रविवार, २४ फेब्रुवारी, २०१९

शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या संपन्न करण्यात प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना महत्त्वाची ठरणार - पालकमंत्री सुभाष देशमुख

पालकमंत्री सुभाष देशमुख यांच्याहस्ते जिल्हास्तरीय  शुभारंभ

सांगली, दि. 24, (जि. मा. का.) : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी - PM KISAN योजना ही  देशातील जवळपास 12 कोटी शेतकऱ्यांना दरवर्षी 75 हजार कोटी रूपयांची मदत देणारी देशाच्या इतिहासातील अत्यंत महत्त्वपूर्ण व ऐतिहासिक योजना आहे. शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या या योजनेबद्दल केंद्र सरकारचे अभिनंदन करून सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी या योजनेचा जिल्हास्तरीय शुभारंभ केला. या योजनेचा पहिला हप्ता रूपये 2 हजार प्रमाणे जिल्ह्यातील जवळपास 2 लाख 27 हजार शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आल्याचे सांगून ही योजना शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या संपन्न करण्यासाठी महत्त्वाची ठरणार असल्याचे प्रतिपादन सहकार, पणन व वस्त्रोद्योग मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी केले.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी - PM KISAN योजनेच्या जिल्हास्तरीय शुभारंभ प्रसंगी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समिती सभागृहात आयोजित कार्यक्रमात पालकमंत्री सुभाष देशमुख बोलत होते. यावेळी आमदार सुरेश खाडे, जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत, महानगरपालिका आयुक्त रविंद्र खेबुडकर, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. विजय देशमुख, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी राजेंद्र साबळे, मिरज उपविभागीय अधिकारी डॉ. विकास खरात, उपजिल्हाधिकारी (महसूल) विजया यादव, आत्माचे प्रकल्प संचालक बसवराज मास्तोळी आदि मान्यवर उपस्थित होते.
शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न मिळण्याकरीता केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी - PM KISAN योजना सुरू केली आहे. अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना या योजनेंतर्गत प्रति शेतकरी कुटूंबाला प्रतिवर्ष 6 हजार रूपये इतके आर्थिक सहाय्य तीन टप्प्यांमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या  योजनेचा राष्ट्रीय शुभारंभ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याहस्ते उत्तरप्रदेशातील गोरखपूर येथून झाला. या योजनेचा जिल्हास्तरीय शुभारंभ करताना पालकमंत्री सुभाष देशमुख म्हणाले, देशाच्या प्रधानमंत्री यांनी 1 फेब्रुवारीला योजना जाहीर करणे व 24 फेब्रुवारीला लाभार्थ्यांच्या खात्यात निधी वर्ग होणे ही देशातील पहिलीच घटना आहे. शेती आणि शेतकरी या दोघांनाही समृध्द करण्यासाठी शासन कटिबध्द असून अनेक महत्त्वपूर्ण योजना शेतकऱ्यांच्या हितासाठी राबविल्या जात आहेत. पाच एकराच्या आतील शेतकऱ्यांना 6 हजार रूपयांची प्रतिवर्ष मदत मिळणार असल्याने शेतकऱ्याला बियाणे, खते, औषधे यासारख्या गोष्टींसाठी सावकारांकडून कर्ज घेण्याची गरज पडणार नाही.
वर्ष 2022 पर्यंत देशातील शेतकऱ्यांना त्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी त्यांना आवश्यक ती सर्व साधने शासन उपलब्ध करून देत आहे. त्याचाच एक भाग म्हणून PM KISAN योजना सुरू करण्यात आली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशातील सुमारे 1 कोटी 1 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात आज 2 हजार रूपयांच्या पहिल्या हप्त्याची सुमारे 2 हजार 21 कोटी रूपयांची रक्कम वर्ग केली. उर्वरीत लाभार्थ्यांना लवकरच या योजनेचा लाभ मिळणार आहे. या योजनेच्या माध्यमातून दरवर्षी 75 हजार कोटी रूपयांची मदत शेतकऱ्यांना करण्यात येणार आहे. देशातील सुमारे 12 कोटी शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. या योजनेचा संपूर्ण निधी केंद्र सरकारकडून देण्यात येणार आहे. राज्य शासनाने आपआपल्या राज्यातील पात्र लाभार्थी शेतकऱ्यांची यादी त्वरीत तयार करावी असे निर्देशही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शुभारंभ प्रसंगी दिले. सदरचा निधी हा थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होणार असल्याने यामध्ये कोणत्याही मध्यस्थीला थारा असणार नाही. सर्व शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी बँकामध्ये आपले खाते उघडावे. ग्रामपंचायत स्तरावर योजनेच्या लाभार्थ्यांची यादी प्रसिध्द होईल व त्यानंतर ती यादी अपलोड होईल त्यामुळे योजनेत अत्यंत पारदर्शकता राहील. बी-ते बाजारापर्यंत नवीन व्यवस्था निर्माण करण्याचे काम शासन करीत आहे, असेही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शुभारंभ प्रसंगी सांगितले.
यावेळी कृषि यांत्रिकीकरण मोहिमेंतर्गत 6 ट्रॅक्टर, 1 रोटाव्हेटर व 1 हळद कुकर यांचे पालकमंत्री सुभाष देशमुख यांच्याहस्ते लाभार्थींना प्रतिकात्मक चावी देवून वितरण करण्यात आले.
प्रास्ताविकात जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी राजेंद्र साबळे यांनी योजनेबाबत सविस्तर माहिती देवून या योजनेमुळे शेतकऱ्यांना जी मदत मिळणार आहे त्यातून जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न निश्चितपणे वाढणार आहे, असे सांगितले. आभार निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. विजय देशमुख यांनी मानले. या योजनेतील लाभार्थी शेतकऱ्यांचा प्रातिनिधीक स्वरूपात सन्मान करण्यात आला.
यावेळी जिल्हा उपनिबंधक निलकंठ करे, कृषि उपसंचालक मकरंद कुलकर्णी, विविध विभागांचे अधिकारी, शेतकरी उपस्थित होते.

00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा