शुक्रवार, १५ सप्टेंबर, २०१७

महाराष्ट्र मिशन 1 मिलीयन अभियानाच्या माध्यमातून क्रीडा संस्कृतीला चालना - पालकमंत्री सुभाष देशमुख

- जिल्हा क्रीडा संकुलात अभियानाचे जल्लोषात उद्घाटन
- सांगली जिल्ह्यात सर्वाधिक 31 हजार 690 खेळाडुंची नोंदणी

सांगली, दि. 15, (जि. मा. का.) : देशात युवकांची लोकसंख्या जास्त आहे. या युवा भारताची जडणघडण चांगली झाली तरच समृद्ध भारत निर्माण होईल. त्यासाठी योगासने आणि मैदानी खेळ आवश्यक आहेत. महाराष्ट्र मिशन वन मिलीयन या उपक्रमासाठी सांगली जिल्ह्यातून 31 हजार, 690 एवढी राज्यात सर्वाधिक खेळाडुंची नोंदणी झाली आहे. या माध्यमातून क्रीडा संस्कृतीला चालना मिळाली असून, भविष्यात सांगली जिल्ह्यातून चांगले खेळाडू घडतील, असा विश्वास राज्याचे सहकार, पणन वस्त्रोद्योग मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी आज येथे व्यक्त केला.
जिल्हा क्रीडा संकुल येथे फुटबॉल फेस्टीवलच्या उद्घाटन प्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आमदार सुधीर गाडगीळ, आमदार सुरेश खाडे, जिल्हाधिकारी वि. ना. काळम, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा क्रीडा अधिकारी अनिल चोरमले, माध्यमिक शिक्षणाधिकारी महेश चोथे, सांगली जिल्हा फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष जग्गू सय्यद, सहसचिव वसंत अग्रवाल, सचिव आतिश अग्रवाल, राष्ट्रीय खेळाडू विजय ठाणेदार, तौफिक सय्यद आदि मान्यवर उपस्थित होते
महाराष्ट्र मिशन वन मिलीयन या उपक्रमामध्ये सहभागी खेळाडुंना तसेच 17 वर्षाखालील खेळाडुंसाठी फुटबॉल विश्वचषक स्पर्धेच्या संघाला शुभेच्छा देऊन पालकमंत्री सुभाष देशमुख म्हणाले, फेडरेशन ऑफ इंटरनॅशनल फुटबॉल असोसिएशन (फिफा) मार्फत दिनांक 6 ते 28 ऑक्टोबर या कालावधीत भारतामध्ये 17 वर्षाखालील फिफा विश्वचषक स्पर्धा होत आहे. महाराष्ट्राला या स्पर्धेतील सामने खेळविण्याचा बहुमान मिळाला आहे. या पार्श्वभूमिवर राज्यात फुटबॉल खेळाची आवड निर्माण व्हावी, जास्तीत जास्त मुलांनी मैदानी खेळ खेळल्यास त्यांचे आरोग्य सुदृढ होण्यास मदत होईल, या विचाराने राज्य शासनाने फुटबॉल मिशन, वन मिलियन कार्यक्रम जाहीर केला आहे. यामध्ये सांगली जिल्ह्यातील 421 शाळा,  महाविद्यालयांतील 31 हजार 690 एवढ्या विक्रमी खेळाडुंची नोंदणी झाली आहे, याबद्दल त्यांनी गौरवोद्गार काढले.
यावेळी पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी सर्व सांगली जिल्ह्यातील फुटबॉलप्रेमी खेळाडुंना, संघटनांना, शाळा महाविद्यालयांना शुभेच्छा दिल्या. सहभागी खेळाडुंचे अभिनंदन केले. यावेळी आमदार सुरेश खाडे, आमदार सुधीर गाडगीळ यांनी मार्गदर्शन करून खेळाडुंना शुभेच्छा दिल्या. खेळाडु अन्नपूर्णा सातपुते हिने मनोगत व्यक्त केले.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते क्रीडांगण पूजन करून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. फुटबॉल संघटना पदाधिकारी राष्ट्रीय खेळाडु यांचा पालकमंत्री सुभाष देशमुख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
प्रास्ताविकात जिल्हाधिकारी वि. ना. काळम म्हणाले, फुटबॉल हा खेळ आदिमानवापासून खेळला जात होता. सध्या हा खेळ संपूर्ण जगभरात खेळला जात आहे. सांगली जिल्ह्याचे नाव फुटबॉलच्या माध्यमातून जागतिक पातळीवर चमकावे, यासाठी त्यांनी यावेळी शुभेच्छा दिल्या.
हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी अनिल चोरमले यांच्या मार्गदर्शनाखाली सुधाकर जमादार, शंकर भास्करे, प्रशांत पवार, अभय चव्हाण, बळवंत बाबर, सीमा पाटील, सुरेश मोटे, गजानन कदम, मंदाकिनी पवार यांनी परिश्रम घेतले. यावेळी सांगली जिल्ह्यातील फुटबॉलप्रेमी, शाळा महाविद्यालय संघटनांचे खेळाडू उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रशांत पवार यांनी केले.
00000






कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा