मंगळवार, ३० ऑगस्ट, २०१६

मरावे परी अवयवरूपी उरावे

जन्म आणि मृत्यू यांच्यामध्ये जीवन आहे. प्रत्येक व्यक्तीला जीवनाची आस सोडवत नाही. परंतु, मृत्यु अटळ आहे. मृत्युनंतरही आपण जिवंत राहू शकतो, ते म्हणजे अवयवदानाने. सध्याच्या जगात शाश्वत मूल्य हे अवयवदानाचे आहे. हा संस्कार आपण सर्वांनी अंगी बाणवून मरावे परी अवयवरूपी उरावे, हा संकल्प करूया.
खरं तर अवयवदानाचे महत्त्व मला व्यक्तिगत आयुष्यात समजले आहे. माझ्या आईला यकृताचा आजार होता. त्यावर केवळ यकृत प्रत्यारोपण हाच एकमेव उपाय सर्व तज्ज्ञांनी सांगितला. प्रत्यारोपणाची गरज असणारे अनेक रूग्ण अवयवांच्या प्रतीक्षेत आहेत. ही यादी मोठी आणि वाढत चाललेली आहे. त्यामुळे माझ्या आईला वेळेत यकृत मिळू शकले नाही आणि परिणामी आज मी माझ्या आईला हरवून बसले आहे. माझ्या या अनुभवावरून अवयवदानाचे महत्त्व मला जाणवले.
जगात सर्वप्रथम बोस्टनमध्ये जिवंत दात्याचे मूत्रपिंड प्रत्यारोपण 1954 साली झाले. रोनाल्ड ली हेरिक यांनी त्यांच्या जुळ्या भावाला त्यांचे एक मूत्रपिंड दान केले होते. त्यामुळे हे शक्य झाले. 1963 साली पहिल्यांदा फुफ्फुस प्रत्यारोपण, 1967 साली पहिल्यांदा यकृत प्रत्यारोपण आणि हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आल्या. अवयव प्रत्यारोपणातील संशोधनासाठी 2010 साली जोसेफ मरे यांना वैद्यकीय क्षेत्रातील नोबेल पुरस्काराने गौरवण्यात आले.
विविध अवयवांच्या प्रतीक्षेत आज अनेक रूग्ण आहेत. यामध्ये भारतात मूत्रपिंडासाठी किमान 5 लाख, यकृतासाठी 50 हजार आणि हृदयासाठी 2 हजार रूग्ण वाट पाहात आहेत. सद्यस्थितीत राज्यभरात सुमारे 12 हजार पेक्षा अधिक रुग्ण अवयव मिळण्याच्या प्रतिक्षेत आहेत. अशा वेळी मृत्युनंतर अवयवदान केल्यास एखाद्याला जीवनदान केल्यासमान आहे. हे पुण्य मोजता येणारे आहे. मुंबई हल्ल्यातील शहीद हेमंत करकरे यांच्या पत्नी कविता यांनी अवयवदान केल्याने आज तीन व्यक्तिंना जीवनदान मिळाले आहे. अशा अवयवदानाने एक व्यक्ती अनेकांचे जीवन फुलवू शकते. हे दान अमूल्य आहे.
दुसरीकडे वेळेत अवयव मिळाल्यामुळे राज्य आणि देश मोठमोठ्या व्यक्तींना गमावून बसला आहे. याची समाजात उदाहरणे आहेत. त्यामुळे सर्व माणसांनी आपल्या देहाचा वापर चांगल्या कामासाठी करावा. अवयवदानाबाबत अनेक गैरसमज आहेत. जिवंत अवयवदान केल्यास प्रकृतीला कोणताही धोका नसतो. समुपदेशन केल्यास लोकांचे मन वळवता येईल.
सध्या अद्ययावत तंत्रज्ञानाने अवयव प्रत्यारोपण शक्य झाले आहे. यामुळे विविध गंभीर आजारांवर उपचार साध्य होत आहेत. रक्तदान, नेत्रदानाच्या पलीकडे जावून इतर अवयवदानाची मोठी चळवळ उभी राहणे गरजेचे आहे. अवयवदाना अंतर्गत जिवंत व्यक्तीचे एक मूत्रपिंड किंवा यकृताचा तुकडा प्रत्यारोपण करण्यात येतो. तसेच कॅडेव्हर/ मस्तिष्क स्तंभ मृत पश्चात मूत्रपिंड, यकृत, हृदय, त्वचा, फुफ्फुस इत्यादी अवयव दान करता येतात. अवयवदाते स्वेच्छेने पुढे आल्यास ही चळवळ पुढे नेता येईल. एकप्रकारे हा पुनर्जन्मच म्हणता येईल.
संप्रदा द. बीडकर 

जिल्हा माहिती अधिकारी

सांगली 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा