बुधवार, ७ डिसेंबर, २०१६

सांगलीतील आर्या पान शॉप झाले कॅशलेस

  केंद्र शासनाने "गो कॅशलेस, गो डिजीटल" हे धोरण राबवण्यास सुरवात केली आहे. या अंतर्गत कॅशलेस म्हणजेच रोकडरहित समाज ही नवी संकल्पना निर्माण झाली आहे. कॅशलेस व्यवहाराबाबत विविध माध्यमांतून होणाऱ्या जनजागृतीमधून प्रेरणा घेऊन सांगलीतील विजय पाटील यांनी आपल्या आर्या पान शॉपीमध्ये स्वाईप मशीनचा वापर करण्यास सुरवात केली आहे. स्वाइप मशिनद्वारे व्यवहार करणारे राज्यातील हे पहिले पानशॉप असल्याचा दावा श्री. पाटील यांनी केला आहे.
विजय पाटील मूळचे विज्ञान शाखेतील वनस्पतीशास्त्र उपशाखेचे पदवीधर. परिस्थिती नसल्याने त्यांनी पानाचा ठेला सुरू केला. गेल्या 10 वर्षांच्या  मेहनतीचे फळ मिळाले. कॉलेज कॉर्नरवर आज त्यांचे आर्या पान शॉप हे दुकान दिमाखात उभे आहे. मेहनतीच्या आणि निढळाच्या घामाच्या लक्ष्मीची पूजा व्हावी, यासाठी त्यांचा नेहमीच प्रयत्न असतो.
महिनाभरापूर्वी 500 आणि एक हजार रुपयांच्या नोटाबंदीचा निर्णय झाला. त्यानंतरच्या घडामोडी त्यांच्या व्यावसायिक नजरेने टिपल्या आणि कॅशलेस व्यवहाराचे महत्त्व त्यांच्या लक्षात आले. त्यांच्या पान शॉपीमध्ये येणाऱ्या ग्राहकांकडे बऱ्याचदा चिल्लर नसायची. त्याचा परिणाम व्यवसायावर होऊ नये, यासाठी त्यांनी स्टेट बँक ऑफ इंडियाकडे स्वाईप मशीनची मागणी नोंदवली. त्यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत बँकेच्या अधिकाऱ्यांनी दोनच दिवसात त्यांना स्वाईप मशीन उपलब्ध करून दिले. याबद्दल ते बँकेच्या अधिकाऱ्यांचे ऋणनिर्देश व्यक्त करतात.
याबाबत विजय पाटील म्हणाले, नोटाबंदीच्या निर्णयानंतर बहुतेक सर्व एटीएममधून 2000 च्या नोटाच मिळत होत्या. त्यामुळेेपान खाणाऱ्यांची मोठी पंचाईत झाली होती. कारण 10, 20 रुपयांच्या पानासाठी 2000 रुपयाचे सुट्टे पैसे कोणताही पान शॉपवाला देत नसे. त्यामुळे एकतर उधारीवर पान खा किंवा सुट्टे पैसे द्या. ज्याच्याकडे 100, 50 रुपयाच्या नोटा आहेत ते रोख रक्कम देत पान घेतात. पण, ज्यांच्याकडे सुट्टे पैसे नाहीत, त्यांना ही हौस पुरी करता येत नव्हती. या परिस्थितीवर मात करण्यासाठी स्वाईप मशीनसारखे अन्य पर्याय कॅशलेस व्यवहारासाठी उपयुक्तच आहेत. यामध्ये कार्डधारकाचे नाव, कार्डचा क्रमांक, कार्ड स्वाईप केल्याचा दिनांक आणि वेळ अशा बाबींची नोंद होते आणि महिनाभरानंतरही हा डाटा मशीनमध्ये सेव्ह असतो. त्यामुळे हा पर्याय पूर्णतः विश्वसनीय, सुरक्षित आणि व्यवहार्य आहे.
कार्ड स्वाईप केल्यानंतर ग्राहकाच्या मोबाईलवर लगेचच संदेश जातो. त्यामुळे खात्यातून कमी होणारी रक्कम, वेळ, दिनांक यांची नोंद ग्राहकाकडेही राहते. त्यामुळे आपल्या या हौसेवर किती पैसे खर्च होतात, हे कळते, म्हणून ग्राहकही खुश आहेत.
माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात या कार्यक्रमात कॅशलेस समाजासाठी आवाहन केले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही रोकडरहित समाजासाठी प्रयत्नशील आहेत. ही संकल्पना रूजवण्यास जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांनी शासकीय पातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत. प्रत्येक बैठकीत कॅशलेस व्यवहारांचे महत्त्व आणि पर्याय यांची माहिती ते देत आहेत. शासकीय अधिकाऱ्यांबरोबरच दोन दिवसांपूर्वीच एका पेट्रोल पंपावर स्वाईप मशीनही उपलब्ध करून देण्यात आले आहे. विजय पाटील यांच्यासारख्या व्यावसायिकाने स्वयंप्रेरणेने सुरू केलेल्या स्वाईप सुविधेमुळे ही संकल्पना यशस्वी करण्यासाठी खाजगी स्तरातूनही एक हात पुढे आला आहे, हे निश्चित!
                                                             संप्रदा द. बीडकर
                                                   प्र. जिल्हा माहिती अधिकारी
                                                               

 सांगली


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा