बुधवार, १९ ऑक्टोबर, २०२२

खाजगी वाहतुकदारांनी निर्धारीत दरापेक्षा अधिक दर आकारल्यास कारवाई

सांगली, दि. 19, (जि. मा. का.) : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे त्या त्या संवर्गातील टप्पा वाहतुकीचे सद्यस्थितीचे भाडेदर विचारात घेऊन खाजगी कंत्राटी परवाना वाहनाचे त्या संवर्गासाठी संपूर्ण बससाठी येणाऱ्या प्रति कि.मी. भाडे दराच्या 50 टक्के पेक्षा अधिक राहणार नाही असे कमाल भाडे दर शासनाने दि. 27 एप्रिल 2018 च्या शासन निर्णयान्वये निश्चित केले आहेत. प्रवाशांना गर्दीच्या हंगामात प्रवास करताना येणाऱ्या अडचणी, तक्रारी बाबत 8830770550 या व्हॉटसॲप क्रमांकावर किंवा dyrto.10-mh@gov.in या ई-मेल आयडीवर संबंधित वाहनाच्या तिकीटांच्या प्रति, वाहनाचे व नोंदणी क्रमांकाच्या छायाचित्रासह तक्रार नोंदविता येईल. सदर तक्रारीची शहानिशा करून मोटार वाहन कायद्यानुसार संबंधितावर कारवाई करण्यात येईल, असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी सांगली यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे. राज्यातील सर्व प्रादेशिक परिवहन अधिकारी व उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांना परिवहन आयुक्त यांनी दिलेल्या निर्देशानुसार राज्यात सुरू होणाऱ्या दिवाळी, ख्रिसमस इत्यादी सणांच्या कालावधीत उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या कार्यकारी अधिकारी यांना पुढीलप्रमाणे निर्देश दिले आहेत. गर्दीच्या हंगामात खाजगी बस मालकाकडून शासनाने निश्चित केलेल्या प्रति कि.मी. भाडेदरापेक्षा अधिक भाडे आकारात नसल्याचे वेळोवेळी खातरजमा करावी. या प्रकरणी वेळोवेळी दिलेल्या आदेशांची अंमलबजावणी करावी. खाजगी वाहतुकदारांनी निर्धारीत करण्यात आलेल्या दरापेक्षा अधिक दर आकारल्यास सदर वाहतुकदारावर मोटार वाहन कायद्यान्वये कडक कारवाई करावी. 00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा