सोमवार, ३१ ऑक्टोबर, २०१६

प्रणाम मृत्यृंजय वीराला..




ओढ के तिरंगा क्यों पापा आये है
माँ मेरा मन बात ये समझ न पाया है
सीमेवर देशाचे रक्षण करताना वीरमरण आलेल्या नितीन सुभाष कोळी यांच्या कच्चा बच्च्यांच्या चेहऱ्यावर हा प्रश्न उमटला होता. नितीन यांच्या घरी आई, वडील, लहान भाऊ, पत्नी आणि दोन कच्ची बच्ची.. या चिमुकल्यांच्या चेहऱ्यावरील निरागस भाव उपस्थितांच्या काळजाचा ठाव घेणारे. नेहमी आपल्याशी बोलणारे, खाऊ आणणारे त्यांचे बाबा आज असे का निपचित पडले आहेत. घरी जवानांची आणि इतर माणसांची गर्दी का झाली आहे, सगळेजण का रडत आहेत
पापा कहाँ है जा रहे अब ये बताओ माँ
चुपचाप से आँसू बहा के यू सताओ ना माँ
अशा अगणित प्रश्नांची गर्दी त्यांच्या डोळ्यात जाणवत होती.
मोठा देवराज वय वर्षे चार आणि छोटा युवराज वय वर्षे अवघे दोन. त्यांच्या आईच्या डोळ्यातील अश्रूंचा बांध फुटला होता. तिच्या डोळ्यातील अश्रूंमध्ये हा प्रश्न वाहून गेला. या चिमुरड्यांप्रमाणेच दुधगावमधील प्रत्येक माणसाचं मन आज रडत होतं. त्यांच्या नितीनने देशासाठी वीरमरण पत्करले होते. कॉन्स्टेबल नितीन सुभाष कोळीभारतमातेसाठी बलिदान दिलेला आणखी एक निधड्या छातीचा वाघ वय वर्षे अवघी 28. या जवानाने आपल्या प्राणांची आहुती दिली.
सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील दुधगाव हे नितीन कोळी यांचे गाव. दहावी बारावीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर नितीन यांना सैन्यदल खुणावू लागले. ते 2008 साली भारतमातेच्या संरक्षणासाठी सीमा सुरक्षा दलात भरती झाले. 156 बटालियन मध्ये ते कार्यरत होते. त्यांची नेमणूक जम्मू काश्मिर परिसरातील पाकिस्तान सीमेवर करण्यात आली होती.
कुपवाडा जिल्ह्यातील माछिल भागात दहशतवाद्यांच्या हल्ल्याला प्रत्युत्तर देताना झालेल्या गोळीबारात नितीन कोळी गंभीर जखमी झाले व लष्करी रूग्णालयात उपचार सुरू असताना नियतीने त्यांच्यावर घाला घातला. अब तुम्हारे हवाले वतन साथियो म्हणत नितीन मरणाला सामोरे गेले.
जमाने भर में मिलते है आशिक बहुत
मगर वतन से खूबसुरत कोई सनम नही होता
नोटों से लिपटकर, सोने में सिमटकर मरे तो है बहुत
मगर तिरंगे से खूबसुरत कोई कफन नही होता..
हे सैन्य दलाचे आणि जीवनाचे मर्म नितीन कोळी यांनी जाणले होते. म्हणूनच ते हसत हसत मरणाला सामोरे गेले. नितीन कोळी यांच्या अंतिम क्षणी सारा वारणाकाठ त्यांना निरोप देण्यासाठी खचाखच भरला होता. प्रत्येकाच्या डोळ्यातील आसवं म्हणत होती.
सीमेवर ते लढले म्हणून
गावात दिवाळी आली आहे
पणती त्यांच्या घरातली विझवून
दिवाळी आली आहे..
याची जाणीव प्रत्येक माणसाला होती. म्हणूनच कोणीही न सांगता दुधगावच्या प्रत्येक घरातील आकाशदिवा खाली उतरला होता. कुठल्याच घरात दिवाळी साजरी केली नाही. आज नितीन कोळी जरी आपल्यात नसले तरी त्यांनी देशासाठी दिलेले बलिदान कुठल्याही तराजूत तोलता येणारे नाही. जगण्याचे सोहळे अनेक असणार आहेत. पण देशासाठी प्राण देण्याची वेळ एकदाच येते. आपल्या देशाच्या सुरक्षिततेसाठी प्राण देणाऱ्या शहीद नितीन कोळी यांच्या कुटुंबियांना सन्मानाने वागवून आपल्याच कुटुंबातील सदस्य म्हणून त्यांचीही काळजी घेऊया. त्यांच्या प्रत्येक अडीअडचणीत हातभार लावून आपण आपले कर्तव्यही पार पाडण्याचा संकल्प करूया. आपले प्राण देऊन भारतमातेचे रक्षण करणाऱ्या नितीन कोळी यांचा प्रत्येक भारतीयाला अभिमान आहे.
म्हणूनच पहिला प्रणाम, सलाम या मृत्युंजय वीराला..
संप्रदा द. बीडकर
जिल्हा माहिती अधिकारी
सांगली





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा