मंगळवार, १८ ऑक्टोबर, २०२२

शेतकऱ्यांना अनुदानित दरात मिळणार महाबीजचा हरभरा

सांगली, दि. 18, (जि. मा. का.) : राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान व ग्रामबिजोत्पादन योजनेंतर्गत शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी महाबीजचे हरभरा बियाणे अनुदानित दरात मिळणार आहे. या योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन महाबीजचे कोल्हापूर व सांगली जिल्ह्याचे जिल्हा व्यवस्थापक एन. जी. इनामदार यांनी केले आहे. सोयाबीन व भात कापणी मळणीला सुरूवात झाल्याने रब्बी हंगामाची लगबग दिसून येत आहे. त्या अनुषंगाने शासनातर्फे राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान व ग्रामबिजोत्पादन योजना जिल्ह्यात कृषी विभागातर्फे राबविण्यात येत आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान या योजनेमध्ये जिल्ह्याला 428 क्विंटल बियाणे वितरित करण्याचे उद्दिष्ट आहे. या योजनेंतर्गत तालुका कृषी अधिकारी कार्यालयामार्फत परमिट वाटप होणार आहे. राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान या योजनेंतर्गत हरभरा (दहा वर्षाआतील वाण) 45 रूपये प्रति किलो या अनुदानित दराप्रमाणे तर ग्रामबिजोत्पादन योजनेंतर्गत हरभरा (दहा वर्षाआतील वाण) 45 रूपये प्रति किलो व दहा वर्षावरील वाण 52 रूपये प्रति किलो या अनुदानित दराप्रमाणे महाबीजच्या वितरकांकडे उपलब्ध होणार आहे. या योजनेंतर्गत दहा वर्षाआतील हरभरा फुले विक्रम, राजविजय-202, एकेजी-1109, ठळड-10216 व दहा वर्षावरील विजय, दिग्वीजय, विशाल व जॅकी-6218 हे वाण उपलब्ध होणार आहेत. हरभरा दहा वर्षाआतील वाणाची मूळ किंमत 70 रूपये प्रति किलो आहे. यामध्ये अनुदान 25 रूपये प्रति किलो असून अनुदानित दर 45 रूपये प्रति किलो आहे. हरभरा दहा वर्षावरील वाणाची मूळ किंमत 72 रूपये प्रति किलो आहे. यामध्ये अनुदान 20 रूपये प्रति किलो असून अनुदानित दर 52 रूपये प्रति किलो आहे. या योजनेत एका शेतकऱ्याला सातबारा, आधारकार्ड घेऊन एक बॅग वितरीत करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री. इनामदार यांनी केले आहे. 00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा