शुक्रवार, १५ सप्टेंबर, २०१७

महाराष्ट्र वार्षिकी संदर्भ पुस्तकात राज्याच्या समग्र माहितीचे संकलन - पालकमंत्री सुभाष देशमुख

सांगली, दि. 15, (जि. मा. का.) :  माहिती जनसंपर्क महासंचालनालयाने प्रकाशित केलेले महाराष्ट्र वार्षिकी या संदर्भ पुस्तकात महाराष्ट्राविषयी समग्र माहितीचे संकलन करण्यात आले आहे. या पुस्तकात राज्याचा इतिहास, भूगोल, जनजीवन, परंपरा, जिल्हे त्यांची वैशिष्ट्ये, शासकीय स्तरावरील महत्त्वाची बाबी अशा विविध स्वरूपातील माहितीचा खजिना या पुस्तकात आहे, असे प्रतिपादन राज्याचे सहकार, पणन वस्त्रोद्योग मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी आज येथे केले.
पालकमंत्री सुभाष देशमुख यांना जिल्हा माहिती अधिकारी संप्रदा बीडकर यांनी महाराष्ट्र वार्षिकी हे पुस्तक भेट दिले, त्या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार शिवाजीराव नाईक, आमदार सुधीर गाडगीळ, जिल्हाधिकारी वि. ना. काळम, सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका आयुक्त रवींद्र खेबुडकर आदि मान्यवर उपस्थित होते.
पालकमंत्री सुभाष देशमुख म्हणाले, महाराष्ट्र वार्षिकी हे पुस्तक ज्ञानात अधिक भर टाकणारे पुस्तक आहे. वस्तुनिष्ठ माहिती असलेले हे पुस्तक अभ्यासक, प्राध्यापक, पत्रकार, राजकीय नेते, स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारे विद्यार्थी तसेच सामान्यज्ञानाची आवड असणाऱ्या सर्व वयोगटातील नागरिकांनाही  अत्यंत उपयुक्त आहे.
माहिती महासंचालक ब्रिजेश सिंह यांच्या संकल्पनेतून संचालक अजय अंबेकर आणि शिवाजी मानकर टीमने हे पुस्तक संपादित केले आहे..
महाराष्ट्र वार्षिकी 2017 हे पुस्तक सशुल्क जिल्हा माहिती कार्यालय, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, विजयनगर, सांगली येथे मिळू शकते. या पुस्तकाची किंमत 300 रूपये इतकी आहे. या पुस्तकामध्ये राज्य शासनाच्या विविध विभागांची सविस्तर माहिती, विभागांचे उद्देश कार्य, रचना, महत्त्वाच्या योजना, संपर्क क्रमांक मंत्रीमंडळ निर्णय, महत्त्वाच्या शासकीय घटना, घडामोडी, उपक्रम, महाराष्ट्राची मानचिन्हे, महाराष्ट्रातील भारतरत्न महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्राप्त मान्यवर, महाराष्ट्राविषयी अधिकृत वस्तुनिष्ठ माहितीचा समावेश आहे. महाराष्ट्राची भूमी आणि लोक, राज्याची भौतिक वैशिष्ट्ये, भौगोलिक स्थिती, इतिहास, वन्यजीवन, संस्कृती, महाराष्ट्राविषयी सांख्यिकी स्वरूपाच्या बाबी, शिक्षणसंस्था, कृषि उद्योग, पर्यटन स्थळे, सिंचन प्रकल्प आदि माहितीचा समावेश आहे.
    इच्छुकांनी अधिक माहितीसाठी जिल्हा माहिती कार्यालय, सांगली दूरध्वनी क्रमांक 0233-2602059 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी संप्रदा बीडकर यांनी केले आहे.

00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा