सोमवार, १३ डिसेंबर, २०२१

राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये 8 हजार 967 प्रकरणे निकाली. 18 कोटी 4 लाख 31 हजाराहून अधिक रक्कम वसूल

सांगली, दि. 13 (जि. मा. का.) : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाच्या व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या आदेशानुसार दिनांक 11 डिसेंबर 2021 रोजी सांगली जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे सांगली जिल्हा व सांगली जिल्हयातील सर्व तालुक्यामध्ये राष्ट्रीय लोक अदालत संपन्न झाली. या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये 8 हजार 967 प्रकरणे निकाली काढण्यात आली. यामधून 18 कोटी 4 लाख 31 हजार 286 रूपये इतकी रक्कम वसूल करण्यात आली असल्याची माहिती प्रमुख जिल्हा न्यायाधीश तथा विधी व सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष आर. एस. राजंदेकर यांनी दिली. या लोक अदालतीच्या सुरूवातीस प्रमुख जिल्हा न्यायाधीश तथा विधी व सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष आर. एस. राजंदेकर यांनी सर्व पॅनल न्यायाधीश व सदस्यांना जास्तीत जास्त प्रकरणांमध्ये समजोता घडवून आणून प्रकरणे तडजोडीने निकाली करावी, असे आवाहन केले. या कार्यक्रमास जिल्हा न्यायाधीश श्री. मलाबादे, श्री. सातवळेकर, श्री. जगताप, श्री. पोळ, श्री. पोतदार, सांगली वकील संघाचे अध्यक्ष अॅड. सुनिल लवटे व जिल्हा सरकारी वकील अॅड. देशमुख उपस्थित होते. या लोक अदालतीमध्ये आवश्यकतेनुसार व्हिडिओ, कॉन्फर्न्सव्दारेही पक्षकारांशी संवाद साधण्याची व्यवस्था करण्यात आली होती. लोक अदालतीमध्ये जिल्ह्यातून 53 पॅनलची निर्मिती करण्यात आली होती. कोरोनामुळे जे पक्षकार तडजोडीसाठी प्रत्यक्ष उपस्थित राहू शकत नव्हते, अशांसाठी व्हॉट्सअॅप कॉलचा वापर करण्यात आला. लोक अदालतीच्या अगोदर उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार तीन दिवस स्पेशल ड्राइव्हमध्येही प्रकरणे निकाली काढण्यात आली. या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये पुढीलप्रमाणे प्रकरणे निकाली करण्यात आली. जिल्हा न्यायालय सांगली - 6 हजार 338, इस्लामपूर न्यायालय - 211, आटपाडी - 491, जत - 50, कडेगांव - 171, कवठेमहांकाळ - 181, मिरज - 223, पलूस - 279, शिराळा - 742, तासगांव - 195 तर विटा न्यायालयामध्ये 86 प्रकरणे निकाली करण्यात आली. पुढील राष्ट्रीय लोक अदालत दि 12 मार्च 2022 रोजी आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव प्रविण कि. नरडेले यांनी दिली. या लोक अदालतीमध्ये नागरिकांनी प्रलंबित प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्याचे आवाहनही श्री. नरडेले यांनी केले आहे. ०००००

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा