शुक्रवार, ३ मे, २०२४

मतदान प्रक्रिया सुरळीत व सुलभ होण्यासाठी सुक्ष्म नियोजन करावे जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी

जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी घेतला निवडणूक कामकाजाचा आढावा सांगली (जि.मा.का.) दि. 3 :- 44- सांगली लोकसभा मतदार संघात येत्या 7 मे रोजी मतदान होत असून मतदान प्रक्रिया सुलभ, सुरळीत आणि निर्भयपणे पार पाडण्यासाठी सुक्ष्म नियोजन करून त्यानुसार कार्यवाही करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी आज दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणूक कामकाजाचा आढावा घेण्यासाठी आयोजित केलेल्या बैठकीस सहाय्यक जिल्हाधिकारी अमित रंजन, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निखील ओसवाल, उप जिल्हा निवडणूक अधिकारी नीता शिंदे व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी सांगितले, लोकसभेसाठी होणाऱ्या मतदानाची प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी निवडणूक यंत्रणेत काम करणाऱ्या प्रत्येक अधिकारी कर्मचाऱ्यांनी यांची भूमिका महत्त्वाची आहे. मतदान केंद्रांवर नियुक्त अधिकारी कर्मचारी यांना आवश्यक प्रशिक्षण दिले आहे. यामुळे त्यांनी त्यांच्यावर दिलेली जबाबदारी सक्षमपणे पार पाडावी. या बैठकीत जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी मतदान केंद्रावरील सुविधांबाबतही आढावा घेतला. दिव्यांग मतदारांसाठी रॅम्प व व्हील चेअर, पाणी व सावलीची सोय, आरोग्य विषयक अत्यावश्यक कीट उपलब्धता, मतदान केंद्रांवरील वेब कास्टिंग, वाहतूक आराखडा यासह मतदान केंद्रांवरील कर्मचारी वाहतूक व्यवस्था, रूट नुसार पार्किग या बाबींचाही बैठकीत आढावा घेण्यात आला. ०००००

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा