगातील सर्वात उंच असे हे स्मारक असेल, ही सर्वाधिक आनंदाची बाब आहे.
    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऑक्टोबर 2014 मध्ये राज्याची सूत्रे हाती घेतल्यानंतर तातडीने याबाबत कार्यवाही पूर्ण करून स्मारकाच्या कामास गती दिली. त्यानंतर सर्व परवानग्या तातडीने प्राप्त करण्यात आल्या. या स्मारकास राज्य केंद्र शासनासह महापालिकेच्या विविध विभागाच्या परवानग्या आवश्यक होत्या. यामध्ये केंद्रीय पर्यावरण मंत्रालय, नौदल पश्चिम विभाग, तटरक्षक दल, सागरी किनारा अधिनियम, मुंबई पोलीस, मुंबई महानगरपालिका,बेस्ट, मुंबई पोर्ट ट्रस्ट, बी.एन.एच.एस. इंडिया,मत्स्यव्यवसाय विभाग, राष्ट्रीय सुरक्षा दल, दिल्ली, भारतीय विमानपत्तन प्राधिकरण अशा बारा विभागांची ना हरकत प्रमाणपत्रे शासनास प्राप्त झाली आहेत.
       आपल्या असामान्य कामगिरीने महाराष्ट्राची पताका जगभरात फडकवणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांना महाराष्ट्राच्या वतीने हे अनोखे वंदन असेल. महाराष्ट्राच्या तेजस्वी आणि गौरवशाली इतिहासाचे प्रतिबिंब या स्मारकाच्या माध्यमातून अनुभवता येणार आहे. त्यामुळे प्रकल्पाचे अनोखे विशिष्ट स्वरुप लक्षात घेऊन प्रकल्पाचा आराखडा,निविदा कागदपत्रे तयार करणे, प्रकल्पावर देखरेख करणे, यासाठी दिनांक11कएप्रिल 2016 रोजी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागाराची नेमणूक करून त्यानंतर प्रकल्प आराखडा मंजूर करण्यात आला आहे.
    या आंतरराष्ट्रीय प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यामध्ये 2300 कोटी रूपयांची कामे प्रस्तावित आहेत. त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा192 मीटर उंचीचा पुतळा उभारण्याचे प्रारंभी नियोजन होते. आता या पुतळ्याची उंची 210 मीटर इतकी वाढविण्यासाठी पर्यावरण विभागाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. या स्मारकात महाराजांच्या जीवनचरित्रावर आधारित कला दालन, प्रदर्शन गॅलरी,महाराजांच्या चरित्रावर आधारित पुस्तकांचे सुसज्ज वाचनालय, प्रेक्षक गॅलरी,उद्यान, हेलीपॅड, अति महत्त्वाच्या व्यक्तींसाठी जनतेसाठी जेट्टी (धक्का),सुरक्षाविषयक व्यवस्थेचा समावेश आहे.
    प्रकल्पासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धात्मक निविदा मागविण्यात आल्या असून 30 जानेवारीपर्यंत त्यांची स्वीकृती केली जाईल. त्यानंतर 19 फेब्रुवारीपर्यंत कार्यादेश देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. काम सुरू झाल्यानंतर 36 महिन्यात स्मारक पूर्ण करण्याचे सरकारचे नियोजन असून ते भावी पिढ्यांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरणार आहे. महाराजांची जीवनमूल्ये प्रदर्शित करणारे देशभक्तीपर माहिती केंद्रही या स्मारकात असेल. तसेच राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पर्यटकांसाठी पर्यटनस्थळ असणार आहे.
हा कार्यक्रम अधिक संस्मरणीय ठरावा यासाठी राज्यातील सुमारे 70 हून अधिक प्रमुख नद्यांचे जल आणि गड किल्ल्यांवरची पवित्र माती या ठिकाणी आणली जाणार आहे. छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली मिरजेतील माती अरबी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या स्मारकासाठी पाठविण्यात येणार आहे. याशिवाय जिल्ह्यातील अन्य किल्ल्यांवरील माती आणि नद्यांमधील पाणीही तेथे नेण्यात येणार आहे. त्यातून जिल्ह्याचे एक नाते या स्मारकाशी जोडले जाणार आहे. सांगली जिल्ह्यातील तमाम शिवप्रेमींसाठी ही आनंदाची बाब आहे.
संकलन : जिल्हा माहिती कार्यालय,सांगली

00000



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा