शनिवार, १७ ऑगस्ट, २०२४

शहरी भागातील एक लाखाहून अधिक महिला लाभार्थी - मनपा आयुक्त शुभम गुप्ता

सांगली दि. 17 (जि.मा.का.) : महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्याच्या हेतूने 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना' सुरू करण्यात आली. या योजनेचे 14 ऑगस्ट पासून पात्र महिला लाभार्थीच्या खात्यावर पैसे जमा झाले. शहरी भागातील सुमारे 1 लाख 25 हजाराहून अधिक महिलांनी यासाठी अर्ज केला असून त्यापैकी 75 हजाराच्या आसपास महिलांच्या खात्यावर थेट 3 हजार रुपये जमा झाले असून उर्वरित 50 हजार महिलांच्या खात्यावर रक्षाबंधन कालावधीपर्यंत पैसे जमा होतील, अशी माहिती मनपा आयुक्त शुभम गुप्ता यांनी दिली. मिरज येथील बालगंधर्व नाट्यगृहाच्या ठिकाणी आज महिला मेळावा आयोजित करण्यात आला होता. ते पुढे म्हणाले, उर्वरित महिलांच्या खात्यातही लवकरच या योजनेचे पैसे जमा होतील. या कामी माहिलांनी सहकार्य करावे. अतिशय कमी कालावधीमध्ये मनपाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी ही मोहीम यशस्वीरित्या पार पाडल्याबद्दल त्यांनी सर्व संबंधित कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. यावेळी मनपा अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, उपायुक्त शिल्पा दरेकर, प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या नंदिनी घाणेकर तसेच जिल्हा महिला व बालविकास अधिकारी संदीप यादव आदी उपस्थित होते.

स्त्रियांच्या सर्वांगीण कर्तृत्वाची दखल शासनाने घेतली - पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे

सांगली दि. 17 (जि.मा.का.) : महिला या जन्मजातच कर्तृत्ववान असतात. स्त्रियांच्या या सर्वांगीण कर्तृत्वाची दखल घेत शासनाने महिलांसाठी प्रती महिना दीड हजार रुपये मानधनाची मुख्यमंत्री - माझी लाडकी बहीण योजना सुरू केली. या योजनेचे हप्ते 14 ऑगस्टपासून पात्र महिलांच्या बँक खात्यात जमा होणे सुरू झाले आहे. ही योजना कोणत्याही परिस्थितीत बंद होणार नसल्याची माहिती पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी दिली. मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेचा राज्यस्तरीय शुभारंभ पुणे येथील बालेवाडी येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांच्यासह इतर अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण दूरदृष्यप्रणालीव्दारे मिरज बालगंधर्व नाट्यमंदिर येथे करण्यात आले. या प्रसंगी आयोजित जिल्हास्तरीय महिला मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, मनपा आयुक्त शुभम गुप्ता, अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, उपायुक्त शिल्पा दरेकर, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक नंदिनी घाणेकर, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी संदीप यादव आदी उपस्थित होते. ते पुढे म्हणाले, शासनाने केवळ महिलांसाठीच नाही तर युवक, शेतकरी, ज्येष्ठ नागरिक, कामगार या सर्वांसाठी विविध योजना राबविल्या आहेत. हे शासन सर्वसामान्यांचे असून ते शेवटच्या घटकांपर्यंत कार्यरत राहणार आहे. स्त्रियांनी बँकेतून पैसे काढण्याची घाई करू नये. या पैशाचा विनियोग कुटुंबीयांसाठी तसेच मुलांच्या शिक्षणाच्या दृष्टीने करावा, असे आवाहन केले. जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी म्हणाले, मुख्यमंत्री - माझी लाडकी बहीण योजना ही सरकारची महत्त्वाकांक्षी योजना असून या योजनेसाठी गेली दोन महिने प्रशासन अव्याहतपणे प्रयत्न करीत आहे. दि. 14 ऑगस्टपासून महिलांच्या बँक खात्यावर या योजनेचे पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. ही योजना यशस्वीरित्या राबविण्यासाठी सर्वांचे योगदान अत्यंत मोलाचे असून यामध्ये बँकर्सची भूमिका महत्त्वाची असल्याचे सांगून जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी त्यांचे कौतुक केले. या प्रसंगी पालकमंत्री श्री. खाडे यांच्या हस्ते मुख्यमंत्री - माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत प्रतिकात्मक स्वरूपात 10 महिलांना धनादेश व रोपटे देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. तत्पूर्वी जिल्हा महिला बालविकास अधिकारी संदीप यादव यांनी या योजनेअंतर्गत सांगली जिल्ह्यात सुमारे चार लाख 59 हजार इतके अर्ज आले असून त्यापैकी सुमारे चार लाख 45 हजार अर्ज मंजूर झाल्याचे सांगितले. तसेच या कामी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने सर्वाधिक लाभार्थ्यांना पैसे वर्ग केल्याचे प्रास्ताविकामध्ये सांगितले. यावेळी अश्विनी संकपाळ व वैष्णवी राजपूत या पात्र महिला लाभार्थ्यांनी या योजनेच्या अनुषंगाने आपल्या भावना व्यक्त केल्या. या कार्यक्रमास नीता केळकर, स्वाती शिंदे यांच्यासह लाभार्थी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

शुक्रवार, १६ ऑगस्ट, २०२४

पुणे येथे होणाऱ्या लाडकी बहीण योजना कार्यक्रमाच्या अनुषंगाने जिल्हा परिषद व महानगरपालिकेने समन्वय ठेवावा - जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी

सांगली, दि. 16, (जि. मा. का.) : महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाच्या दृष्टीने, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या राज्यस्तरीय कार्यक्रमाचे पुणे येथील बालेवाडी मैदानावर आज शनिवार 17 ऑगस्ट रोजी आयोजन करण्यात आले आहे. या प्रसंगी मुख्यमंत्री तसेच दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार असून या कार्यक्रमाचे मिरज येथील बालगंधर्व नाट्यगृह येथे दूरदृश्यप्रणालीद्वारे प्रक्षेपण होणार आहे. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा परिषद व महानगरपालिका यांनी आपापसात योग्य तो समन्वय ठेवून कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडावा, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात गुरुवारी आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील माता-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असून त्यांची कोणतीही गैरसोय होणार नाही याची दक्षता संबंधित विभागाने घ्यावी तसेच कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सूक्ष्म नियोजन करावे असेही त्यांनी सांगितले. या आढावा बैठकीसाठी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती तृप्ती धोडमिसे, मनपा अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.विजय वाघ, महिला व बाल विकास अधिकारी संदीप यादव, बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी ) सुहास बुधवले, सर्वसाधारण तहसीलदार लीना खरात यांच्यासह इतर संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. 00000

समाधानाचे चांदणे पसरते तेव्हा ... !

सांगली, दि. 16, (जि. मा. का.) : देशाचा 78 वा स्वातंत्र्य दिन सर्वत्र उत्साही व आनंदी वातावरणात साजरा होत होता. सकाळच्या त्या रम्य व प्रसन्न वातावरणात अचानक ऐन वेळेला आनंदाच्या श्रावणसरी बरसल्या . . . ! त्याचे झाले असे की, पत्रकार नगरमध्ये राहणाऱ्या श्रीमती सोनाली कांबळे वय 35 यांच्या बँक ऑफ इंडिया (शाखा सांगली) खात्यावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत सुमारे 3 हजार रुपये जमा झाल्याचा संदेश त्यांच्या भ्रमणध्वनीवर (मोबाईल ) आला अन् एकाच वेळी त्यांच्या चेहऱ्यावर आनंद . . कौतुक . .आश्चर्य . .आणि समाधानाचे एक वेगळेच चांदणे पसरले. रक्षाबंधन हा सण येत्या सोमवारी साजरा होणार आहे, परंतु रक्षाबंधन अगोदरच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा हप्ता त्यांच्या बँक खात्यावर जमा झाल्याने त्यांच्या सर्व कुटुंबियांना मनस्वी आनंद झाला. या योजनेच्या अनुषंगाने बोलताना श्रीमती कांबळे म्हणाल्या, या योजनेमुळे मला माझ्या हक्काचे पैसे मिळाले रक्षाबंधनापूर्वीच हे पैसे मिळतील याची खात्री नव्हती परंतु तत्पूर्वीच ते मिळाले. मुख्यमंत्र्यांच्या रूपाने मला एक कर्तुत्वान भाऊ मिळाल्याचे समाधान आहे त्याबद्दल त्यांना धन्यवाद . – लाभार्थी सोनाली कांबळे 00000

मिरज येथे पालकमंत्री यांच्या उपस्थितीत आज महिला मेळाव्याचे आयोजन

सांगली, दि. 16, (जि. मा. का.) : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात पुणे येथील बालेवाडी येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये आज महिला लाभार्थ्यांसाठी मुख्य कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाचे संपूर्ण राज्यभर दूरदृश्यप्रणालीद्वारे प्रक्षेपण होणार आहे. त्या अनुषंगाने बालगंधर्व नाट्यगृह मिरज येथे आज शनिवार रोजी सकाळी 11 वाजता महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या महिला मेळाव्याचे उद्घाटन राज्याचे कामगार मंत्री तथा पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे हे करणार आहेत. या कार्यक्रमासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन महिला व बाल विकास विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. 00000 समाधानाचे चांदणे पसरते ते

शुक्रवार, २ ऑगस्ट, २०२४

धरणातून विसर्ग वाढविल्याने नदीच्या पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यतानागरिकांनी सतर्क रहावे, घाबरून जावू नये-       जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी

प्रशासनाने दिलेल्या निर्देशांचे पालन करा          सांगलीदि. 2 (जि.मा.का.) : सांगली जिल्ह्याकरीता दि.2 ऑगस्ट पासून पुढील 5 दिवसाकरीता ग्रीन अलर्ट देण्यात आला आहे. परंतु सातारा जिल्ह्याकरीतादि. 2 व 3 ऑगस्ट रोजीसाठी रेड अलर्ट आहे. दिनांक 2 ऑगस्ट रोजीच्या सायंकाळी 5 च्यास्थितीनुसार वारणा धरणात 29.61 (86 टक्के) तर कोयना धरणात 86.78 (82 टक्के) टी.एम.सी.पाणीसाठा आहे. कोयना धरणातून आज सकाळी 9 वाजल्यापासून 10 हजार क्युसेक्स विसर्गवाढविल्यामुळे आता एकूण 52 हजार 100 क्युसेक्स, वारणा धरणातून 11 हजार 532 क्युसेक्सविसर्ग सुरू आहे. अलमट्टी धरणात 55 टक्के पाणीसाठा असून 3 लाख क्युसेक्स विसर्गसुरू आहे. पर्जन्यमान, धरणातून विसर्ग यामुळे कृष्णा नदीची पाणी पातळी वाढण्याची शक्यताआहे. प्रशासन व सर्व यंत्रणा सतर्क असून नागरिकांनीही सतर्क रहावे, घाबरून जावूनये, कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, प्रशासनाकडून स्थलांतराच्या सूचना मिळताचस्थलांतर करावे, प्रशासनाने दिलेल्या निर्देशांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारीडॉ. राजा दयानिधी यांनी केले.            जिल्हाधिकारीडॉ. राजा दयानिधी म्हणाले, अतिवृष्टी व सततचा पाऊस यामुळे 116 गावे बाधित झाली आहेत.8556.05 हे.आर इतके पिक नुकसान झाले आहे. नुकसानीचे पंचनामे तातडीने करण्याचे आदेशदिले आहेत. राज्य मार्ग 5, प्रमख जिल्हा मार्ग 21 व ग्रामीण मार्ग 11 पाण्याखाली गेलेआहेत.  1 ऑगस्ट अखेर एकूण 1 हजार 173कुटुंबातील 5 हजार 145 स्त्री, पुरूष व लहान मुले स्थलांतरीत झाली आहेत. आपत्तीचामुकाबला करण्यासाठी सर्वांचे सहकार्य मिळत आहे. एक एन.डी.आर.एफ. पथक (30 जवान) दि.15 जून पासून व एक सैन्य दल पथक (107 जवान) दि. 26 जुलै पासून  जिल्ह्यात उपलब्ध आहे. त्यांच्या वतीने ठिकठिकाणीरंगीत तालीम घेण्यात आली आहे. संभाव्य वाढणाऱ्या पाण्याच्यापातळीबाबत सर्व पूर प्रवण तालुके व महानगरपालिका क्षेत्र यांना सतर्क राहण्यासाठीसूचना देण्यात आल्या आहेत. पाणी पातळी वाढ होत असल्याचे निदर्शनास येताच तात्काळनागरिक व जनावरांचे स्थलांतर करण्याबाबत सर्व संबंधित विभागांना सूचना देण्यात आलेल्याआहेत. पाण्याखाली गेलेले रस्ते व पूल या ठिकाणी बॅरिकेट करून रस्ते बंद करण्यात आलेआहेत. वीज पुरवठा खंडीत झालेल्या ठिकाणी पूराचे पाणी ओसरल्यानंतर तात्काळ वीजपुरवठा सुरळीत करण्याच्या सूचना दिल्या आहेत. ज्या ठिकाणी महत्वाचे पूल, रस्ते या ठिकाणीपूराचे पाणी पाहण्याकरीता गर्दी होते त्या ठिकाणी पुरेशा प्रमाणात पोलीस बंदोबस्तठेवण्यात आला असून प्रतिबंधात्मक आदेशही जारी करण्यात आले आहेत. जीवाला धोका पोहचेलअसे कृत्य करू नये, असे कोणी आढळल्यास त्याच्यावर कारवाई करण्यात येईल, असा इशाराहीजिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी दिला आहे.00000

गुरुवार, १ ऑगस्ट, २०२४

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे साहित्य जगाला प्रेरणादायी - पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे

सांगली, दि. 1, (जि. मा. का.) : केवळ दीड दिवसाच्या शाळेत शिकलेले परंतु आपल्या अलौकिक प्रतिभेने सरस्वतीची सेवा करणारे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठेंचे साहित्य हे केवळ महाराष्ट्रालाच नाही तर जगाला प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी केले. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठेंच्या मूळ गावी वाटेगाव येथे 104 व्या जयंतीनिमित्त त्यांच्या अर्ध पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर मुख्य कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर आमदार सदाभाऊ खोत, आमदार सुमनताई पाटील, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे पणतू राजरत्न आंबेडकर, वाटेगावच्या सरपंच नंदा चौगुले, उपसरपंच सोनाली पाटील, अण्णाभाऊ साठे यांच्या स्नुषा श्रीमती सावित्रीबाई साठे तसेच नातू सचिन साठे आदी उपस्थित होते. ते पुढे म्हणाले की, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांनी आपली लेखणी ही समाजातील उपेक्षित वंचितांच्या तसेच कामगारांच्या प्रश्नांसाठी वापरली. त्यांनी संपूर्ण जगाला समतेचा विचार दिला. तसेच वाटेगाव च्या विकासासंदर्भात आपण लवकरच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना भेटणार असल्याचे सांगितले. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या नावाने वाटेगाव येथे आदर्श शैक्षणिक संकुल उभा राहावे यासाठी यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आमदार सदाभाऊ खोत यांनी सांगितले तर साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे नातू सचिन साठे म्हणाले, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठेंची साहित्य निर्मिती ही वेदनेच्या आधारावर उभी होती. अण्णा भाऊ साठेंनी त्यांनी आपल्या लेखनाद्वारे शोषित समाजातील दैन्य, दुःख, दारिद्र्य यांचे वास्तव मांडले तसेच शाहीरीद्वारे (पोवाडा ) तत्कालीन समाज व्यवस्थेमध्ये समता आणि बंधुतेचा विचार घेऊन समाजाला पुढे जाता येईल असा विचार मांडला. प्रारंभी बार्टीचे व्यवस्थापक सत्येंद्रनाथ चव्हाण यांनी बार्टीद्वारे सुमारे दहा कोटी रुपयांच्या पुस्तकांची खरेदी करण्यात येणार असल्याचे प्रास्ताविकामध्ये सांगितले. यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते बार्टीतर्फे उभारण्यात आलेल्या ग्रंथालयाचे फित कापून उद्घाटन केले. याप्रसंगी इस्लामपूरचे माजी नगराध्यक्ष निशिकांत भोसले-पाटील, सम्राट महाडीक, सत्यजित देशमुख, जिल्हा जात प्रमाणपत्र समितीच्या अध्यक्ष श्रीमती नंदिनी आवाडे, समाज कल्याण सहायक आयुक्त जयंत चाचरकर यांच्यासह साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना अभिवादन करण्यासाठी राज्यभरातून आलेले नागरिक मोठ्या संखेने उपस्थित होते. ०००००