गुरुवार, ३१ ऑगस्ट, २०१७

जी. एस. टी. मुळे व्यवहारात पारदर्शकता - उपायुक्त योगेश कुलकर्णी - कापडपेठ गणेश मंडळात संवादपर्व कार्यक्रमात प्रतिपादन

सांगली, दि. 31, (जि. मा. का.) : संपूर्ण देशभरात 1 जुलैपासून वस्तू सेवा कर म्हणजेच जी. एस. टी. लागू झाला आहे. जी. एस. टी. मुळे महागाई वाढली हा गैरसमज आहे. याउलट या करामुळे व्यवहारात पारदर्शकता आली आहे, असे प्रतिपादन वस्तू सेवा कर उपायुक्त योगेश कुलकर्णी यांनी केले.
    येथील श्री कापडपेठ गणेश मंडळामध्ये जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने आयोजित संवादपर्व कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी वित्तीय साक्षरता केंद्र, बँक ऑफ इंडियाचे समन्वयक पी. आर. मिठारे, जिल्हा उद्योग केंद्राचे एच. एस. साखरे, डॉ. प्रमोद चौधरी, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे वि. आ. काळे, जिल्हा माहिती अधिकारी संप्रदा बीडकर, लक्ष्मीकांत सारडा उपस्थित होते.
उपायुक्त योगेश कुलकर्णी म्हणाले, वस्तू सेवा कर (जी. एस. टी.) ही प्रणाली केंद्र राज्य शासनांच्या समन्वयातून तयार करण्यात आली आहे. या करप्रणालीमुळे करचुकवेगिरीला आळा बसणार आहे. जी. एस. टी. कर प्रणालीमुळे जवळपास 18 विविध कर बंद झाले असून एकच वस्तू सेवा कर लागू झाला आहे. या कर प्रणालीचे दडपण घेऊ नये, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
    उपायुक्त योगेश कुलकर्णी म्हणाले, वस्तू सेवा कर प्रणाली सोप्या पध्दतीने हाताळता येणार आहे. पूर्वीच्या कर प्रणालीमधील बहुतांशी नियम शिथील करण्यात आले असून कमीत कमी नियमावली यामध्ये ठेवण्यात आली आहे. या प्रणालीत आयजीएसटी, एसजीएसटी, सीजीएसटी असे तीन विभाग करण्यात आले आहेत. करदात्यांना त्यांना लागू असणाऱ्या कर प्रणालीमध्ये कर भरता येणार आहे. जीएसटी संदर्भात कोणत्याही अडचणीबाबत मार्गदर्शन करण्याकरिता विक्रीकर कार्यालयात मदत कक्ष स्थापन करण्यात आला आहे. त्याचे दूरध्वनी क्रमांक 0233-2623719, 2624053, 2622528 हे आहेत. या बाबतीत सर्वतोपरी सहकार्य करू, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
    जिल्हा शासकीय रूग्णालयाचे डॉ. प्रमोद चौधरी यांनी आरोग्य विभागामार्फत देण्यात येणाऱ्या रूग्णवाहिका, प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्त्व योजना, जननी सुरक्षा योजना यांच्यासह अवदावदानाची माहिती दिली. अवयवदानाची माहिती देताना ते म्हणाले, सध्या अद्ययावत तंत्रज्ञानाने अवयव प्रत्यारोपण शक्य झाले आहे. अवयवदान म्हणजे एखाद्या मरणासन्न गरजू व्यक्तीला दुसऱ्या जिवंत अथवा मृत व्यक्तीकडून एखाद्या अवयवाचे होणारे प्रत्यारोपण. यामुळे विविध गंभीर आजारांवर उपचार साध्य होत आहेत. देशात अनेक रूग्णांना विविध अवयवांची गरज आहे. अवयवदानाने एक व्यक्ती अनेकांचे जीवन फुलवू शकते. अवयवदान हा अवयवाच्या प्रतिक्षेत असलेल्या रूग्णाच्या जीवनातील एकमेव आशेचा किरण आहे. म्हणूनच अवयवदान हे उदात्त कार्य आहे. रक्तदान, नेत्रदानाच्या पलीकडे जावून इतर अवयवदानाची मोठी चळवळ उभी राहणे गरजेचे आहे.
    सामाजिक सुरक्षा योजनांची माहिती देताना पी. आर. मिठारे यांनी जनधन योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, प्रधानमंत्री जीवनज्योती योजना, सुकन्या समृद्धी योजना, मुद्रा योजना, स्टँड अप इंडिया या योजनांचे स्वरूप लाभ यांची माहिती दिली. तर एच. एस. साखरे यांनी जिल्हा उद्योग केंद्रामार्फत राबवल्या जाणाऱ्या प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, बीज भांडवल योजना, उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम आदि योजनांचे स्वरूप स्पष्ट केले.
वि. आ. काळे यांनी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून दिल्याजाणाऱ्या कर्जसुविधेसाठी अटी, निकष उत्पन्नमर्यादा यांची माहिती दिली. तसेच जिल्हा कौशल्य विकास, रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या माध्यमातून व्होकेशनल ट्रेनिंग संस्थांमध्ये दिल्या जाणाऱ्या प्रशिक्षणाची माहिती दिली. यावेळी महाराष्ट्र शासनाचे मुखपत्र असलेले लोकराज्य मासिक जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने प्रकाशित करण्यात आलेल्या घडीपत्रिका उपस्थितांना मोफत भेट देण्यात आल्या.
जिल्हा माहिती अधिकारी संप्रदा बीडकर यांनी प्रास्ताविकात कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला. तर लक्ष्मीकांत सारडा यांनी आभार मानले. यावेळी श्री कापडपेठ गणेश मंडळाचे पदाधिकारी, सदस्य रौनक बजाज, श्रीराम पडीयार, रमन सारडा, नागरिक, महिला युवा वर्ग उपस्थित होता.
00000







कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा