बुधवार, १२ ऑक्टोबर, २०२२

जागतिक दृष्टी दिनी नेत्र चिकित्सा अधिकाऱ्यांना नेत्ररोग आजारांची तपासणी करण्याचे आवाहन

सांगली, दि. 12, (जि. मा. का.) : जागतिक दृष्टी दिन सन 2000 पासून ऑक्टोबर महिन्याच्या दुसऱ्या गुरूवारी साजरा करण्यात येतो. यावर्षी 23 व्या जागतिक दृष्टी दिनी दि. 13 ऑक्टोबर रोजी सांगली जिल्ह्यातील विविध उपजिल्हा रूग्णालये, ग्रामिण रूग्णालये, तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र येथे विविध नेत्ररोग आजारांची तपासणी नेत्र चिकित्सा अधिकारी यांनी करावी, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे, जिल्हा नेत्र शल्य चिकित्सक डॉ. संजय पाटील यांनी केले आहे. जागतिक दृष्टी दिन साजरा करण्याचा मुख्य उद्देश हा सामान्य जनतेमध्ये खासकरून वयस्क व्यक्ती व लहान मुले यांना विविध नेत्र आजार होऊ नये म्हणून घ्यावयाच्या काळजी व उपचार याबाबत जनजागृती करणे तसेच मोतिबिंदू, खुपऱ्या, डायबेटीक रेटीनोपॅथी, लहान मुलांमधील नेत्र विकार, नेत्र विकारांचा प्रतिबंध व व्यवस्थापन करणे हा आहे. ग्रामीण भागातील तसेच शहरी भागातील नेत्र तपासणी झालेल्या रूग्णांना पुढील उपचारासाठी पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रूग्णालय सांगली येथे संदर्भित करावे. त्याचबरोबर नेत्र आजार असलेल्या जास्तीत जास्त लहान मुलांचा शोध घेवून संदर्भित सेवेसाठी समर्पित संस्थांमध्ये समन्वय निर्माण करून लहान मुलांचे नेत्रविकाराचे उपचार करावेत, अशा सूचना नेत्र चिकित्सा अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रूग्णालय सांगली येथील नेत्र बाह्य विभागात तसेच राष्ट्रीय अंधत्व व दृष्टी क्षीणता नियंत्रण कार्यक्रमांतर्गत अशसकीय स्वयंसेवी संस्था येथे मोफत मोतीबिंदू तपासणी, काचबिंदू, खुपऱ्या, डायबेटीक रेटीनोपॅथी, लहान मुलांमधील नेत्र विकार यांची तपासणी करण्यात येत आहे, याचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक डॉ. गायत्री खोत यांनी केले आहे. तसेच या कार्यक्रमास जास्तीत जास्त युवक युवतींनी नेत्रदानाचा संकल्प फॉर्म भरून हातभार लावावा, असे आवाहनही करण्यात आले आहे. 00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा