मंगळवार, १२ डिसेंबर, २०१७

सांगली जिल्ह्यात एक लाख शेतकरी कर्जमाफीस पात्र, 64 हजार 105 शेतकऱ्यांच्या खात्यावर 165 कोटी वर्ग

सांगली, दि. 12, (जि. मा. का.) : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना अर्थात राज्यातील ऐतिहासिक कर्जमाफी अंतर्गत सांगली जिल्ह्यात एकूण एक लाख, 6 हजार, 753 इतक्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मंजूर झाली आहे. यामध्ये 31 हजार 33 शेतकरी कर्जमाफीस पात्र ठरले आहेत. 11 हजार 611 लाभार्थी वन टाईम सेटलमेंट योजनेंतर्गत पात्र ठरले आहेत. तर 64 हजार 109 लाभार्थी प्रोत्साहनपर रकमेसाठी पात्र ठरले आहेत. अशी माहिती राज्य शासनातर्फे देण्यात आली आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत 64 हजार, 105 शेतकऱ्यांना 164 कोटी 91 लाख रुपयांचा लाभ मिळाला आहे. यात 25 हजार 910 शेतकऱ्यांना 108 कोटी 9 लाख रुपये कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे. तर 38 हजार 285 शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर 56 कोटी 82 लाख रुपये रकमेच्या अनुदानाचा लाभ वर्ग करण्यात आला आहे.
याबाबत माहिती देताना जिल्हा उपनिबंधक प्रकाश अष्टेकर म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत जिल्ह्यातील सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेस 177 कोटी इतकी रक्कम प्राप्त           झाली असून, त्यापैकी 138 कोटी रुपये लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आले आहेत. यामध्ये 38 हजार, 285 लाभार्थींना 56 कोटी, 83 लाख रुपये प्रोत्साहनपर रकमेचा तर 22 हजार 383 लाभार्थींना 81 कोटी 37 लाख रुपये कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे.
तर अग्रणी बँक व्यवस्थापक सी. बी. गुडस्कर म्हणाले, राष्ट्रीयीकृत बँकांपैकी अग्रणी बँकेकडे माहिती प्राप्त झालेल्या चार बँकांच्या 3 हजार 537 लाभार्थींना 26 कोटी 72 लाख रुपये इतका लाभ वर्ग करण्यात आला आहे. यामध्ये युनियन बँक ऑफ इंडिया यांच्या एक हजार, दोनशे 96 लाभार्थींना 10 कोटी 44 लाख इतकी रक्कम, बँक ऑफ इंडियाच्या एक हजार, आठशे 97  लाभार्थींना 13 कोटी 86 लाख इतकी रक्कम, बँक ऑफ महाराष्ट्रच्या 343 लाभार्थींना 2 कोटी 41 लाख इतकी रक्कम, आयसीआयसीआय बँकेच्या एका लाभार्थीच्या खात्यावर 91 हजार 811 रुपये इतकी रक्कम वर्ग करण्यात आली आहे. याच बँकांकडे दोन हजार दोनशे 55 लाभार्थींसाठी 9 कोटी 44 लाख रुपये इतकी प्रोत्साहनपर रक्कम मंजूर झाली असून, त्याची तपासणी करून, लवकरच संबंधितांच्या खात्यावर रक्कम वर्ग करण्यात येणार आहे.
    छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत आतापर्यंत राज्यात साधारण 41 लाख शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी 19 हजार कोटी रुपयांची रक्कम बँकांकडे वर्ग करण्यात आली आहे.         या योजनेंतर्गत 77 लाख अर्ज प्राप्त झाले आहेत. छाननीअंतर्गत डुप्लिकेशन झालेले खाते दूर करुन 69 लाख खात्यांवर कर्जमाफीची रक्कम जमा करण्याची कार्यवाही सुरु आहे. त्यापैकी जवळपास 41 लाख खात्यांमध्ये कर्जमाफीचे अनुदान देण्यासाठी राज्य शासनाकडून बँकांकडे सुमारे 19 हजार कोटी रुपये इतका निधी हस्तांतरित केला आहे. जे शेतकरी पात्र होते पण अर्ज केला नाही अशा शेतकऱ्यांनाही या योजनेत सामावून घेण्यात येणार असून शेवटच्या पात्र शेतकऱ्याला मदत मिळेपर्यंत ही योजना सुरु ठेवली जाईल.
00000




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा