रविवार, २७ ऑगस्ट, २०१७

मुद्रा बँक, आर्थिक सुरक्षिततेच्या योजनांचा लाभ घेऊन नागरिकांनी स्वतःची उन्नती साधावी - आर. एस. पुजारी

लोकमान्य कला, क्रीडा, सांस्कृतिक मंडळाच्या सहकार्याने ‘संवादपर्वÔ’ उपक्रम उत्साहात संपन्न

      सांगली, दि. 28 (जि. मा. का.) : सामान्य जनतेच्या आर्थिक सुरक्षिततेसाठी केंद्र शासनाने प्रधानमंत्री जनधन योजना, प्रधानमंत्री जीवनज्योती योजना, प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजना, अटल पेन्शन योजना अशा योजना सुरू केल्या आहेत. त्याबरोबरच समाजातील सर्व घटकांना स्वतःचा व्यवसाय उभारण्यासाठी कर्ज उपलब्ध व्हावे, यासाठी प्रधानमंत्री मुद्रा बँक योजनाही सुरू केली आहे. या योजनेनुसार कुठल्याही प्रकारचे तारण किंवा जामिनदाराशिवाय होतकरू, बेरोजगार यांना कर्जपुरवठा करण्यात येतो. त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी अर्थसहाय्य देण्यात येते. या योजनांचा लाभ घेऊन स्वतःचे जीवनमान उंचावावे, असे आवाहन जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक आर. एस. पुजारी यांनी केले.
सांगली येथे आयोजित संवादपर्व कार्यक्रमात ते बोलत होते. जिल्हा माहिती कार्यालय लोकमान्य कला, क्रीडा, सांस्कृतिक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने दैवज्ञ भवनच्या सभागृहात हा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी महसूल विभागाचे नायब तहसीलदार अरूण सोनवणे, मिरज तालुका कृषि अधिकारी कार्यालयाचे कृषि पर्यवेक्षक बाळासाहेब शिंदे, सामाजिक कार्यकर्त्या सीमा पाटील, जिल्हा माहिती अधिकारी संप्रदा बीडकर आदि मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
आर. एस. पुजारी म्हणाले, प्रधानमंत्री जनधन योजनेंतर्गत शून्य बॅलन्सवर बँक खाते काढले जात असून 1 लाखाच्या अपघाती विम्याचे या योजनेत संरक्षण दिले आहे. त्याचा कसलाही प्रीमियम खातेदारास भरावा लागणार नाही. तसेच कमीत कमी सहा महिने व्यवस्थीत बचत खात्यावर व्यवहार करणाऱ्या स्त्री खातेदारांना (कुटुंब प्रमुख) कमीत कमी 1 हजार ते जास्तीतजास्त 5 हजारापर्यंतच्या ओव्हरड्राफ्ट कर्जसुविधेचा अंतर्भाव आहे. ही उघडलेली बँकखाती ही शासनाच्या विविध अनुदान योजनासही सहाय्यभूत होणार आहेत.
आर. एस. पुजारी म्हणाले, प्रधानमंत्री जीवन ज्योती योजनेंतर्गत वार्षिक हप्ता केवळ 330 रुपये असून या योजनेत एका वर्षाचे विमा संरक्षण मिळते. 18 ते 50 वर्षापर्यंतच्या सहभागी बँकमध्ये बचत खाते असणाऱ्या सर्व खातेदारांना यामध्ये सामील होता येईल. प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेंतर्गत कोणत्याही कारणामुळे झालेल्या मृत्युसाठी विमा संरक्षण देऊ केले आहे.
आर. एस. पुजारी म्हणाले, प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजनेंतर्गत वार्षिक हप्ता केवळ 12 रुपये असून योजना कालावधी दरवर्षी 1 जून ते 31 मे असा आहे. बचत खात्यात दरवर्षी 1 जून रोजी 12 रुपये शिल्लक असणे आवश्यक आहे. या योजनेत वर्षभरासाठी  वैयक्तिक अपघाती विम्याचे संरक्षण देण्यात आले असून 18 ते 70 वयोगटातील सर्व बचत खाते धारक या योजनेसाठी पात्र आहेत.
उन्नत शेती, समृद्ध शेतकरी, शेतकऱ्यांसाठी परदेश दौरा, मातीपरीक्षण, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना, मागेल त्याला शेततळे, प्रधानमंत्री ठिबक सिंचन योजना आदि कृषि विभागाच्या योजनांची सविस्तर माहिती देऊन, कृषि  पर्यवेक्षक बाळासाहेब शिंदे म्हणाले, शेतकऱ्यांसाठी परदेश दौऱ्यासाठी 30 सप्टेंबर अंतिम मुदत असून, अधिकाधिक शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ द्यावा. अधिक माहितीसाठी कृषि विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
नायब तहसीलदार अरूण सोनवणे यांनी महसूल विभागाच्या योजनांची माहिती देताना संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना यांची सविस्तर माहिती दिली. यावेळी महाराष्ट्र शासनाचे मुखपत्र असलेले लोकराज्य मासिक जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने प्रकाशित करण्यात आलेल्या घडीपत्रिका उपस्थितांना मोफत भेट देण्यात आल्या.
प्रास्ताविकात जिल्हा माहिती अधिकारी संप्रदा बीडकर म्हणाल्या, संवादपर्व या उपक्रमाचे हे दुसरे वर्ष आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून शासन आपल्या दारी आले आहे. या उपक्रमातून राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी योजना सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवल्या जात आहेत.

यावेळी शरद नलावडे, लोकमान्य कला, क्रीडा, सांस्कृतिक मंडळाचे पदाधिकारी, महिला नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा