शनिवार, २ फेब्रुवारी, २०१९

कृषी क्षेत्रातून 8 लाख कोटी रुपयांचा निर्यात करता येणार - केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री सुरेश प्रभू

 - स्थानिक कृषी उत्पादनांसाठी देशभरातील विमानतळांवरुन जीआय स्टॉल उभारले जाणार

सांगली, दि. 2, (जि. मा. का.) : शेतमाल निर्यातीसाठी ऍ़ग्रीकल्चरल एक्सपोर्ट पॉलिसीला केंद्र सरकारने मान्यता दिली असून पुढच्या काही वर्षात 8 लाख कोटी रुपयांचा निर्यात करण्यात येणार आहे. त्यादृष्टीने वेगवेगळ्या भौगोलिक क्षेत्रात वेगवेगळ्या कृषी उत्पादनाचे हब निर्माण करण्यात येत आहेत. स्थानिक भौगोलिक क्षेत्राला स्थानिक कृषी उत्पादनाचा फायदा व्हावा यासाठी भौगोलिक नामांकन नोंदणी (Geographical indication) करण्यात येईल. त्याचा कायमचा फायदा संबधित क्षेत्राला शेतकऱ्यांना होईल. देशातील प्रत्येक विमानतळावर किमान एक जीआय स्टॉल असेल ज्यामधून केवळ स्थानिक लोकांनी उत्पादित केलेल्या मालाचीच विक्री करण्यात येईल. याची सुरवात गोव्यातून  झाली आहे. लवकरच असे 200 स्टॉल देशभरातील विमानतळांवरुन सुरु करण्यात येतील, असे प्रतिपादन केंद्रीय वाणिज्य उद्योग मंत्री सुरेश प्रभु यांनी केले.
तासगाव येथे झालेल्या सांगली-तासगांव बेदाणा मर्चंटस् असोसिएशनच्या रौप्यमहोत्सवी सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय वाणिज्य उद्योग मंत्री सुरेश प्रभु होते. प्रमुख पाहुणे केंद्रीय कृषी राज्यमंत्री गजेंद्रसिंह शेखावत, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष तथा खासदार संजय पाटील, आमदार प्रशांत परिचारक, आमदार सुरेश खाडे, एमएसईबीच्या संचालक निता केळकर, माजी आमदार दिनकर पाटील, तासगावचे नगराध्यक्ष विजय सावंत, सांगली - तासगाव बेदाणा मर्चटस् असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष अशोक बाफना, अध्यक्ष मनोज मालू, उपाध्यक्ष कुमार शेटे, सचिव विनायक कैलास हिंगमिरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी केंद्रीय वाणिज्य उद्योग मंत्री सुरेश प्रभू म्हणाले, देशाची दोनतृतिअंश लोकसंख्या शेती अधारित उद्योगांवर अवलंबून आहे. देशाच्या एकूण उत्पन्नात याचा वाटा 16 टक्के आहे. ही व्यवस्था बदलण्यासाठी शासन प्रयत्नशिल असून त्यासाठी अनेक निरनिराळे व्यवसाय शेतीशी जोडले जात आहेत. शेतकरी हाच विकासाचा केंद्रबिंदू मानून शेती आणि शेतकरी यांच्या उन्नतीसाठी प्रयत्न केले  जात आहेत. सहकार पुर्णजिवित करुन शेतकऱ्यांना त्याचा फायदा व्हावा यासाठी सरकार प्रयत्नशिल आहे. चीन, युरोपियन युनियन, अमेरिका या सारख्या देशांमध्ये सांगलीची द्राक्षे जास्तीत जास्त प्रमाणात कशी पाठविता येतील यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचे सांगून, दुबई अन्य अखाती देशांमध्ये भाजीपाला निर्यातीला प्रचंड वाव आहे. हे देश पायाभूत सुविधासाठी भारतामध्ये गुंतवणूक करण्यासही तयार आहेत. येत्या काही दिवसात याचीही सुरुवात होईल असेही त्यांनी सांगितले.
कोल्हापूर ते वैभववाडी या रेल्वेमार्गाच्या माध्यमातून या भागातील कृषीमालाला परदेशी पाठविण्यासाठी रेल्वेमार्गाने कोकणातील बंदर जोडण्यासाठीही प्रयत्नशिल असल्याचे सांगून केंद्रीय वाणिज्य उद्योग मंत्री सुरेश प्रभू म्हणाले, महिला बचतगट शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला माल मार्केटींगसाठी जीईएमच्या माध्यमातून जागतिकस्तरावर पोहचविला जाईल. देशाच्या इतिहास प्रथमच नॅशनल डॉमॅस्टिक गोल्ड कॉन्सीलची स्थापना करण्यात येत असल्याने याचा फायदा सोने व्यवसायातील सर्व घटकांना होईल. असेही त्यांनी यावेळी सांगितले.
केंद्रीय कृषी राज्यमंत्री गजेद्रसिंह शेखावत म्हणाले, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे शासनाचे उदिष्ट असून त्यादृष्टीने अनेक प्रयत्न केले जात आहेत. आज कृषी क्षेत्रात झालेल्या संशोधनाच्या सहाय्याने भारताने मोठी प्रगती केली असून, भारत हा जगातील प्रमुख निर्यातक्षम देश झाला आहे. दूध, कापूस, ऊस, तेलबीय, मत्स्य, अन्नधान्य यांचा प्रमुख निर्यातक्षम देश भारत आहे. अतिरिक्त उत्पादनस्थितीत शेतमालाला चांगला दर मिळणे आवश्यक आहे. त्यासाठी उत्पादनाबारोबरच मोठ्या प्रमाणावर प्रक्रिया उद्योग महत्वाचे आहेत. उत्पादन केंद्रीततेतून पुढे जाऊन शेतकऱ्यांसाठी लाभ केंद्रीत शेती झाली पाहिजे. कृष्णा खोऱ्यातील प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पारंपारिक पिकांना फाटा देऊन परिस्थितील बदल स्विकारत शेतीत अनेक बदल केले आहेत. याबद्दल द्राक्ष उत्पादक शेतकरी उद्योजक यांचे त्यांनी अभिनंदन केले. द्राक्षांवर उत्कृष्ट प्रक्रिया करुन बेदाणा निर्मितीत आघाडी घेतल्याबाबदल येथील शेतकऱ्यांचे कौतुकही केले. बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्यांवर सकारात्मक तोडगा काढण्यासाठी सर्वोतोपरी सहाय्य करण्यात येईल असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष तथा खासदार संजय पाटील म्हणाले, जिल्ह्यात नॅशनल हायवे कामांच्या माध्यमातून साडेसात हजार कोटी रुपयांची कामे करण्यात येत आहेत. जिल्ह्यातील नागरिक शेतकरी यांना दळणवळणासाठी याचा मोठ्याप्रमाणावर फायदा होणार आहे. या ठिकाणी ड्रायपोर्ट लवकरच सुरु होईल. ताकारी, टेंभू, म्हैसाळच्या माध्यमातून या भागाला पाणी देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आहे. मे अखेर पर्यंत या योजनांमधील 1 हजार कोटींची कामे पूर्ण होतील असे स्पष्ट केले. यावेळी त्यांनी बेदाणा असोसिएशनच्या कामाचे कौतुक केले.
बेदणा असोसिएशनचे अध्यक्ष मनोज मालू यांनी प्रास्ताविकात ड्रायपोर्टचे काम लवकरच सुरु करावे, असे आवाहन करुन बेदाणा बोर्ड स्थापन करावे त्याचे अध्यक्ष व्यापारीच असावेत अशी अपेक्षा व्यक्त करुन व्यापाऱ्यांना आलेल्या सेवाकराच्या नोटीसांच्या प्रश्नावर लवकरच मार्ग काढावा अशी मागणी केली.
यावेळी जिल्हा कृषी अधिक्षक राजेंद्र साबळे, मकरंद कुलकर्णी, सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे नगरसेवक शेखर इनामदार, मकरंद देशपांडे यांच्यासह व्यापारी, शेतकरी, गलई बांधव, कृषी उत्पन्न बाजर समितीचे पदाधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे आभार राजू लोहार यांनी मानले.

000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा