गुरुवार, ३१ ऑगस्ट, २०१७

महाअवयवदान अभियानांतर्गत सांगली येथे मानवी साखळी व पथनाट्याव्दारे जनजागृती

    सांगली, दि. 31, (जि. मा. का.) : महाअवयवदान अभियान नेत्रदान पंधरवडा अंतर्गत पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रूग्णालय सांगली येथे मानवी साखळी सोशल ग्रुपच्या वतीने नेत्रदान अवयवदानावर आधारित पथनाट्याचे सादरीकरण करण्यात आले.
    पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रूग्णालय सांगली येथे आयोजित या कार्यक्रम प्रसंगी खासदार संजयकाका पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत, मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रामचंद्र हंकारे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुबोध उगाणे, नेत्र विभाग प्रमुख डॉ. शरद शेगावकर, डॉ. राजेंद्र भागवत, अवयव प्रत्यारोपण समन्वयक तथा नेत्रदान समुपदेशक अविनाश शिंदे आदि मान्यवर उपस्थित होते.
    यावेळी मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून अवयवदानाबाबत प्रतिज्ञा घेऊन अवयवदान नेत्रदान जनजागृतीसाठी मानवी साखळी करण्यात आली. त्याचबरोबर सोशल ग्रुपच्या वतीने नेत्रदान अवयवदानावर आधारित पथनाट्याचे सादरीकरण करण्यात आले. या मानवी साखळीत मान्यवरांसमवेत भारती विद्यापीठ मेडिकल कॉलेज, सांगली, वसंतदादा पाटील आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज, राजर्षि छत्रपती शाहू महाराज कृषि व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय परिचर्या प्रशिक्षण महाविद्यालय पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रूग्णालय सांगली या महाविद्यालयातील विद्यार्थी पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रूग्णालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.
    यावेळी खासदार संजयकाका पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत यांनी अवयवदानाचे महत्त्व सांगून, यामुळे एखाद्या व्यक्तीला जीवनदान मिळू शकते. त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी मरणोत्तर अवयवदानाचा संकल्प करण्याचे आवाहन केले. तसेच अवयवदान जनजागृती अभियानात युवकांनी सक्रिय सहभाग घेऊन जनजागृती करण्याचे आवाहन केले.
अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे म्हणाल्या, जनतेतून अवयवदानाला चालना मिळावी यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रूग्णालय, मिरज येथून अवयवदान जनजागृतीसाठी मोटर सायकल रॅलीचे दिनांक 1 सप्टेंबर 2017 रोजी सायंकाळी 6.30 वाजता आयोजन करण्यात आले आहे. या मोटार सायकल रॅलीची सांगता पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रूग्णालय सांगली येथे होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
    जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे म्हणाले, ब्रेन डेड व्यक्तिंचे अवयव दान करण्यासाठी त्यांच्या नातेवाईकांची संमती घ्यावी. ब्रेन डेड व्यक्तींचे त्यांच्या नातेवाईकांच्या संमतीने हृदय, यकृत, फुफ्फुस, किडनी, डोळे, त्वचा आदि अवयव काढण्याची परवानगी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रूग्णालय मिरजला मिळाली आहे. तरी एखाद्याला जीवनदान देण्यासाठी मरणोत्तर अवयवदान करावे. अवयवदानाच्या जनजागृतीसाठी सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
    यावेळी भारती विद्यापीठ मेडीकल कॉलेज, सांगली वसंतदादा पाटील आयुर्वेदिक मेडिकल कॉलेजमध्ये शिक्षण घेत असलेल्या जवळपास 150 विद्यार्थ्यांनी अवयवदानाचा संकल्प केला. कार्यक्रमास पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रूग्णालयाचे अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
00000









कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा