बुधवार, ३० नोव्हेंबर, २०१६

जिल्ह्यात एचआयव्ही संसर्गित रूग्णांची संख्या घटतेय

जिल्ह्यामध्ये गेल्या 10 वर्षात एचआयव्ही संसर्गित रूग्णांच्या संख्येत घट झाली आहे. दहा वर्षापूर्वी सन 2006 मध्ये जिल्ह्यात एचआयव्ही संसर्गित रूग्णांची संख्या 2 हजार 258 होती. ती ऑक्टोबर 2016 मध्ये 947 इतकी कमी झाली आहे. जिल्ह्याच्या दृष्टीने हे एक आशादायक चित्र आहे. जिल्ह्यात सन 2007 ते 2010 या कालावधीत दर महिन्याला 250 ते 280 नवीन एचआयव्ही संसर्गित रूग्ण सापडत होते. हे प्रमाण कमी होऊन या वर्षी दर महिन्याला नवीन रूग्णांची संख्या ही 100 पेक्षा कमी  झाली आहे. तसेच गर्भवती माता या सन 2010 साली 150 पर्यंत एचआयव्ही संसर्गित सापडल्या होत्या. ती संख्या घटून सन 2016 मध्ये 30 पर्यंत खाली आली आहे. 
   एचआयव्ही संसर्गित रूणांची संख्या घटण्याचे सर्व श्रेय जिल्हा एडस् प्रतिबंध नियंत्रण कक्षास जाते. होऊन सारे एकसंघ, करूया एचआयव्हीचा प्रतिबंध हे जागतिक एडस् दिन 2016 चे घोषवाक्य आहे.  1 ते 7 डिसेंबर 2016 हा एडस् सप्ताह म्हणून साजरा करण्यात येणार आहे. या सप्ताहात एडस् विषयावर विविध उपक्रम राबविले जाणार आहेत. जागतिक एडस् दिनानिमित्त जिल्हास्तरावर पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रूग्णालय सांगली येथे दिनांक 1 डिसेंबर 2016 रोजी सकाळी 8.45 वाजता एच.आय.व्ही. एडस् जनजागृती फेरीचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व तालुकास्तरावर जनजागृती रॅली काढण्यात येणार आहे. तसेच इयत्ता 9 वी च्या पुढील सर्व विद्यालय, कनिष्ठ वरिष्ठ महाविद्यालयाच्या सहकार्याने मुख्यालयाच्या ठिकाणी जनजागृती रॅली, एचआयव्ही / एडस् विषयावर चित्रपट, ऑर्केस्ट्रा, जिल्ह्यातील 20 महाविद्यालयामध्ये जनजागृतीपर मार्गदर्शन, पोस्टर स्पर्धा, निबंध स्पर्धा, घोषवाक्य स्पर्धा आदि उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
   जिल्हाधिकारी शेखर गायकवाड जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक बोल्डे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा एडस् प्रतिबंध नियंत्रण कक्ष, पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रूग्णालय, सांगली मार्फत कनिष्ठ वरिष्ठ महाविद्यालयीन युवकामध्ये मार्गदर्शन लेक्चर पोस्टर प्रदर्शन, पथनाट्य, वॉल पेन्टींग, टीव्ही रेडिओ जाहिरात, देह विक्री करणाऱ्या स्त्रियामध्ये, समलिंगी संभोग करणाऱ्या पुरूषामध्ये तसेच स्थलांतरीत कामगार ट्रक चालक / वाहक लक्षगट हस्तक्षेप प्रकल्प यांच्यामध्ये जनजागृती करण्यात येत आहे.
   कोणालाही एचआयव्हीची लागण झाली आहे किंवा नाही हे रक्त नमुना तपासणी केल्याशिवाय कळत नसल्याने जिल्ह्यामध्ये जिल्हा रूग्णालय, उप जिल्हा रूग्णालय ग्रामीण रूग्णालयात 20 ठिकाणी ऐच्छिक समुपदेशन चाचणी केंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या 59 ठिकाणी, अर्बन हेल्थ पोस्टमध्ये 10 ठिकाणी पब्लीक प्रायव्हेट पार्टनरशिप अंतर्गत प्रायव्हेट हॉस्पीटलमध्ये 60 ठिकाणी एचआयव्ही तपासणीची सोय केली आहे. याबरोबरच रूग्ण एचआयव्ही संसर्गित सापडल्यास त्याला मोफत एआरटी औषधोपचार दिला जातो. ही सोय सिव्हील हॉस्पीटल सांगली, शासकीय वैद्यकिय महाविद्यालय मिरज, भारती वैद्यकिय महाविद्यालय वानलेसवाडी उप जिल्हा रूग्णालय इस्लामपूर येथील एआरटी सेंटरमध्ये उपलब्ध आहे. तसेच तालुकास्तरावर औषधोपचार मिळण्यासाठी जत, कवठेमहांकाळ, तासगाव, आटपाडी, विटा शिराळा येथेही लिंक एआरटी सेंटर उपलब्ध आहेत.
                   संप्रदा द. बीडकर
                   प्र. जिल्हा माहिती अधिकारी
                   सांगली



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा