गुरुवार, १३ ऑक्टोबर, २०२२

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती प्रोत्साहनपर अनुदान योजनेच्या पात्र लाभार्थ्यांची पहिली यादी प्रसिध्द - जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी

पात्र लाभार्थ्यांनी आधार प्रमाणीकरण 18 ऑक्टोबर पर्यंत पूर्ण करावे सांगली, दि. 13, (जि. मा. का.) : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 योजनेच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये नियमित कर्जदारांना 50‍ हजार रूपये पर्यंत प्रोत्साहन अनुदान योजनेची अंमलबजावणी सुरु झाली आहे. या योजनेच्या अनुषंगाने शासनामार्फत दि. 13 ऑक्टोबर 2022 रोजी एकूण 62 हजार 642 इतक्या लाभार्थी शेतकऱ्यांची यादी कर्जमाफीच्या पोर्टलवर प्रसिध्द करण्यात आली आहे. या याद्या ग्रामपंचायत, बॅक शाखा, विकास सोसायटी, सी.एस.सी.सेंटर/आपले सरकार सेवा केंद्र, सहाय्यक निबंधक सहकरी संस्था यांच्या कार्यालयात शेतकऱ्यांना पाहण्यास मिळतील. या योजनेचा लाभ मिळण्यासाठी आधार प्रमाणिकरण करणे आवश्यक आहे. यादीमध्ये नाव असलेल्या पात्र लाभार्थी शेतकऱ्यांनी कुठलाही विलंब न लावता दि. 18 ऑक्टोबर 2022 पर्यंत जवळच्या आपले सरकार केंद्र / सी.एस.सी.सेन्टर किंवा बॅक शाखेत जावून आधार प्रमाणीकरण करुन घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी व जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे यांनी केले आहे. आधार प्रमाणिकरण पूर्ण केलेल्या शेतकऱ्यांच्या सेव्हींग खात्यावर शासनाकडून लाभाची रक्कम संबंधित बँक खात्यावर वर्ग होणार आहे. सांगली जिल्ह्याची एकूण 1 लाख 60 हजार 795 इतक्या खात्यांची माहिती पोर्टलवर अपलोड करण्यात आलेली आहे. त्यापैकी पहिल्या यादीमध्ये एकूण 62 हजार 642 इतक्या लाभार्थ्यांची नावे समाविष्ट आहेत. उर्वरीत पात्र लाभार्थ्यांच्या याद्या यापुढे शासनाकडून वेळोवेळी प्रसिध्द करण्यात येणार आहेत. यादीत नाव असलेल्या शेतकऱ्यांनी योजना संपण्यापूर्वी विनाविलंब आपले आधार प्रमाणीकरण पूर्ण करुन घ्यावे, असे आवाहनही जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी व जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे यांनी केले आहे. आधार प्रमाणीकरण न केल्यास प्रोत्साहनपर अनुदान लाभाची रक्कम लाभार्थ्याच्या खात्यावर जमा होणार नाही. यादीतील लाभार्थ्यांनी यादीमधील आपला विशिष्ठ क्रमांक, आधार कार्ड व बँकेचे पासबुक घेवून जवळच्या आपले सरकार केंद्र / सी.एस.सी.सेंटर किंवा बॅक शाखेत जावून आधार प्रमाणिकरण पुर्ण करावे. आधार प्रमाणिकरण बायोमेट्रीक पध्दतीने किंवा मोबाईल OTP द्वारे करता येईल. या दोन्ही पर्यायाने आधार प्रमाणिकरण न झाल्यास आधार प्रमाणिकरण शक्य नाही (Unable to E-KYC) हा पर्याय निवडून तक्रार करता येईल. या तक्रारींची निराकरण तालुका स्तरीय समिती व जिल्हा स्तरीय समितींमार्फत करण्यात येईल. आधार नंबर किंवा रक्कम चूकीची असल्यास अधार अमान्य किंवा रक्कम अमान्य हा पर्याय निवडून तक्रार जनरेट करावी व मिळणारी पावती स्वत:कडे ठेवावी. तसेच एकापेक्षा जास्त कर्ज खाती असल्यास सर्व खात्यांचे आधार प्रमाणिकरण केल्यानंतर रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे. मयत लाभार्थ्यांच्या वारसांनी बँकेमध्ये जावून त्यांची वारसनोंद करून घ्यावयाची आहे. तसेच ज्यांनी आपले बँक खात्यास आधार क्रमांक लिंक केलेला नाही त्यांनी तात्काळ आपले आधार लिंक करून घेणे आवश्यक आहे. सर्व बँकांच्या शाखा, तालुक्यातील उप/ सहाय्यक निंबंधक, सहकारी संस्था, कार्यालय व सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यालय येथे या योजनेसाठी मदत कक्ष उभारणी करण्यात आला आहे. तरी मुदतीच्या आत सर्व पात्र शेतकऱ्यांनी आपले आधार प्रमाणिकरण पुर्ण करून घ्यावे, असे आवाहनही करण्यात आले आहे. 00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा