गुरुवार, १४ सप्टेंबर, २०१७

स्वच्छता हा आरोग्याचा मूलमंत्र - पालकमंत्री सुभाष देशमुख

-          स्वच्छता हीच सेवा मोहिमेचा शुभारंभ
-          2 ऑक्टोबरपर्यंत मोहीम राबवणार
-          बाह्यांगाबरोबरच अंतर्मनाची स्वच्छताही आवश्यक

सांगली, दि. 15, (जि. मा. का.) : नागरिकांचे आरोग्य चांगले ठेवायचे असेल, तर स्वच्छता हा आरोग्याचा मूलमंत्र आहे. भारत समृद्ध व्हायचा असेल तर केवळ बाह्यांगाची नव्हे तर अंतर्मनाची स्वच्छताही आवश्यक आहे. त्यासाठी स्वच्छता मोहीम प्रभावीपणे राबवावी. हा केवळ 15 दिवसांचा कार्यक्रम नसून वर्षभर स्वच्छता मोहीम राबवण्यासाठीची प्रेरणा आहे. त्यामुळे या मोहिमेमध्ये सर्वांनी स्वयंस्फूर्तीने श्रमदान करून परिसर स्वच्छता करावी. इतरांनाही त्यासाठी प्रवृत्त करावे व ही मोहीम यशस्वी करावी, असे प्रतिपादन राज्याचे सहकार, पणन व वस्त्रोद्योग मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी आज येथे केले.
येथील पुष्कराज चौक परिसरात स्वच्छता हीच सेवा या मोहिमेच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार सुधीर गाडगीळ, सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेचे आयुक्त रवींद्र खेबुडकर, उपायुक्त स्मृती पाटील आणि सुनील पवार, नगरसेवक धनपाल खोत, दिग्विजय सूर्यवंशी, शिवराज बोळाज, प्रभाग समिती दोनच्या सभापती अंजना कुंडले, मुख्य लेखापरीक्षक संजय गोसावी, आरोग्य अधिकारी डॉ. सुनील आंबोळे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. एस. व्ही. कवठेकर, सहाय्यक आरोग्य अधिकारी विजय ऐनापुरे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
 राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या स्वप्नातील स्वच्छ भारताची संकल्पना साकारण्यासाठी व्यापक जनचळवळ उभारण्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आवाहन केले आहे. त्या पार्श्वभूमिवर 15 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत स्वच्छता हीच सेवा ही मोहीम राबवण्यात येत आहे. तिचा आज शुभारंभ झाल्याचे जाहीर करून पालकमंत्री सुभाष देशमुख म्हणाले, या अभियानांतर्गत अपेक्षित ध्येय साकारण्यासाठी समाजातील सर्व घटकांनी या राष्ट्रव्यापी मोहिमेत सहभागी व्हावे. स्थानिक लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी, नागरिक यांनी या मोहिमेत जास्तीत जास्त सहभाग घेऊन, श्रमदानाने ही मोहीम यशस्वी करावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
यावेळी पालकमंत्री सुभाष देशमुख, आमदार सुधीर गाडगीळ यांच्यासह उपस्थितांनी पुष्कराज चौक परिसरात स्वच्छता केली. यावेळी पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी दामाणी हायस्कूलच्या आर. एस. पी. च्या विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले. यावेळी महानगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी, सफाई कर्मचारी उपस्थित होते. पहिल्या दिवशी महानगरपालिकेच्या 200 कर्मचाऱ्यांनी पुष्कराज चौक ते भारती हॉस्पिटल अशी स्वच्छता केली.
स्वच्छता हीच सेवा मोहिमेंतर्गत सर्व नागरी भाग हागणदारीमुक्त करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. नागरिकांनी उघड्यावर शौचास बसू नये, म्हणून व्यापक प्रमाणात जनजागृती करण्यात येणार आहे. हागणदारीमुक्तीसाठी गुड मॉर्निंग आणि गुड इव्हिनिंग पथके  कार्यरत करण्यात येणार आहेत.
00000









कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा