बुधवार, २ ऑक्टोबर, २०१९

महात्मा गांधी यांचे विचार आधुनिक युगातही प्रेरणादायी - जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त हुतात्मा स्मारक सांगली येथे पिंपळ वृक्षाचे वृक्षारोपण

     सांगली, दि. 2, (जि. मा. का.) : प्रत्येक युगात महात्मा गांधी यांचे विचार प्रेरणादायी असून आधुनिक युगात ते जास्त महत्वपूर्ण ठरत आहेत, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले.
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी सेवाग्राम आश्रमात सन 1936 मध्ये लावलेल्या पिंपळ वृक्षापासून तयार करण्यात आलेली रोपे दिनांक 2 ऑक्टोबर 2019 रोजी महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंतीचे औचित्य साधून राज्यातील प्रत्येक शहिद स्मारक परिसरात लावण्यात येत आहेत. सांगली जिल्ह्यातील 15 शहिद स्मारकांमध्ये प्रत्येकी चार पिंपळ वृक्ष रोपे स्वातंत्र्य सैनिक यांच्याहस्ते लावण्यात येत आहेत. महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त हुतात्मा स्मारक सांगली येथे पिंपळ रोपाचे रोपण ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिकांच्या हस्ते व जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. यावेळी उप वनसंरक्षक प्र. भि. धानके,  स्वातंत्र्य सैनिक जयराम कुष्टे, माधवराव माने, चंद्रकांत पोरे, शिवाजीराव पवार यांच्यासह रोटरीचे अध्यक्ष प्रशांत माने, स्नेहल गौंडाजे, मंदार बने, रणजित माळी, रविंद्र फडके, अरूण दांडेकर, प्रमोद लाड, ॲड दिनकर माने, रामचंद्र पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची 150 वी जयंती देशभरात वेगवेगळ्या उपक्रमाने साजरी करण्यात येत आहे. त्यातीलच एक भाग म्हणून सेवाग्राम येथील पिंपळ वृक्षापासून तयार करण्यात आलेली रोपे राज्यातील विविध शहिद स्मारकामध्ये लावण्यात येत आहे असे सांगून जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, महात्मा गांधी यांचे विचार प्रत्येक युगात प्रेरणादायी आहेत. त्यांनी दिलेला स्वच्छतेचा संदेश अधिक दृढ करूया. महात्मा गांधी यांची शिकवण अहिंसा, स्वच्छता, व्यक्तीची प्रतिष्ठा, सर्व धर्म समभाव हे विचार शांतताप्रिय समाजाच्या निर्मितीसाठी पुढे घेऊन जावूया. 150 व्या महात्मा गांधी जयंतीच्या निमित्ताने स्वच्छता ही सेवा हे अभियान हाती घेण्यात आले असून प्लॅस्टिक मुक्तीचा उपक्रम राबविण्यात येत आहे. हा उपक्रम सर्वजण मिळून यशस्वी करूया, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
प्रारंभी महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा