गुरुवार, ६ ऑक्टोबर, २०१६

उद्योजकतेकडून प्रगतीकडे नेणारी मुद्रा योजना

सामान्य नागरिकांना इच्छा असूनही आर्थिक सहाय्याअभावी अनेकदा व्यवसाय, उद्योग सुरू करता येत नाहीत. त्यामुळे अशांच्या मदतीसाठी शासनाने मुद्रा योजनेच्या माध्यमातून मदतीचा हात पुढे केला आहे. या योजनेची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी होत असून मुद्रा योजनेच्या अंमलबजावणीत सांगली जिल्ह्याने राज्यात आठवा क्रमांक पटकावला आहे. त्या पार्श्वभूमिवर मुद्रा योजनेची अधिक माहिती या लेखातून जाणून घेऊया...
या योजनेंतर्गत सांगली जिल्ह्यात 26 सप्टेंबरअखेर एकूण 43 हजार 178 लाभार्थ्यांना 254 कोटी 42 लाख कर्ज वितरण करण्यात आले आहे. यामध्ये 26 सप्टेंबरअखेर शिशु गटामध्ये 39 हजार 979 लाभार्थ्यांना 93 कोटी 33 लाख रुपये, किशोर गटामध्ये 1 हजार 866 लाभार्थ्यांना 45 कोटी 28 लाख रुपये, तरुण गटामध्ये 1 हजार 333 लाभार्थ्यांना 115 कोटी 81 लाख रुपये कर्ज वितरण करण्यात आले आहे. अनेक उद्योजकांनी या योजनेचा लाभ घेऊन प्रगतीकडे वाटचाल सुरू केली आहे.
मायक्रो युनिट्स डेव्हलपमेंट अँड रिफायनान्स एजन्सी लि. यांची आद्याक्षरे घेऊन मुद्रा योजनेचे नाव तयार झाले आहे. मा. पंतप्रधान महोदयांनी मुद्रा बँक योजना दिनांक 8 एप्रिल 2015 रोजी कार्यान्वित केली. उद्योजक आणि लहान व्यापार करणाऱ्या जवळजवळ 90 टक्के लोकांपुढे मुबलक अर्थसहाय्याची तरतूद करणे हा एक कठीण प्रश्न होता. त्यासाठी कुठलेही खात्रीशीर साधन उपलब्ध नव्हते. त्यामुळे त्यांना एक खात्रीशीर ठिकाण आणि योजना उपलब्ध करण्यासाठी मुद्रा योजनेची सुरुवात करण्यात आली. या बँकेच्या माध्यमातून लघु उद्योगांना कर्ज देण्यासाठी देशातील इतर बँकांना प्रोत्साहनही देण्यात येईल. शिवाय या कर्ज योजनांच्या नियमनाचे कामही मुद्रा बँकेच्या हाती असेल.
या योजनेनुसार कुठल्याही प्रकारची तारण किंवा जामिनदाराशिवाय होतकरू, बेरोजगार यांना कर्ज पुरवठा करून त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी केंद्र शासनाच्या मुद्रा योजनेंतर्गत अर्थसहाय्य देण्यात येते. देशामध्ये होतकरू, बुद्धिमान आणि जीवनामध्ये यशस्वी उद्योजक होण्याचे स्वप्न बाळगणारे लाखो तरूण आहेत. परंतु, त्यांना कौटुंबिक पार्श्वभूमी नसल्यामुळे एखादा लहान उद्योग, व्यवसाय नव्याने उभारण्यासाठी अनंत अडचणी येतात. मुख्य अडचण ही भांडवलाची असते. कोणताही उद्योग, व्यापार आणि व्यवसाय उभारावयाचा असेल तर कमी व्याजदरामध्ये पतपुरवठा ही मुलभूत गरज आहे. या सर्वांचा विचार करून अशा तरूणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात आणि त्यातून उद्योजक निर्माण व्हावेत, या उदात्त हेतूने मा. पंतप्रधानांच्या संकल्पनेतून केंद्रशासनाने मुद्रा बँक योजना सुरू केली आहे. या योजनेमार्फत बेरोजगारांना कर्ज पुरवठा करून त्यांना व्यवसायासाठी प्रोत्साहीत केले जाते.
   मुद्रा योजनेत तीन श्रेणी असतात. या श्रेणीचे शिशु, किशोर आणि तरुण या गटांमध्ये वर्गीकरण करण्यात आले आहे. शिशु श्रेणींतर्गत 50 हजार रुपयांचे कर्ज मिळू शकते, तर किशोर श्रेणीत 50 हजार पासून 5 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जाते. तसेच तरुण श्रेणींतर्गत 5 लाखांपासून 10 लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळते. मुद्रा बँकेद्वारे छोट्या कारखानदारांना आणि दुकानदारांना कर्ज दिले जाते. त्याचबरोबर भाजीवाले, सलून यांनाही कर्ज दिले जाईल असेही म्हटले आहे. पंतप्रधान मुद्रा योजनेत प्रत्येक सेक्टरनुसार योजना बनवली जाईल आणि प्रत्येक सेक्टरमध्ये वेगवेगळ्या योजना राबविल्या जातील. मुद्रा योजने विषयीची माहिती आणि योजनेचा लाभ हा प्रादेशिक ग्रामीण बँकांनाही घेता येईल. मुद्रा बँक अतिशय कमी व्याज दराने कर्ज पुरवठा करते. तसेच शिशु श्रेणीत 10 ते 12 टक्के, किशोर श्रेणीत 14 ते 17 टक्के आणि तरुण श्रेणींतर्गत 16 टक्के दराने कर्ज पुरवठा करण्यात येतो.

एकूणच या योजनेचा लाभ घेऊन अनेकांनी आपल्या उज्ज्वल भवितव्याकडे वाटचाल सुरू केली आहे. दुर्दम्य इच्छाशक्ती असणाऱ्या छोट्या उद्योजक आणि व्यापाऱ्यांसाठी ही योजना वरदान ठरणार आहे, असे म्हटले तर वावगे ठरू नये.
                                                              संप्रदा द. बीडकर
                                                              प्र. जिल्हा माहिती अधिकारी
                                                      सांगली

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा