बुधवार, १० ऑगस्ट, २०१६

निरोप घेते, माझा राम राम घ्यावा...

सांगली-मिरजकरांनो! तुमचा निरोप घेते, माझा राम राम घ्यावा... खरं तर मला खूप भरून आलंय. आज माझ्या हातून जे पुण्याचं काम झालंय, ते तुमच्यामुळेच... मला जलराणी हे नावही तुम्हीच दिलंय... आज मला निरोप देण्यासाठी तुम्ही सगळे मोठ्या संख्येने मिरज रेल्वे स्थानकावर आला आहात. गेल्या चार महिन्यात आपल्यात एक नातं निर्माण झाले होते. तरीही पुन्हा तुमची भेट या कारणासाठी होऊ नये, असंच मला वाटतंय.
5 एप्रिलपासून लातूरला मिरजहून रेल्वेद्वारे पाणी देण्याची लगबग सुरू झाली. त्यासाठी राजस्थानमधील कोटा येथे माझं रंगरुप सारंच बदललं. मला स्टीम क्लीन्ड करण्यात आलं. नेहमी इंधन वाहून नेणारी माझी ओळख बदलून आता मी लातूरकरांना जीवनवाहिनी ठरणार होते. माझं मला ओळखेना, पटेना की मीच ही आहे. माझं सौंदर्य झळाळत होतं ते आत्मिक समाधानामुळे. तिथून निघून मजल दरमजल करत 9 एप्रिलला मी मिरज रेल्वे स्थानकावर आले. तिथं लेकीच्या लग्नाला वधुपित्याची धावपळ सुरू असते तशी परिस्थिती.. कृती आराखडा झाला होता. तांत्रिक मंजुरी आली होती. आवश्यक जलवाहिन्या, पंप, मनुष्यबळाची आखणी.. प्रशासनाची यंत्रणा तहानभूक हरपून छोट्या छोट्या गोष्टींंचेही नियोजन करत होती. एकाच वेळी अनेक कामे सुरू होती.
आता थांबून चालणार नव्हतं. त्यामुळे उपलब्ध यंत्रणेद्वारे लातूरला पाणी द्यायचे माझ्या पालकांनी म्हणजे रेल्वे प्रशासनाने ठरवलं. तो दिवस होता 11 एप्रिल 2016... वेळ सकाळी 11 ची... मिरज रेल्वे स्थानकावर गर्दी नेहमीचीच. पण त्यादिवशी एक वेगळं कारण समाजोपयोगी कारण होतं. लातूरला पाणी घेऊन मला जायचं होतं. मला खूप अभिमान वाटत होता. प्रशासनाबरोबर मीही माझा खारूताईचा वाटा उचलणार होते. त्यादिवशी सकाळी 11 वाजून 11 मिनिटांनी 5 लाख लिटर्स पाणी घेऊन मी  निघाले. दुसऱ्या दिवशी मी लातूरला पोहोचले. तेव्हा मला खूप भरून आलं. लातूरकर डोळ्यात प्राण आणून माझी वाट बघत होते. मी त्यांच्यासाठी जीवनाची नवी उमेद घेऊन गेले होते.  भल्या पहाटे तिथं प्रशासन आणि जनता हजर होती. माझ्या स्वागतासाठी हार-फुले घेऊन उभी होती. मनातून सांगलीकरांना धन्यवाद देत होती, हे मी अनुभवलंय.
त्यानंतर दुसरा टप्पा सुरू झाला. 19 एप्रिलला मी पुन्हा सज्ज झाले. माझी सगळी क्षमता वापरली. माझ्या सर्व 50 व्हॅगन्स भरल्या गेल्या. आता 25 लाख लिटर्स पाणी घेऊन मी चालले होते. जास्तीत जास्त लोकांची तहान मी भागवणार होते. सगळ्यांच्या नजरा माझ्यावर होत्या. लाईटस्... कॅमेरे... आणि ऍ़क्शन.. स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर माझे नाव झाले होते. तेव्हा आनंदानं माझ्या डोळ्यात आसवं तरळली. तेव्हापासून 8 ऑगस्टअखेर हा प्रवास सुरू होता. मध्ये मी जरा विश्रांती घेतली. ती नव्या जोमाने पळण्यासाठी..
पण, आता वरूणदेवतेच्या कृपेने लातूरला पुरेसा पाऊस झालाय. लातूरवर अशी वेळ पुन्हा कधी येऊ नये. वरूणराजाची कृपा त्या भागावर नेहमी व्हावी, अशी प्रार्थना करत मी आपली रजा घेतेय. इतिहासात माझी दखल सुवर्णअक्षरांनी घेतलीय, याचे समाधान सोबत घेऊन...
   संप्रदा द. बीडकर
   जिल्हा माहिती अधिकारी

                                                                  

 सांगली

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा