रविवार, २७ ऑगस्ट, २०१७

मरावे परी अवयवरूपी उरावे

जन्म आणि मृत्यू यांच्यामध्ये जीवन आहे. प्रत्येक व्यक्तीला जीवनाची आस सोडवत नाही. परंतु, मृत्यु अटळ आहे. मृत्युनंतरही आपण जिवंत राहू शकतो, ते म्हणजे अवयवदानाने. सध्याच्या जगात शाश्वत मूल्य हे अवयवदानाचे आहे. हा संस्कार आपण सर्वांनी अंगी बाणवून मरावे परी अवयवरूपी उरावे, हा संकल्प करूया.
जगात सर्वप्रथम बोस्टनमध्ये जिवंत दात्याचे मूत्रपिंड प्रत्यारोपण 1954 साली झाले. रोनाल्ड ली हेरिक यांनी त्यांच्या जुळ्या भावाला त्यांचे एक मूत्रपिंड दान केले होते. त्यामुळे हे शक्य झाले. 1963 साली पहिल्यांदा फुफ्फुस प्रत्यारोपण, 1967 साली पहिल्यांदा यकृत प्रत्यारोपण आणि हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आल्या. अवयव प्रत्यारोपणातील संशोधनासाठी 2010 साली जोसेफ मरे यांना वैद्यकीय क्षेत्रातील नोबेल पुरस्काराने गौरवण्यात आले.
विविध अवयवांच्या प्रतीक्षेत आज अनेक रूग्ण आहेत. अशा वेळी मृत्युनंतर अवयवदान केल्यास एखाद्याला जीवनदान केल्यासमान आहे. हे पुण्य मोजता येणारे आहे. अवयवदानाने एक व्यक्ती अनेकांचे जीवन फुलवू शकते. हे दान अमूल्य आहे.  वेळेत अवयव मिळाल्यामुळे राज्य आणि देश मोठमोठ्या व्यक्तींना गमावून बसला आहे. याची समाजात उदाहरणे आहेत. त्यामुळे सर्व माणसांनी आपल्या देहाचा वापर चांगल्या कामासाठी करावा. अवयवदानाबाबत अनेक गैरसमज आहेत. जिवंत अवयवदान केल्यास प्रकृतीला कोणताही धोका नसतो. समुपदेशन केल्यास लोकांचे मन वळवता येईल.
अवयवदान म्हणजे काय ?
   एखाद्या मरणासन्न गरजू व्यक्तीला दुसऱ्या जिवंत अथवा मृत व्यक्तीकडून एखाद्या अवयवाचे होणारे दान म्हणजे अवयवदान. अवयवदान हा अवयवाच्या प्रतिक्षेत असलेल्या रूग्णाच्या जीवनातील एकमेव आशेचा किरण आहे. अवयवदान हे उदात्त कार्य असून आपल्या मृत्यूनंतर दुसऱ्यांना जीवदान देण्याची ती पारलौकिक संधी आहे हे लक्षात घ्या.
कोणते अवयव दान केले जाऊ शकतात ?
   किडनी, हृदय, यकृत, फुफ्फुस, स्वादुपिंड, आतडे, हाडे, त्वचा नेत्र हे अवयव दान केले जाऊ शकतात.
अवयवदान कोण करू शकते ?
   जिवंत व्यक्ती संपूर्ण किडनी किंवा यकृताचा थोडा भाग दान करू शकते. घरात मृत झालेली व्यक्ती त्वचा नेत्रदान करू शकते. ब्रेन डेड व्यक्ती सर्व अवयवदान करू शकते. HOTA (1994) म्हणजे अवयवदान प्रत्यारोपन कायद्यान्वये 18 वर्षावरील (सज्ञान) व्यक्ती दातापत्र (Donor Card) व्दारे संमतीपत्र देऊन अवयवदानासाठी नाव नोंदणी करू शकते. 18 वर्षाखालील व्यक्तीच्या पालकांच्या संमतीने अवयवदान पत्र भरले जाऊ शकते.
ब्रेन डेड व्यक्ती म्हणजे काय ?
   ज्या व्यक्तीची शुध्द हरपली आहे ज्या व्यक्तीची श्वसनक्रिया बंद पडली आहे पण हृदयक्रिया चालू आहे, जी दोन्ही कार्ये त्या व्यक्तीमध्ये परत चालू होण्याची (वैद्यकिय तज्ज्ञांच्या चार प्रमाणित डॉक्टरांच्या टिमच्या मताप्रमाणे) कोणतीही शक्यता नाही, अशा व्यक्तीला ब्रेन डेड म्हणून घोषित करण्यात येते. मोठा मेंदू लहान मेंदू हा मज्जारज्ज्‌ूशी ब्रेनस्टेम नावाच्या भागाव्दारे जोडला गेलेला असतो. या ब्रेन-स्टेम मध्ये माणसाची शुध्दावस्था श्वसनक्रिया चालू ठेवणारी केंद्रे असतात. काही आजारामध्ये ब्रेनस्टेमची ही केंद्रे कार्य करेनाशी झाल्यावर त्या व्यक्तीची हृदयक्रिया चालू राहते पण शुध्द हरपते श्वसनक्रिया बंड पडते. अशा व्यक्तीला ब्रेनस्टेम डेड किंवा ब्रेन डेड व्यक्ती म्हणून संबोधले जाते.
ब्रेनडेड म्हणून घोषित कसे केले जाते ?
    HOTA (1994) या अवयवप्रत्यारोपण कायद्याअंतर्गत नोंदणीकृत रूग्णालयाच्या अतिदक्षता विभागात शासनाने प्रमाणित केलेल्या चार डॉक्टरांच्या पथकामार्फत रूग्णाच्या ब्रेनडेड अवस्थेवर शिक्कामोर्तब केले जाते (या चार डॉक्टरांच्या अवयव प्रत्यारोपणाच्या प्रक्रियेत कोणताही प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष सहभाग असता कामा नये अशी कायदेशीर तरतूद आहे). यानंतर रूग्णाच्या नातेवाईकाशी अवयवदानाविषयी संपर्क साधला जातो.
अवयवदान का करावे ?
   मृत व्यक्तीच्या पश्चात धर्मानुसार ते शरीर दफन किंवा दहन केले जाते सर्व अवयव नष्ट होतात. त्या ऐवजी अवयवदान केल्यास गरजू रूग्णाच्या जीवनात हेच अवयव नविन जीवन फुलवू शकतात मृत व्यक्ती जणू परत जीवन जगू शकते. पुण्य मिळविण्याचा यापेक्षा अलौकिक मार्ग कोणता असू शकतो ?
आपण अवयवदाता कसे बनू शकता ?
   अवयवदातापत्र (Donar Card) भरून आपण नोंदणीकृत अवयवदाता बनू शकता. www.dmer.org किंवा www.ztccmumbai.org या वेबसाईटवर लॉगइन करून ऑनलाईन नोंदणी करू शकता. नजीकच्या वैद्यकीय महाविद्यालयात संपर्क साधून आपण या विषयी अधिक माहिती घेऊ शकता. वैद्यकिय शिक्षण संचालक, मुंबई यांच्याकडेही अवयवदातापत्र आपण भरून समक्ष देऊ शकता.
सध्या अद्ययावत तंत्रज्ञानाने अवयव प्रत्यारोपण शक्य झाले आहे. यामुळे विविध गंभीर आजारांवर उपचार साध्य होत आहेत. रक्तदान, नेत्रदानाच्या पलीकडे जावून इतर अवयवदानाची मोठी चळवळ उभी राहणे गरजेचे आहे. अवयवदाना अंतर्गत जिवंत व्यक्तीचे एक मूत्रपिंड किंवा यकृताचा तुकडा प्रत्यारोपण करण्यात येतो. तसेच कॅडेव्हर/ मस्तिष्क स्तंभ मृत पश्चात मूत्रपिंड, यकृत, हृदय, त्वचा, फुफ्फुस इत्यादी अवयव दान करता येतात. अवयवदाते स्वेच्छेने पुढे आल्यास ही चळवळ पुढे नेता येईल. एकप्रकारे हा पुनर्जन्मच म्हणता येईल.
चला तर मग ..... अवयवदानाच्या पवित्र कार्यात सहभागी होऊया...
संकलन 
जिल्हा माहिती कार्यालय
सांगली


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा