शनिवार, ८ ऑक्टोबर, २०१६

ग्रामीण तरूणांना स्वरोजगारासाठी प्रेरणा देणारी आरसेटी

दरवर्षी लाखो युवक-युवतींचे जथ्थे नोकरीच्या शोधात शहरी बाजारात दाखल होत आहेत. तथापि, संघटित असंघटित क्षेत्रामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर नोकऱ्या नाहीत. या पार्श्वभूमीवर दारिद्र्य रेषेखालील जीवन व्यतीत करीत असलेल्या युवक-युवतींना त्यांची कौशल्य वृद्धी करुन अद्ययावत तंत्रज्ञानाची माहिती देणे ही काळाची गरज आहे. यासाठी सांगली जिल्ह्यात बँक ऑफ इंडिया या अग्रणी बँकेच्या नियोजनाखाली आरसेटी कार्यरत आहे.
भारत सरकार, स्वर्णजयंती ग्राम स्वरोजगार योजनेच्या माध्यमातून दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना बँक कर्ज शासकीय अनुदानाद्वारे रोजगार निर्मितीसाठी कार्यरत असून, अशा कुटुंबांना दारिद्र्यरेषेच्या वर आणण्यासाठी प्रयत्नशील आहे. या पार्श्वभूमीवर कर्नाटकात श्री. धर्मस्थळ मंजुनाथेश्वर शैक्षणिक ट्रस्ट, सिंडिकेट बँक कॅनरा बँक यांच्या संयुक्त सहभागाने करण्यात आलेल्या प्रयोगातून प्रेरणा घेऊन ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था म्हणजेच आरसेटी (रूरल सेल्फ एम्प्लॉयमेंट ट्रेनिंग इन्स्टिट्युट) या संकल्पनेचा जन्म झाला.
जिल्ह्यातील अग्रणी बँकेच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारच्या सक्रिय सहभागातून या संस्थेचे नियोजन, नियंत्रण, परिचालन चालते. सांगली जिल्ह्यात बँक ऑफ इंडिया या अग्रणी बँकेच्या नियोजनाखाली आरसेटी कार्यरत आहे. या प्रशिक्षण संस्थेच्या माध्यमातून ग्रामीण दारिद्र्यरेषेखालील युवक-युवतींना प्राधान्य देऊन प्रशिक्षणार्थीची अभिरुची क्षमता यांचे मूल्यांकन करुनच मागणीनुसार प्रशिक्षण दिले जाते. प्रशिक्षणानंतर खात्रीशीर कर्जसुविधा बँक जोडणी सहाय, ग्रामीण युवक-युवतींनी सुरु केलेल्या उद्योग व्यवसायांचे सातत्य अस्तित्व टिकवण्यासाठी आवश्यक त्या मार्गदर्शी सेवा पुरवणे, ग्रामीण युवक-युवतींना स्वयंरोजगार संकल्पना छोटे उद्योग व्यवसाय चालविण्यासाठी आवश्यक कौशल्यवृद्धी यांचे मोफत निवासी भोजन व्यवस्थेसह अल्पकालिक प्रशिक्षण देणे, ही या प्रशिक्षण संस्थेची उद्दिष्टे आहेत.
अग्रणी बँक व्यवस्थापक आर. एस. पुजारी यांच्या सहकार्याने आरसेटीचे व्यवस्थापक राजेंद्र यादव यांच्या मेहनतीने गेल्या आर्थिक वर्षात जिल्ह्यात अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यात आले. वर्षातील एकूण 221 दिवस वेगवेगळे प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्यात आले. त्यामध्ये 23 प्रशिक्षण कार्यक्रमांद्वारे 677 युवक महिलांना प्रशिक्षण दिले गेले. त्यापैकी 413 प्रशिक्षणार्थी आज स्वतःच्या पायावर उभे आहेत. तसेच, संस्थेद्वारे 65 जनजागृती कार्यक्रम घेण्यात आले. प्रशिक्षण कार्यक्रमात कृषि क्षेत्राशी निगडित 11 कार्यक्रम तर उत्पादन क्षेत्राशी निगडित 10 अन्य क्षेत्राशी निगडित 2 प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आले. आरोग्य, योग, श्रमदान, खेळ असे उपक्रमही प्रशिक्षणादरम्यान घेतले गेले.
प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केलेल्या कर्नाळच्या संगिता विजय पाटील म्हणाल्या, माझे शिक्षण दहावीपर्यंत झाले आहे. आरसेटी आणि माझ्या कुटुंबाचा मला फार मोठा आधार मिळाला. मी अन्नप्रक्रिया करण्याचे प्रशिक्षण घेतले आहे. ते पूर्ण झाल्यानंतर मी स्वतःची बेकरी सुरू केली आहे. यातून महिन्याला मला 20 हजाराच्या आसपास नफा मिळत आहे. त्याबद्दल मी आरसेटीचे आभार मानते.
    आरसेटीचे प्रशिक्षण घेण्यासाठी प्रशिक्षणार्थी सांगली जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रहिवासी असावा. कुटुंब प्रमुखाचे नाव दारिद्‌य्ररेषेच्या यादीत असावे. प्रशिक्षणार्थीचे वय 18 ते 35 वर्षे असावे. त्याला मराठी लिहिता वाचता येणे आवश्यक आहे. अशा इच्छुकांनी आपले अर्ज विहित नमुन्यात संस्थेकडे पाठवायचे असतात. अर्ज प्राप्त झाल्यानंतर मुलाखत घेऊन प्रशिक्षण दिले जाते. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर पुढील दोन वर्षांपर्यंत प्रशिक्षणार्थींना व्यवसाय उभारणीसाठी सल्ला मार्गदर्शन दिले जाते.
   प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये रोपवाटिका व्यवस्थापन, व्यापारी फुलशेती, प्लबिंग, अन्नप्रक्रिया बेकरी उत्पादने, सौंदर्य प्रसाधन व्यवस्थापन, दुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन, दुचाकी सेवा दुरूस्ती, स्टीकर कटिंग, हस्तकला वस्तू उत्पादन, शेळीपालन, गांडूळ शेती, रेशीम उद्योग, वस्त्रालंकार, कागदी पिशव्या, लखोटे, फाईल्स तयार करणे, घरगुती विद्युत उपकरण दुरूस्ती यांचा समावेश आहे.
ग्रामविकासाचे महात्मा गांधींचे स्वप्न मूर्त स्वरूपात साकारायचे असेल तर ग्रामीण भागात उद्योग व्यवसायाला चालना देण्याची गरज आहे. खेड्यांचा विकास म्हणजेच देशाचा विकास हे लक्षात घेऊन ग्रामीण भागातील तरूणांना प्रशिक्षण देणे, हा एक महत्त्वाचा घटक आहे. आरसेटीच्या माध्यमातून हा उद्देश सफल होत आहे.
संप्रदा द. बीडकर
प्र. जिल्हा माहिती अधिकारी
सांगली

00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा