शुक्रवार, ३ मे, २०२४

मतदान केंद्राच्या ठिकाणी मनाई आदेश जारी

सांगली, दि. 3 (जि. मा. का.) : सांगली जिल्ह्यात लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 चे मतदान दि. 7 मे 2024 रोजी होणार आहे. सांगली जिल्ह्यामध्ये निवडणूक प्रक्रिया सुरळीतपणे पार पडावी, जिल्ह्यात शांतता रहावी, तसेच जिल्ह्यामध्ये कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती अबाधित रहावी, या करीता प्रतिबंधात्मक उपाय योजनेचा भाग म्हणून जिल्हादंडाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी फौजदारी प्रक्रीया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार सांगली जिल्ह्यातील सर्व 2 हजार 448 मतदान केंद्राच्या इमारतीपासून 200 मीटर सभोवतालचे परिसरात दि. 7 मे 2024 रोजीचे सकाळी 06.00 वाजल्यापासून ते संबंधित मतदान केंद्रावरील मतदान प्रक्रिया संपेपर्यंत पुढील कृत्ये करण्यास मनाई केली आहे. पाच किंवा त्यापेक्षा जास्त लोकांना गटागटाने फिरणे, एकत्रित गटागटाने फिरणे व उभे राहण्यास मनाई केली आहे. झेरॉक्स मशीन, टेलिफोन बुथ, फॅक्स मशीन, ध्वनीक्षेपक यांचा वापर करणेस मनाई केली आहे. तसेच मतदान केंद्रात मोबाईल, पेजर वापरण्यास मनाई करण्यात आली आहे. हा आदेश निवडणूक कर्तव्य बजावीत असणाऱ्या शासकीय कर्मचारी / अधिकारी यांना लागू असणार नाही. हा आदेश दि. 7 मे 2024 रोजीचे सकाळी 06:00 वाजल्यापासून ते संबंधित मतदान केंद्रावरील मतदान प्रक्रिया संपेपर्यंत अंमलात राहील, असे आदेश जिल्हादंडाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी जारी केले आहेत. 000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा