रविवार, २७ ऑगस्ट, २०१७

शासकीय योजना सामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी ‘संवादपर्वÔ’ उपयुक्त - राज्यमंत्री सदाभाऊ खोत

सांगली, दि. 26 (जि. मा. का.) : समाजाच्या विविध स्तरातील नागरिकांसाठी राज्य शासनाच्या अनेक कल्याणकारी योजना आहेत. नागरिकांच्या गरजा पाहून राज्य शासन धोरण आखत असते. समाजाला दिशा देण्यासाठी, नवी पिढी घडवण्यासाठी या योजनांचा तळागाळातील नागरिकांनी अधिकाधिक लाभ घेणे गरजेचे आहे. या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी जिल्हा माहिती कार्यालयाने आयोजित केलेला संवादपर्व उपक्रम उपयुक्त आहे, असे प्रतिपादन कृषि फलोत्पादन, पणन आणि पाणीपुरवठा स्वच्छता राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केले.
कडेगाव येथे आयोजित संवादपर्व कार्यक्रमात ते बोलत होते. जिल्हा माहिती कार्यालय लिबर्टी गणेश मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, तहसीलदार अर्चना शेटे, तालुका कृषि अधिकारी एन. टी. पिंजारी, आरोग्य विभागाचे डॉ. पत्की, कडेगाव नगरपंचायतीचे मुख्याधिकारी चरण कोल्हे, जिल्हा माहिती अधिकारी संप्रदा बीडकर, राजाराम गरूड, चंद्रसेन देशमुख, लिबर्टी गणेश मंडळाचे अध्यक्ष श्रीजय देशमुख, संजय देशमुख आदि मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
 कृषि राज्यमंत्री सदाभाऊ खोत म्हणाले, मुख्यमंत्री पेयजल योजनेच्या राज्याच्या एकूण निधीपैकी अर्धा निधी सांगली जिल्ह्यासाठी मिळाला आहे. या माध्यमातून ग्रामीण भागातील जनतेला दिलासा देण्याचे काम राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. तसेच, मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून राज्यातील अनेक गरजू आणि गरीब रूग्णांवर मोफत उपचार होत आहेत. ही एक प्रकारे रूग्ण सेवाच आहे.
कृषि विभागाच्या अनेक योजना शहरी भागाला लागू होत नाहीत. त्या पार्श्वभूमिवर कृषि विभागाच्या योजना नगरपरिषद नगरपंचायत क्षेत्रासाठी लागू करण्याचा मानस कृषि राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी यावेळी व्यक्त केला. तसेच, कडेगावमधील महिलांनी दारूबंदीसाठी उचलेलेले पाऊल निश्चितच कौतुकास्पद असून, ते यशस्वी करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे त्यांनी सांगितले. कर्जमाफीचे अर्ज भरण्यासाठी 15 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिली असून, तळागाळातील शेतकऱ्याचा अर्ज भरला जाईल, यासाठी प्रयत्नशील असल्याचे राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी यावेळी सांगितले.
उपस्थितांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देऊन जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख म्हणाले, संवादपर्व उपक्रमाच्या माध्यमातून शासन आपल्या दारी आले आहे. गतिमान विकासासाठी जिल्हा परिषद प्रयत्न करत आहे. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून 6 कोटी पेक्षा अधिक रुपयांचा निधी पाणीपुरवठा योजनांसाठी राज्य शासनाने दिला आहे. ज्याप्रमाणे कडेगावमधील महिला दारूबंदीसाठी प्रयत्न करत आहेत, त्याचप्रमाणे शासकीय योजनांची माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले पाहिजेत. यावेळी लिबर्टी गणेश मंडळाने साकारलेल्या प्रतिकृतीतून शिक्षणाचा संदेश दिल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
तहसीलदार अर्चना शेटे यांनी महसूल विभागाच्या योजनांची माहिती देताना संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, निरंतर मतदार यादी पुनरिक्षण कार्यक्रम यांची सविस्तर माहिती दिली.
तालुका कृषि अधिकारी एन. टी. पिंजारी यांनी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना, मागेल त्याला शेततळे, प्रधानमंत्री ठिबक सिंचन योजना, उन्नत शेती, समृद्ध शेतकरी आदि कृषि विभागाच्या योजनांची सविस्तर माहिती दिली.
ग्रामीण रूग्णालयात देण्यात येत असलेल्या सोयी सुविधा राबवण्यात येणाऱ्या शासकीय योजनांच्या पार्श्वभूमिवर आरोग्य अधिकारी डॉ. पत्की यांनी जननी सुरक्षा योजना, जननी शिशु सुरक्षा योजना, प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्त्व योजना, शालेय आरोग्य तपासणी, मलेरिया अन्य तत्सम आजार, सर्पदंश लसी, श्वानदंश लसी, मोफत नेत्रतपासणी, कुटुंब नियोजन आदि आरोग्य विभागाच्या योजना त्यासाठी आवश्यक कागदपत्रे यांची माहिती दिली. मुख्याधिकारी चरण कोल्हे यांनी स्वच्छ भारत अभियान, रमाई आवास योजना, प्रधानमंत्री आवास योजना यांची माहिती सांगितली. यावेळी महाराष्ट्र शासनाचे मुखपत्र असलेले लोकराज्य मासिक जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने प्रकाशित करण्यात आलेल्या घडीपत्रिका उपस्थितांना मोफत भेट देण्यात आल्या.
प्रास्ताविकात जिल्हा माहिती अधिकारी संप्रदा बीडकर म्हणाल्या, संवादपर्व या उपक्रमाचा जिल्ह्यातील शुभारंभ कडेगाव येथे होत आहे. या उपक्रमाचे हे दुसरे वर्ष आहे. या उपक्रमांतर्गत शासन आणि जनता यांच्यात संवाद साधण्याचे काम होत आहे. या माध्यमातून राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी योजना सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवल्या जात आहेत. सूत्रसंचालन हिराजी देशमुख यांनी केले. आभार उदय देशमुख यांनी मानले.
यावेळी कडेगाव नगरपंचायतीच्या महिला बालकल्याण सभापती अनिता देशमुखे, धनजंय देशमुख, रवींद्र पालकर, नगरसेवक नितीन शिंदे, उदय देशमुख, नगरसेविका अश्विनी वेल्हाळ, कुलदीप  दोडके, शौकत पटेल, संजय गांधी निराधार योजनेचे वाळवा तालुकाध्यक्ष भास्कर कदम, रिपाइंचे अरुण कांबळे यांच्यासह लिबर्टी गणेशोत्सव गणेश मंडळाचे पदाधिकारी, नागरिक, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
00000



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा