बुधवार, १ नोव्हेंबर, २०१७

मागेल त्याला शेततळे योजनेचा झाला फायदा

महाराष्ट्र शासनाच्या कृषि विभागाच्या कल्याणकारी योजनांनी ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या जीवनात हरियाली आली आहे. मिरज तालुक्यातील बोलवाड येथील शेतकरी महावीर सुरगौडा पाटील हे त्यापैकीच एक. त्यांनी मागेल त्याला शेततळे योजनेंतर्गत शेततळे काढून ठिबकव्दारे योग्य पाणी व्यवस्थापन केले. यामुळे त्यांनी त्यांचे सर्वक्षेत्र पाण्याखाली आणून विविध पिके घेऊन उत्पादनात वाढ केली. याचा त्यांना आर्थिक फायदा होत आहे.
महावीर पाटील यांची एक जुनी सामाईक विहीर व एक बोअर आहे. विहिरीची आठवड्यातून तीन दिवसाची पाळी ठरलेली असायची. विहीर मात्र सात किंवा आठ महिने चालायची. जानेवारी-फेब्रुवारी नंतर चार ते पाच महिने कोरडीच असायची. 12 एकर जमीन हंगामी पीक ते घ्यायचे. त्यांनी द्राक्ष बागेचा विचार केला पण वर्षभर पाणी देता येत नसल्यामुळे बागेचा नाद सोडून दिला. नंतर नदीहून लिफ्ट करून पाणी आणण्याचा विचार केला. वैयक्तिकरीत्या हे काम करणे शक्य दिसेना म्हणून 2006-2007 मध्ये श्री चंद्रप्रभू शेती पाणी पुरवठा सहकारी लिफ्ट इरिगेशन संस्था स्थापन केली. एकूण 22 शेतकरी एकत्र येवून 100 एकरासाठी पाणी आणण्याचे काम पूर्ण केले. द्राक्षे, उस, हळद तसेच सोयाबीन, भुईमूग, गहू, शाळू व हरभरा पिके करायला सुरूवात केली.
याबाबत महावीर पाटील म्हणाले, पूर्वी इरिगेशनचे पाणी सरळ विहिरीत टाकायचे व साठवून तेथून पिकांना देत असू. पण, विहिरीत टाकलेले 30 ते 40 टक्के पाणी जमिनीत मुरायचे. आम्ही 12 एकरापैकी 7 ते 8 एकर पिकाखाली आणले. द्राक्षे व ऊस पिके ठिबक योजनेखाली आणली. त्यामुळे पाणी व्यवस्थित पुरायला लागले. परंतु, विहिरीत मुरायचे चालूच होते. त्यासाठी काहीतरी करावे विचारात असतानाच 2015-16 मध्ये कृषि विभागाची मागेल त्याला शेततळे योजना जाहीर  झाली. या योजनेंतर्गत मी ऑनलाईन अर्ज सादर केला आणि मार्च 2016 मध्ये शेततळे काढण्याचा कार्यारंभ आदेश मला प्राप्त झाला.
त्यानंतर कृषि सहाय्यक श्री. कुलकर्णी यांनी 20/20/3 मीटर आकारमानाचे शेततळ्याची आखणी करून दिली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली 8 लाख 76 हजार लीटर क्षमतेचे शेततळे खोदून पूर्ण केले. इरिगेशनचे पाणी विहिरीत सोडण्यापेक्षा शेततळ्यातच टाकणे सुरू केले. त्यामुळे 30 ते 40 टक्के पाणी वाया जायचा प्रश्न निकालात निघाला आहे. त्यानंतर उर्वरित क्षेत्र ठिबकखाली आणून संपूर्ण 12 एकर क्षेत्र बागायती पिकाखाली आणले.
अशा तऱ्हेने शेततळे व ठिबक संचामुळे पाण्याची उत्तम बचत होवून संपूर्ण क्षेत्र बागायतीखाली आणले आहे. कृषि विभागाचे अधिकारी यांचे वेळोवेळीचे तांत्रिक मार्गदर्शन आणि शेततळे व ठिबकसंचाचे अनुदान मिळाल्यामुळे चांगला आर्थिक हातभार लागून उत्पादनात चांगली वाढ झालेली आहे. असाच फायदा कृषि विभागाच्या योजनांमुळे गावातील तरूण शेतकऱ्यांना होत आहे.
सध्या ऊस 2 हे. कोएम 86032, हळद 0.70 हे. (सेलम 0.45 / नवीन जात मेघा 0.30 हे.), द्राक्षे 0.80 हे. नविन लागण डॉगरेज, आंतरपीक झेंडू, नवीन ऊस लागण सरी सोडून तयार व भोंड्यावर मिरची लागण केलेली आहे. कृषि विभागाच्या अधिकाऱ्यांशी गावची नाळ चांगली जोडल्यामुळे फायदाच फायदा होत असल्याचे महावीर पाटील म्हणाले.

                          जिल्हा माहिती कार्यालय,
सांगली

00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा