बुधवार, ६ फेब्रुवारी, २०१९

वाहतूक नियमांची शिस्त पाळा - अपघात टाळा


           आजच्या धावत्या जगात वाहन ही गरज बनली आहे. प्रत्येक कुटुंबात किमान एक वाहन आज आपल्या निदर्शनास येत आहे. आजच्या परिस्थितीमध्ये चार चाकी बरोबरच दुचाकी वाहनांची संख्या झपाट्याने वाढत आहे. रस्त्यावरील अडथळे पार करीत  चालकाला वाहन चालवताना कसरत करावी लागते. वाहन चालवताना चालकाने योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. बऱ्याच वेळी अपघाताला केवळ वाहनचालकाचा हलगर्जीपणाच कारणीभूत असल्याचे पाहणीत दिसून आलेले आहे. यासाठीच वाहन चालविताना प्रत्येकाने योग्य ती दक्षता घेण्याची गरज असून वाहतुकीच्या नियमाचे उल्लंघन होणार नाही याची काळजी घ्यावी. यासाठी दिनांक 4 ते 10 फेब्रुवारी या कालावधीत 30 वा राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताहाच्या माध्यमातून परिवहन विभागामार्फत समाजात विशेषत: युवावर्गात वाहन चालवताना घ्यावयाच्या काळजीबाबत जनजागृतीचा कार्यक्रम जिल्ह्यात राबविण्यात येत आहे.

    रस्ते सुरक्षा हे ध्येय समोर ठेऊन मोटार वाहन कायदा 1939 संपूर्ण देशात लागू झाला. या कायद्याने रस्ते दळणवळण यामध्ये होणारे तांत्रिक बदल, माल वाहतूक तसेच प्रवासी वाहतूक यांचे सुलभरित्या दळणवळण रस्त्यांचे देशभर जाळे पसरवणे विकास करणे, मोटार वाहनांसंबंधी असलेल्या व्यवस्थापनेमध्ये सुधारणा करणे अशी मूळ उद्दिष्टे समोर ठेवून मोटार वाहन कायदा बनविण्यात आला आहे. महाराष्ट्रात विविध कर विषयक कायदे यातील तरतुदींची अंमलबजावणी करण्याकरिता राज्यातील मोटार वाहन विभागाची 1 एप्रिल 1940 साली स्थापना करण्यात आली.
मोटार वाहन विभागातील कामकाज
    मोटार वाहन कायदा 1988 त्याखालील केंद्राने महाराष्ट्र राज्याने तयार केलेल्या त्यांच्या विविध तरतुदींची अंमल बजावणी करणे, रस्ता वाहतुकीच्या लोकांच्या गरजा हित लक्षात घेऊन वाहनांना परवाना देणे, त्याव्दारे माल प्रवासी वाहतुकीस गती संरक्षण देणे, रस्त्यावरील वाहतूक धंद्याच्या सर्वागीण वाढीच्या दृष्टीने समन्वय साधून त्या व्यवसायाच्या प्रगतीस वाव देणे त्यावर नियंत्रण ठेवणे, मोटार वाहन कर कायदा 1958 मुंबई मोटार वाहन (प्रवासी कर) कायदा, 1958 नुसार कर आकारणी कर वसुलीव्दारे राज्य शासनाला महसूल प्राप्त करुन देणे, मोटार वाहन चालविण्यासाठी अनुज्ञप्ती देणे त्याचे नुतनीकरण करणे, चालकांना प्रवासी वाहनांची लायसेन्स देणे त्याचे नूतनीकरण करणे, मोटार वाहन चालविण्याचे शिक्षण देणाऱ्या संस्थांना प्राधिकृत करणे, टप्पा बस गाड्यांच्या वाहकांना लायसेन्स देणे त्यावर प्रतिस्वाक्षरी करणे, आंतरराष्ट्रीय वाहन चालकांचा परवाना देणे, मोटार वाहनांची नोंदणी करणे, परिवहनांना योग्यता प्रमाणपत्र देणे, आंतरराज्य वाहतूक करण्यासाठी वाहनांना परवाने देणे त्यावर नियंत्रण ठेवणे, अखिल भारतीय पर्यटक बस टॅक्सीसाठी परवाने देणे, मोटार वाहनांच्या  विमा विषयक नोंदी ठेवणे, मोटार कायदा कर विषयक कायद्यातील तरतुदींचे उल्लंघन करण्याविरुध्द खातेनिहाय कारवाई करणे अगर न्यायालयीन कारवाई करणे, वाहनापासून होणाऱ्या प्रदूषणावर नियंत्रण ठेवणे, प्रदूषणकारी वाहनांवर कारवाई करणे, आदि कामे परिवहन विभागाला देण्यात आली.
    माणसांचा सरासरी प्रवास दिवसेंदिवस वाढत चाललाय. पूर्वी तो दिवसाला 5 ते 6 कि.मी असायचा. आज तो 50 ते 60 कि.मी. पर्यंत सरासरी प्रवास वाढलाय. त्यामुळे वाहनांची गरज वाढत आहे, रस्त्यावर वाहनांची गर्दी वाढत आहे, तंत्रज्ञानाच्या झालेल्या बदलामुळे वाहनांची गती वाढत आहे. त्याच प्रमाणात अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे वाहन चालवतांना फारच काळजीपूर्वक वाहन चालवणे आवश्यक आहे. थोडासाही निष्काळजीपणा अथवा चूक अपघातास कारणीभूत होऊ शकते. रस्त्यावरील अपघातांची वाढती संख्या लक्षात  घेता आपली वाहने सुस्थितीत ठेऊन आपले चालक कौशल्य पणाला लावले पाहिजे. त्याकरिता सर्व वाहन धारक चालक यांनी आपले वाहन सुस्थितीत ठेवण्यासाठी वारंवार वाहनाची देखभाल करुन वंगण, हवा, पाणी इंधन यावर लक्ष ठेवावे. दुसरा महत्वाचा घटक म्हणजे वाहन चालक कौशल्य चालकाच्या चांगल्या सवयी लक्षात ठेवाव्यात.
आदर्श वाहनचालक होण्यासाठी
    योग्य दिशेने आणि योग्य वेगमर्यादेने वाहन चालविणे ही वाहचालकांची सर्वप्रथम जबाबदारी आहे. रस्त्यावर  ठिकठिकाणी वाहनांचा वेग किती असावा असे लिहिलेले असते त्याचे पालन करा. अधिक वेगाने वाहन चालवू नका. डाव्या बाजूला अथवा उजव्या बाजूला वळण्याआधी इंडीकेटर अवश्य चालू करा. त्यामुळे मागे असणारे वाहन सावध होईल. ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न कराल तर उत्तम आणि जर करायचेच असेल तर दिवसा हॉर्नचा आणि रात्रीच्यावेळी डिप्परचा उपयोग करा. तुमच्यापुढे असलेले वाहन तुम्हाला पुढे जाण्यासाठी रस्ता देईपर्यत वाट पहा. रात्रीच्यावेळी वाहनाचे हेडलाईट चालू ठेवा. रस्त्यावर ठिकठिकाणी सुरक्षाविषयक चिन्हे लावलेली असतात "नो यु टर्न, " नो राईट टर्न, वन वे ट्राफिक" इत्यादी या चिन्हांचा वापर करा. ट्राफिक नियमांचे पालन करा. वाहन तपासणी अधिकारी यांनी दिलेल्या इशाऱ्यावर थांबा. आवश्यक कागदपत्रे दाखवा.
वाहन चालवताना या गोष्टी कटाक्षाने पाळा
वाहन चालवताना सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे  एकाग्रता असणे. वाहन चालवत असतांना कानात इअर फोन लावून गाणी ऐकत बसू नका. समोरील सिग्नल दुर्लक्षित होऊ शकतो. डाव्या बाजूने ओव्हरटेक करु नका. अपवादात्मक परिस्थितीत समोरील वाहन उजव्या बाजूला वळत असेल तर डाव्या बाजूने ओव्हरटेक करा. वाहन चालवत असताना मोबाईल फोन अथवा गप्पा मारत वाहन चालवू नका. मोबाईलवर बोलायचे असल्यास वाहन रस्त्याच्या बाजूला सुरक्षितरित्या उभे करुनच बोला. वाहन तपासणी अधिकारी यांनी थांबवण्याचा इशारा केला असता वाहन वेगाने पळवून नेऊ नका. चूक झाल्यास चूक मान्य करा. तपासणी  अधिकाऱ्यासोबत वाद घालू नका.
    दुचाकीवर हेल्मेट आवर्जून वापरा, चारचाकी वाहन चालवताना सीटबेल्ट अवश्य वापरा. शक्यतो रात्रीचा प्रवास टाळा. वाहनास योग्य आरसे बसवा. वेग मर्यादेचे उल्लंघन करु नका. वाहन चालविण्यापूर्वी टायर्समध्ये हवेचा दाब तपासा. गाडीची ऑईल गळती होते का ते पहा. गाडीचे ब्रेक व्यवस्थित लागतात की नाही याची खात्री करा.
    वाहन अपघातग्रस्त झाल्यास अपघातात हानी झालेल्या व्यक्तीस अथवा वारसास नुकसान भरपाई मिळण्याकरिता सुविधा आहेत. मोटार वाहनाचा विमा योग्य वेळी करुन घ्यावा. यामुळे अपघात झाल्यास स्वत:चे व पुढील अपघातग्रस्त व्यक्तीसही त्यांची नुकसान भरपाई मिळते. अपघात विमा असल्यामुळे अपघात दावा न्यायधिकरण येथे नुकसान भरपाईकरिता दावा करता येईल. विशिष्ट प्रकरणामध्ये ना कसूर भरपाई देण्याचे दायित्व - पदपथावरुन जाणाऱ्या निष्पाप पादचाऱ्याचा मोटार अपघातात मृत्यू झाल्यास अथवा जबर जखमी झाला, त्या अपघातात मोटार चालकाचा दोष असो वा नसो सामाजिक न्यायाच्या भावनेतून त्या अपघातग्रस्त व्यक्तीला नुकसान भरपाई मिळू शकेल.
क्षणाच्या दुर्लक्षामुळे अपघातात जीव जाण्याची शक्यता असते किंवा कायमचे अपंगत्व येते  यासाठी वाहन चालवितांना प्रत्येकांने जबाबदारीने, काळजीपूर्वक वेळेचे भान राखून वाहन चालविल्यास निश्चितच अपघाताचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल. यासाठी रस्ता सुरक्षा विषयक फिल्म बॅनर्स पोस्टर्स लावणे, बैलगाडी, ट्रॅक्टर ट्रेलर रेडीयम रिफ्लेक्टर लावणे, फॅन्सी नंबर प्लेट ओव्हरसीट वाहन तपासणी, ओव्हरलोड वाहतूक मद्यपानामुळे होणारे अपघात तसेच रस्ता अपघात कारणे रस्ता सुरक्षा कायदे व्याख्यान, रस्ता सुरक्षा सप्ताह प्रबोधन रॅली, नो हॉकींग रस्ता सुरक्षाबाबत व्याख्यान, वाहन चालक यांचे वैद्यकीय नेत्र तपासणी, धोकादायक रसायन वाहतूक रस्ता सुरक्षा कायदे व्याख्यान, हेल्मेट सीटबेल्ट तपासणी, प्रवासी बसमधून मालवाहतूक तपासणी, माहिती पुस्तक वाटप टेल लाईट ओव्हरलोडींग केसेस, अपघात प्रवण क्षेत्र धोकादायक इशारा याचे फलक लावणे असे विविध उपक्रम या रस्ता सुरक्षा सप्ताहअंतर्गत राबविण्यात येत आहेत. अपघात टाळण्यासाठी वाहतूक नियमांची शिस्त पाळणे आवश्यक आहे. तसेच अपघात होऊ नये किंवा कसे टाळता येतील याबाबत प्रभावी जनजागृती करण्यासाठी सर्वांनी आपआपल्या क्षेत्रात चांगली कामगिरी बजावली तर अपघातातून होणारी मनुष्यहानी तसेच राष्ट्रीय हानी कमी करण्यास निश्चित मदत होईल.


                         जिल्हा माहिती कार्यालय, सांगली

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा