मंगळवार, १२ डिसेंबर, २०१७

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना : सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीककर्जमाफीतून दिलासा

सांगली, दि. 12, (जि. मा. का.) : राज्य शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतून मिळालेल्या कर्जमाफीने सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्याला दिलासा मिळाला आहे. मिरज, पलूस आणि तासगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी याबद्दल राज्य शासनाप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे.
तासगाव तालुक्यातील तुरची येथील नंदकुमार विठ्ठल पुरके यांचे पुत्र रितेश पुरके म्हणाले, वडिलांनी 2013 साली बँक ऑफ इंडियाचे 3 लाख रुपये कर्ज घेतले होते. आर्थिक अडचणीमुळे आम्हाला ते भरता आले नाही. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतून एक लाख, 49 हजार रुपये कर्ज माफ झाले आहे. त्याबद्दल शासनाचे आभारी आहोत.
तासगाव येथील सहा एकर शेती असलेले जगन्नाथ कदम म्हणाले, माझी दीड एकर ऊस शेती आणि दीड एकर डाळिंब शेती आहे. मी दहा वर्ष कर्ज घेत आहे. मात्र, नियमितपणे कर्ज फेडल्याबद्दल पहिल्यांदाच मला प्रोत्साहनपर 25 हजार रुपये मिळाले आहेत.    
पलूस तालुक्यातील खटाव येथील भास्कर विलास साळवी म्हणाले, मी द्राक्षबागेसाठी बँक ऑफ महाराष्ट्रमधून दीड लाख रुपये कर्ज काढले होते. मात्र, दोन चार वर्षे झाली तरी मी ते फेडू शकलो नाही.  बाग काढून ऊस लावला. राज्य शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतून एक लाख, 27 हजार रुपये कर्जमाफी झाली. यातून मला मिळालेली रक्कम मुला-बाळांच्या शिक्षणासाठी खर्च करणार. तसेच, नवीन लागवडीसाठी उपयोग होईल.
मिरज तालुक्यातील टाकळीतील कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांचा प्रतिनिधी म्हणून चवगौंडा आमगौंडा पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, टाकळी गावातील 81 लोकांची 58 लाख रुपयांची कर्जमाफी झाली आहे. मी अल्पभूधारक शेतकरी आहे. वैयक्तिक माझी जवळपास 32 हजार रुपयांची कर्जमाफी झाली आहे. मला त्याचा पूर्ण लाभ झाला आहे. पुढील वाटचाल करण्यासाठी, शेतीत चांगली लागवड करण्यासाठी याचा मला आधार होणार आहे. त्यामुळे मी राज्य शासनाचा आभारी आहे.
राज्य शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना राबवल्याबद्दल मुख्यमंत्री आणि राज्य शासनाचे ऋणनिर्देश व्यक्त करून मिरज विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे अध्यक्ष संभाजी शिवाप्पा मेंढे म्हणाले, आमच्या सोसायटीचे थकबाकीदार 223 आहेत. त्यातील पहिल्या यादीत 137 थकबाकीदार कर्जमाफीस पात्र झाले आहेत. शासनाने या योजनेमध्ये पारदर्शकेतेने काम केले आहे. त्यामुळे गरजू आणि पात्र लाभार्थींना त्याचा दिलासा मिळणार आहे.
मिरज येथे राहणारे आणि ढवळी येथे 3 एकर शेती असलेले श्रीकांत मंगावले यांनी 70 हजार रुपये कर्ज घेतले होते. ते छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतून संपूर्णपणे माफ झाले आहे. याचा मला आणि माझ्या कुटुंबाला लाभ होणार आहे. त्याबद्दल मी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे आणि राज्य शासनाचे ऋणी आहे.
मिरज येथील संजय बरगाले यांनी 2013 साली मिरज विविध कार्यकारी सहकारी सोसायटीतून कर्ज घेतले होते. मात्र आर्थिक अडचणीमुळे ते फेडू शकले नव्हते. मात्र, छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतून माझे संपूर्ण एक लाख 39 हजार रुपये एवढे कर्ज माफ झाले आहे. त्यामुळे मी राज्य शासन आणि बँकेचे आभार मानतो.
मिरजच्या माळी गल्ली येथील दत्ता केशव पांगळे म्हणाले, मी 2012 साली मिरज विविध कार्यकारी सहकारी सोसायटीतून एक लाख, 20 हजार रुपये कर्ज घेतले होते. मात्र, उसाला पाणी मिळाले नसल्यामुळे ते कर्ज थकले होते. मात्र, ते कर्ज शेतकरी सन्मान योजनेतून माफ झाले आहे. याबद्दल मी राज्य शासनाचा आभारी आहे. 
00000











कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा