बुधवार, २ ऑक्टोबर, २०१९

चला सर्वजण प्लॅस्टिक मुक्तीचा निश्चय करूया एकदा वापरल्या जाणाऱ्या प्लॅस्टिकला जीवनातून हद्दपार करूया - जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

सांगली, दि. 2, (जि. मा. का.) : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या स्वप्नातील स्वच्छ भारताची संकल्पना साकारण्यासाठी महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंती निमित्त स्वच्छता ही सेवा या विषयावर राष्ट्रव्यापी मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत प्लॅस्टिक मुक्त भारत उपक्रम 11 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीमध्ये घेण्यात येत आहे. महात्मा गांधी जयंती निमित्त सर्व जिल्ह्यात श्रमदान चळवळीचे आयोजन करण्यात येवून विविध घटकांच्या सहभागाने मोठ्या प्रमाणावर प्लॅस्टिक संकलित करण्यात येत आहे, असे सांगून जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, एकदा वापरात येणाऱ्या प्लॅस्टिकचा वापर पूर्णत: जीवनातून आपण हद्दपार करण्यासाठी सर्वजण मिळून निश्चय करूया.
       स्टेशन चौक सांगली येथे स्वच्छता ही सेवा या उपक्रमांतर्गत श्रमदान चळवळीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी महानगरपालिका आयुक्त नितीन कापडणीस, अप्पर जिल्हाधिकारी तथा या अभियानाचे नोडल अधिकारी गोपीचंद कदम, पोलीस उपअधीक्षक अशोक वीरकर, निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी बर्डे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. स्वाती देशमुख, उपजिल्हाधिकारी बाबासाहेब वाघमोडे, उपायुक्त राजेंद्र तेली, उपायुक्त स्मृती पाटील, आरोग्य अधिकारी सुनिल आंबोळे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, नागरिक, विद्यार्थी, स्वयंसेवी संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.
       यावेळी जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, प्लॅस्टिक हे जीवनशैलीचा अविभाज्य भाग बनले आहे. यामुळे एकूणच पर्यावरणाचे फार मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. एकदा वापरात येणाऱ्या प्लॅस्टिकचा वापर पूर्णत: थांबवणे व हळूहळू प्लॅस्टिकला जीवनातून हद्दपार करणे यासाठी सर्वांनी सक्रीय योगदान देणे आवश्यक आहे. या कार्यक्रमात जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी सर्व मतदारांनी निर्भय व भयमुक्त वातावरणात मतदान करून लोकशाही अधिकाधिक बळकट करण्यासाठी मतदानाचा हक्क बजावावा याबाबत प्रतिज्ञा दिली. तर महानगरपालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी उपस्थितांना प्लॅस्टिक मुक्तीची शपथ दिली. यावेळी स्टेशन चौक परिसरात श्रमदान करून स्वच्छता केली व प्लॅस्टिक संकलित केले.
       प्रास्ताविकात उपायुक्त स्मृती पाटील यांनी कार्यक्रमाचा हेतू विषद करून सविस्तर माहिती दिली. प्रारंभी महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण अभिवादन करण्यात आले व दिप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली.
       श्रमदान चळवळीत शासकीय अधिकारी, कर्मचारी, शालेय विद्यार्थी, विद्यार्थींनी यांनी सहभाग नोंदविला. तसेच आजपासून मी सिंगल यूज प्लॅस्टिक वापरणार नाही, गुडबाय सिंगल यूज प्लास्टिक, आता आपल्यामुळेच फरक पडेल या तयार करण्यात आलेल्या सेल्फी पाँईटने तसेच दीपक चव्हाण यांच्या शोले स्टाईल स्वच्छता रथाने अनेकांचे लक्ष वेधून घेतले. यावेळी कापडी पिशव्या देवून मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.
000000




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा