सोमवार, १४ ऑगस्ट, २०१७

समाजातील प्रत्येक घटकाच्या कल्याणासाठी राज्य शासन कटिबद्ध - पालकमंत्री सुभाष देशमुख

भारतीय स्वातंत्र्याचा 70 वा वर्धापनदिन उत्साहात संपन्न
सांगली, दि. 15, (जि. मा. का.) : सांगली जिल्हा विकासाच्या सर्व टप्प्यांवर अग्रेसर ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. समाजातील प्रत्येक घटकाच्या कल्याणासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे,  अशी ग्वाही  सहकार, पणन वस्त्रोद्योग मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी  दिली.
    भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या 70 व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणात आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी खासदार संजयकाका पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, आमदार मोहनराव कदम, जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, जिल्हाधिकारी वि. ना. काळम, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत, पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे, महापालिका आयुक्त रवींद्र खेबुडकर यांच्यासह अन्य पदाधिकारी अधिकारी उपस्थित होते.
    जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात आयोजित मुख्य शासकीय सोहळ्यात पालकमंत्री सुभाष देशमुख यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर राष्ट्रध्वजाला सलामी देण्यात आली राष्ट्रगीताचा कार्यक्रम पार पडला. त्यानंतर त्यांनी जनतेला शुभेच्छा संदेश दिला.
शुभेच्छा संदेशात स्वातंत्र्यसैनिक आणि शहिदांच्या प्रती नतमस्तक असल्याचे सांगून पालकमंत्री सुभाष देशमुख म्हणाले, सांगली जिल्हा विकासाच्या सर्व टप्प्यांवर अग्रेसर ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा ऐतिहासिक आणि सर्वात मोठा निर्णय राज्य शासनाने घेतला. या निर्णयामुळे सांगली जिल्ह्यातील दीड लाखापेक्षा कमी थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांचा सात बारा कोरा होणार आहे. यासाठी शेतकऱ्यांनी नजीकच्या सेतू किंवा सुविधा केंद्रात जावून ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने अर्ज भरावेत. या माध्यमातून राज्य शासन बळीराजाच्या पाठिशी खंबीरपणे उभे आहे, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
जिल्ह्यातील 8 लाख, 18 हजार, 370 सात बारा  गटांचे एडिट मोड्युलमधील काम शंभर टक्के पूर्ण झाले असल्याचे सांगून पालकमंत्री सुभाष देशमुख म्हणाले, खातामास्टर रिएडिटचे  काम सुरू आहे. हे काम पूर्ण                  झाल्यावर संपूर्ण राज्यातील खातेदार कुठूनही आपला सातबारा संगणकावर घरबसल्या मिळवू शकेल. त्याचा वेळ, पैसा श्रम वाचतील, याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
महाराजस्व अभियानाच्या माध्यमातून महसूल प्रशासन अधिकाधिक लोकाभिमुख गतिमान करण्यासाठी जिल्ह्यात समाधान मेळावे घेण्यात आले असल्याचे सांगून पालकमंत्री सुभाष देशमुख म्हणाले, गेले वर्षभरात 273 शिबिरे आयोजित करून, त्या माध्यमातून 2 लाख, 30 हजार, 363 दाखले दिले. त्याचबरोबर एकूण 100 किलोमीटर अंतराचे 90 शिवाररस्ते अतिक्रमणमुक्त केले. झिरो पेंडंसी अंतर्गत ऑनलाईन टपाल ट्रॅकिंग प्रणालीचा वापर करण्यात येत आहे. त्यामुळे महसूल विभागाचे कामकाज अधिक गतिमान होऊन शून्य प्रलंबितता दैनंदिन निर्गती राखण्यात येत आहे, असे ते म्हणाले.
राज्य शासनाने पहिल्यांदाच हमी भावाने विक्रमी जवळपास 70 लाख क्विंटल तूर खरेदी केली. त्यातून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे, असे सांगून पालकमंत्री सुभाष देशमुख म्हणाले, सहकार विभागामार्फत राष्ट्रीय कृषि बाजार योजनेंतर्गत शेतमालाला योग्य भाव मिळवून देण्यासाठी सुरू केलेल्या नाम योजनेची माहिती दिली. तसेच, राज्यात पालकमंत्री सुभाष देशमुख म्हणाले, स्वच्छ भारत अभियानामध्ये सांगली जिल्ह्यात नागरी भागात सर्वच नगरपरिषदा नगरपंचायतींनी हागणदारीमुक्त होत राज्यात नाव मिळवले आहे. त्याचप्रमाणे ग्रामीण भागही हागणदारीमुक्त झाला आहे. जिल्ह्यातील सर्व 699 ग्रामपंचायती हागणदारीमुक्त झाल्या आहेत. तसेच, सांगली-मिरज-कुपवाड महापालिकाही हागणदारीमुक्त घोषित केली आहे. याबद्दल त्यांनी संबंधित पदाधिकारी अधिकाऱ्यांचे कौतुक केले.
 यावेळी पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी सांगली जिल्हा पोलीस दलाच्या डॉल्बीमुक्त गणेशोत्सव उपक्रम आणि वन विभागाच्या 4 कोटी वृक्षलागवड मोहिमेंतर्गत उद्दिष्टापेक्षाही जास्त वृक्ष लागवड केल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
पालकमंत्री सुभाष देशमुख म्हणाले, शेरीनाल्याचे कृष्णा नदीत जाणारे पाणी रोखण्यासाठी राज्य शासनाने 4 कोटी रुपये निधी मंजूर केला आहे. हे काम लवकरात लवकर पूर्ण होईल. तसेच, काळी खण सुशोभिकरणासाठी राज्य शासनाने 50 लाख रुपये निधी दिला आहे. तसेच, सांगली - मिरज - कुपवाड महानगरपालिकेकडून पाणी पुरवठ्यासाठी 70 एम.एल.डी. योजनेचे काम सुरू आहे. ही एक अत्याधुनिक पाणीपुरवठा योजना आहे. या योजनेचे काम 95 टक्के पूर्ण झाले असून, येत्या काही दिवसात ही योजना कार्यान्वित होईल सांगलीकरांना शुद्ध पेयजल मिळेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
सातारा जिल्ह्यातील वांग मराठवाडी प्रकल्प हा महाराष्ट्रातील एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. या प्रकल्पाचा समावेश प्रधानमंत्री कृषि सिंचन योजनेत झाला असल्याचे सांगून पालकमंत्री सुभाष देशमुख म्हणाले, या प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन सांगली जिल्ह्यातील कडेगाव खानापूर या तालुक्यांमध्ये करण्यात येत आहे. या तालुक्यातील 11 ठिकाणी प्रकल्पग्रस्तांच्या वसाहती केल्या आहेत. तसेच, अशा धरणग्रस्तांना शासनाकडून जमीन वाटप सुरू आहे. त्यामध्ये 866 प्रकल्पग्रस्तांना 728 हेक्टर जमिनीचे वाटप यापूर्वी केले आहे. दि. 4 ऑगस्टला कडेगाव येथे उरलेल्या प्रकल्पग्रस्तांपैकी 95 जणांना 71 हेक्टर जमिनीचे वाटप करण्यात आले. याप्रकरणी पुढाकार घेऊन कार्यवाही केल्याबद्दल जिल्हाधिकारी, अप्पर जिल्हाधिकारी जिल्हा पुनर्वसन शाखेचे अधिकारी कर्मचारी यांचे अभिनंदन त्यांनी यावेळी केले.
यावेळी पालकमंत्री सुभाष देशमुख यांच्या हस्ते राष्ट्रपती पोलीस पदक प्राप्त सहायक पोलीस फौजदार सुरेंद्रनाथ आवळे तसेच नक्षलग्रस्त भागात महत्त्वाची भूमिका बजावल्याबद्दल विशेष सेवा पदक प्राप्त सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ यांचा सत्कार करण्यात आला. सांगलीची सुकन्या स्मृती मानधना हिने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल पुरस्कार वितरण करण्यात आला. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी त्रिगुण कुलकर्णी यांचा उत्कृष्ट अधिकारी म्हणून पालकमंत्री सुभाष देशमुख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नवीन इमारती सभोवती सर्व बगीचा स्व:खर्चातून उभा केल्याबद्दल सिध्दार्थ गाडगीळ यांचा तर सुबोध भिंगार्डे शैलेश नर्सरी मलकापूर यांनी ना नफा ना तोटा तत्त्वावर सर्व रोपे पुरवल्याबद्दल त्यांचा सत्कारही मंत्री महोदयांच्या हस्ते करण्यात आला. काही गावातील सातबारे प्रातिनिधीक स्वरूपात पालकमंत्री महोदयांच्या हस्ते वितरीत करण्यात आले.
संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत पुरस्कार वितरण, गुणवंत विद्यार्थी पुरस्कार वितरण, प्रातिनिधीक स्वरूपात प्रकल्पग्रस्तांना प्लॉट वाटप आदेशाचे वितरण, अंजनी येथील माजी सैनिक हवालदार कै. बाबूराव पिराजी पाटील, यांच्या विधवा पत्नी श्रीमती शांताबाई बाबूराव पाटील यांना धनादेशाचे वितरण, दिव्यांगांना अपंगत्व प्रमाणपत्र, मतदान ओळखपत्र वाटप, उन्नत शेती समृध्द शेतकरी मोहिमेंतर्गत कृषि यांत्रिकीकरण उपअभियानांतर्गत ट्रॅक्टर वाटप पालकमंत्री  महोदयांच्या हस्ते करण्यात आले.
ध्वजारोहणाच्या या सोहळ्यास पद्मश्री डॉ. विजयकुमार शहा, अप्पर जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण, निवासी उपजिल्हाधिकारी त्रिगुण कुलकर्णी, सर्व उपजिल्हाधिकारी, जिल्ह्यातील मान्यवर, ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी, स्वातंत्र्य सैनिक यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी, नागरिक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन विजयदादा कडणे यांनी केले.    
00000





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा