मंगळवार, २१ डिसेंबर, २०२१

कृषि यांत्रिकीकरणांतर्गत जिल्ह्यात 213 लाभार्थी

सांगली, दि. 21 (जि. मा. का.) : राज्यात सन 2014-15 पासून कृषि यांत्रिकीकरण उपअभियान राबविण्यात येत आहे. कृषि यांत्रिकीकरण उप अभियानामध्ये केंद्र व राज्य हिस्सा 60:40 प्रमाणे आहे. सन 2020-21 मध्ये कृषि यांत्रिकीकरण उप अभियानांतर्गत जिल्ह्यातील 125 लाभार्थींना 74 लाख 59 हजार रूपये तर राज्य पुरस्कृत कृषि यांत्रिकीकरण योजनेतून 88 लाभार्थींना 55 लाख 16 हजार रूपये रक्कमेचा लाभ झाला असून अनुदान वाटपाची प्रक्रिया सुरू आहे. शेतकऱ्यांना कृषि यांत्रिकीकरणास प्रोत्साहन देणे, विभागनिहाय पिक रचनेनुसार आवश्यक असलेली व पूर्व तपासणी केलेली दर्जेदार कृषि औजारे खरेदीसाठी शेतकऱ्यांना अनुदान उपलब्ध करून देणे, शेतकऱ्यांना त्यांच्या गरजेनुरुप व मागणी प्रमाणे कृषी यंत्रसामुग्री/औजारे उत्पादने अनुदानावर उपलब्ध करुन देणे व कृषि उत्पादन प्रक्रियेत अद्ययावत यंत्रसामुग्रीच्या वापरासाठी प्रोत्साहीत करण्यासाठी ही योजना राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत कृषि यंत्र / औजारांच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य तसेच भाडे तत्वावर कृषि यांत्रिकीकरण सेवा सुविधा केंद्र/कृषि औजारे बँक स्थापनेसाठी अर्थसहाय्यचा लाभ देण्यात येतो. केंद्र शासनाने त्यासाठी मंजूर केलेल्या कार्यक्रमाच्या मर्यादेत 2015-16 कृषि गणनेनुसार जिल्हानिहाय एकूण खातेदार संख्या, पेरणी क्षेत्र मागील वर्षाचा मंजूर कार्यक्रम व मागील सहा वर्षाचा खर्च यावर आधारित कार्यक्रमाचे लक्षांक कृषि आयुक्तालय स्तरावर जिल्हानिहाय निश्चित करण्यात येतो. या योजनेच्या लाभासाठी इच्छुक शेतकऱ्यांनी Mahadbt पोर्टल द्वारे अर्ज करणे आवश्यक आहे. शासनाच्या दि. 4 नोव्हेंबर 2020 च्या शासन परिपत्रकात नमूद केल्यानुसार कृषि विभागाच्या योजनाची महाडीबीटी पोर्टल द्वारे अंमलबजावणी करण्यासाठी शासन मान्यता देण्यात आलेली आहे. कृषि विभागाच्या योजना महाडीबीटी पोर्टलद्वारे करण्यासाठी एकात्मिक संगणकीय प्रणाली विकसित केली आहे. या प्रणालीद्वारे शेतकऱ्यांना त्यांच्या पसंतीच्या बाबीच्या निवडीचे स्वातंत्र्य देण्यात आले असून शेतकऱ्यांनी शेतीशी निगडीत विविध बाबीकरिता अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या योजनेंतर्गत ट्रॅक्टर/ लहान ट्रॅक्टर, पॉवर टिलर, रोटाव्हेटर, मोगडा (कल्टीव्हेटर), सर्व प्रकारचे प्लांटर (खत व बी टोकणी यंत्र), मळणी यंत्र, भात लावणी यंत्र (ट्रान्सप्लांटर), पॉवर विडर, रिपर व रिपर कम बाईंडर, भात मळणी यंत्र, मिनी भात मिल, दाल मिल व पूरक यंत्र (डी-स्टोनर, पॉलीशिंग, ग्रेडिंग, पॉकिंग इ.) संच, कापूस पऱ्हाडी थ्रेशर, ऊस पाचट कुट्टी, मल्चर, ट्रॅक्टरचलित फवारणी यंत्र (बूम स्प्रेअर), सब सोईलर या यंत्र/ औजारांसाठी पात्र शेतकऱ्यांची संगणकीय सोडत पद्धतीने निवड करण्यात येत असून डीबीटी द्वारे अनुदान वितरीत केले जात आहे. भाडे तत्वावरील कृषि यांत्रिकीकरण सेवेसाठी कृषि औजारे बॅंक स्थापनेसाठी अर्थसहाय्य प्राधान्याने वैयक्तिक शेतकरी, शेतकरी उत्पादक कंपनी, शेतकऱ्यांचे नोंदणीकृत गट, शेतकरी बचत गट, प्रगतीशील शेतकरी गट, कृषि विज्ञान केंद्रे कृषि यांत्रिकीकरण सेवा सुविधा केंद्र (कृषि औजारे बॅन्क) स्थापनेसाठी गावांची निवड करताना केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पुढील निकष पाळणे बंधनकारक राहील. कृषि क्षेत्रात कमी प्रमाणात उर्जा वापर असलेली गावे, ट्रॅक्टरची संख्या कमी प्रमाणात असलेली गावे, अल्प व अत्यल्प जमीनधारकांचे प्रमाण अधिक असलेली गावे व सध्या कृषि उत्पादकता कमी असलेली परंतु उत्पादकता वाढीस वाव असलेली गावे. 00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा