शनिवार, १७ ऑगस्ट, २०२४

शहरी भागातील एक लाखाहून अधिक महिला लाभार्थी - मनपा आयुक्त शुभम गुप्ता

सांगली दि. 17 (जि.मा.का.) : महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्याच्या हेतूने 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना' सुरू करण्यात आली. या योजनेचे 14 ऑगस्ट पासून पात्र महिला लाभार्थीच्या खात्यावर पैसे जमा झाले. शहरी भागातील सुमारे 1 लाख 25 हजाराहून अधिक महिलांनी यासाठी अर्ज केला असून त्यापैकी 75 हजाराच्या आसपास महिलांच्या खात्यावर थेट 3 हजार रुपये जमा झाले असून उर्वरित 50 हजार महिलांच्या खात्यावर रक्षाबंधन कालावधीपर्यंत पैसे जमा होतील, अशी माहिती मनपा आयुक्त शुभम गुप्ता यांनी दिली. मिरज येथील बालगंधर्व नाट्यगृहाच्या ठिकाणी आज महिला मेळावा आयोजित करण्यात आला होता. ते पुढे म्हणाले, उर्वरित महिलांच्या खात्यातही लवकरच या योजनेचे पैसे जमा होतील. या कामी माहिलांनी सहकार्य करावे. अतिशय कमी कालावधीमध्ये मनपाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी ही मोहीम यशस्वीरित्या पार पाडल्याबद्दल त्यांनी सर्व संबंधित कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. यावेळी मनपा अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, उपायुक्त शिल्पा दरेकर, प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या नंदिनी घाणेकर तसेच जिल्हा महिला व बालविकास अधिकारी संदीप यादव आदी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा