शुक्रवार, १५ सप्टेंबर, २०१७

आपले जिल्हे, विकासाची केंद्रे विशेषांक पालकमंत्री सुभाष देशमुख यांना भेट

सांगली, दि. 15, (जि. मा. का.) : माहिती जनसंपर्क महासंचालनालयाने प्रकाशित केलेल्या लोकराज्य मासिकाच्या आपले जिल्हे, विकासाची केंद्रे हा विशेषांक राज्याचे सहकार, पणन वस्त्रोद्योग मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देशमुख यांना जिल्हा माहिती अधिकारी यांनी भेट दिला. यावेळी आमदार शिवाजीराव नाईक, आमदार सुधीर गाडगीळ, जिल्हाधिकारी वि. ना. काळम, सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका आयुक्त रवींद्र खेबुडकर आदि मान्यवर उपस्थित होते.
यावेळी हा विशेषांक राज्यातील सकारात्मक परिवर्तनाचा वेध घेणारा आहे, असे कौतुकोद्गार पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी व्यक्त केले. तसेच, यावेळी मी मुख्यमंत्री बोलतोय, या कर्जमाफीच्या निर्णयाविषयी माहिती देणारी पुस्तिका भेट देण्यात आली. माहिती महासंचालक ब्रिजेश सिंह यांच्या संकल्पनेतून तसेच, संचालक अजय अंबेकर आणि शिवाजी मानकर यांच्या मार्गदर्शनाखाली, माहिती जनसंपर्क महासंचालनालयाने मी मुख्यमंत्री बोलतोय, तसेच, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्यावर आधारित महामानव या पुस्तिका तयार केल्या आहेत.
यावेळी जिल्हा माहिती कार्यालयाने तयार केलेल्या आपला जिल्हा या पुस्तिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या पुस्तिकेत सांगली जिल्ह्याचा इतिहास, वैशिष्ट्ये, ओळख, सांस्कृतिक वारसा, नद्या, वन्य विषयक माहिती, महत्त्वाचे सण-उत्सव, पर्यटन धार्मिक स्थळे, सिंचन, कृषि क्षेत्र, साहित्य, संगीत, चित्रकला, शिल्पकला, शिक्षण, क्रीडा आदिंचा धावता आढावा घेण्यात आला आहे. सांगली जिल्ह्याची समग्र माहिती एकत्रित देण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला गेला आहे. कोल्हापूर विभागाचे उपसंचालक सतीश लळित यांचे यासाठी मार्गदर्शन लाभले आहे.
00000






कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा