बुधवार, १६ ऑगस्ट, २०१७

डॉल्बीमुक्तीतून जलयुक्तकडे या उपक्रमातून युवा शक्तीत परिवर्तनाचा विचार पेरला आहे - पालकमंत्री सुभाष देशमुख

सांगली, दि. 15, (जि. मा. का.) : देशाचे भविष्य तरूण पिढीच्या हातात आहे. तरूण पिढी समृद्ध झाली तरच देश समृद्ध होईल. या युवा शक्तीचा उपयोग राष्ट्रविकासासाठी होणे गरजेचे आहे. डॉल्बीमुक्तीतून जलयुक्तकडे या उपक्रमातून तरूणाईत परिवर्तनाचा विचार पेरला गेला आहे, असे प्रतिपादन सहकार, पणन वस्त्रोद्योग मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी केले.
सांगली जिल्हा पोलीस दलाच्या वतीने गणेशोत्सव 2016 दरम्यान जातीय सलोखा या योजनेंतर्गत घेण्यात आलेल्या विघ्नहर्ता पुरस्कार वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी कृषि राज्यमंत्री सदाभाऊ खोत, आमदार शिवाजीराव नाईक, आमदार सुरेश खाडे, आमदार सुधीर गाडगीळ, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील, जिल्हाधिकारी वि. ना. काळम, पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे, अतिरीक्त पोलीस अधिक्षक शशिकांत बोराटे व्यासपीठावर उपस्थित होते.
स्वातंत्र्यदिन आणि श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छा देऊन पालकमंत्री सुभाष देशमुख म्हणाले, 1942 साली चले जाव घोषणा केली, त्याला यंदा 75 वर्षे पूर्ण होत आहेत. ही घोषणा झाल्यानंतर पाच वर्षांनी देशाला स्वातंत्र्य मिळाले.   आज शंभर वर्षांनंतर आपण सर्वजण गरीबीमुक्त भारताचा संकल्प करूया. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलेल्या गरीबीमुक्त भारताच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देऊया. समाजातील शेवटच्या घटकाचा विकास हेच उद्दिष्ट ठेवून पाच वर्षांचा आराखडा करूया. या विचारातून, प्रेरणेतून युवा शक्तीनेही काम करावे. जिल्हा पोलीस दलाने या कामी पुढाकार घेऊन तरूणांना याबाबत दिशा द्यावी, असे त्यांनी सूचित केले. यावेळी लोकमंगल परिवाराच्या वतीने पोलीस दलाच्या बक्षीस रकमेत योगदान देऊ, असे त्यांनी सांगितले.
स्वातंत्र्यदिन आणि आगामी गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देऊन राज्यमंत्री सदाभाऊ खोत म्हणाले, डॉल्बीमुक्त गणेशोत्सव या उपक्रमातून पोलीस दलाने तरूणाईला चांगल्या गोष्टीसाठी बांधून ठेवले आहे. त्यांना रचनात्मक कार्यामध्ये सहभागी करून घेतले आहे.
आमदार शिवाजीराव नाईक म्हणाले, ध्वनीप्रदूषण टाळणे आणि अनाठायी खर्चाला फाटा देणे, हे दोन्ही हेतू डॉल्बीमुक्त गणेशोत्सव संकल्पनेतून साध्य झाले आहेत.
आमदार सुधीर गाडगीळ यांनी डॉल्बीमुक्त गणेशोत्सव या उपक्रमासाठी शुभेच्छा देऊन, याही वर्षी हा उपक्रम राबवावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.
डॉल्बीमुक्त गणेशोत्सव या संकल्पनेंतर्गत कोल्हापूर परिक्षेत्रात सर्वात चांगले काम सांगली जिल्ह्यात झाले आहे, याबद्दल समाधान व्यक्त करून विश्वास नांगरे पाटील म्हणाले, सांगली जिल्ह्यात रचनात्मक आणि सकारात्मक काम झाले आहे. यातून जमा झालेल्या रकमेतून ग्रामीण भागात बंधाऱ्यांचे चांगले काम झाले आहे. या कामाची नोंद माननीय मुख्यमंत्री महोदयांनीही घेतली आहे. हा रचनात्मक आणि सकारात्मक कार्याचा उत्सव याही वर्षी सुरू ठेवूया.
जिल्हाधिकारी वि. ना. काळम म्हणाले, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी उत्स्फूर्तपणे आणि जिंदादिलीने सहभाग घेतल्याने सामाजिक एकोपा आणि संस्कृती जोपासना होण्यास मदत होणार आहे.
यावेळी दिघंचीच्या क्रांती मंडळाच्या माध्यमातून गावात सहा सीसीटीव्ही बसवण्यात येणार असल्याचे मंडळाचे अध्यक्ष गणेश माने यांनी सांगितले.
प्रास्ताविकात दत्तात्रय शिंदे म्हणाले, गणेशोत्सव मंडळांना पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याबाबत केलेल्या आवाहनाला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. जिल्ह्यातील 1369 गणेशोत्सव मंडळांनी यात हिरीरीने सहभाग घेतला. यातून जमा झालेल्या जवळपास 28 लाख रुपये रकमेतून सुखकर्ता विघ्नहर्ता हे बंधारे बांधण्यात आले आहेत.
यावेळी पोलीस विभागाचे अधिकारी, कर्मचारी, शांतता समितीचे सदस्य, गणेश मंडळांचे पदाधिकारी, अध्यक्ष, सदस्य उपस्थित होते.


00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा