रविवार, ३० जून, २०२४

सांगली, मिरज येथील शासकीय रुग्णालये अत्याधुनिक यंत्रसामग्रीने सुसज्ज बनविणार - वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ

सांगली दि. 30 (जि.मा.का.) : सामान्य गोरगरीब माणसाला चांगल्या दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी सांगली व मिरज वैद्यकीय महाविद्यालयातील रुग्णालयास आवश्यक अत्याधुनिक यंत्र सामग्री देऊन या ठिकाणच्या आरोग्य सुविधा अधिक बळकट केल्या जातील. या आरोग्य सुविधांसाठी प्राधान्याने निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज मिरज येथे बोलताना केले. मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून घेण्यात आलेल्या नवीन एमआरआय मशीनचे लोकार्पण व नूतनीकरण केलेल्या सीएसएसडी विभागाचे उद्घाटन वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते व कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. कार्यक्रमास पोलीस अधीक्षक संदीप घुगे, उपजिल्हाधिकारी दादासाहेब कांबळे, अधिष्ठाता डॉ. सुधीर नणंदकर, नूतन अधिष्ठाता डॉ. प्रकाश गुरव, जिल्हा नियोजन अधिकारी अशोक पाटील, वैद्यकीय अधीक्षक डॉ. रुपेश शिंदे व प्रियांका राठी यांच्यासह वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉक्टर्स व विद्यार्थी उपस्थित होते. वैद्यकीय शिक्षण मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, खाजगी रुग्णालयात ज्या प्रमाणे आधुनिक यंत्र सामग्री उपलब्ध आहे, त्याच प्रमाणे शासकीय रुग्णालयात आवश्यक यंत्र सामग्री व आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यास शासनाने प्राधान्य दिले आहे. सामान्य माणसाला प्राधान्याने आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी शासनामार्फत शासकीय रुग्णालयांना अधिकचा निधी उपलब्ध करून दिला जात आहे. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातूनही मोठ्या प्रमाणात निधी दिला जात असल्याचे त्यांनी सांगितले. मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, वैद्यकीय सेवांसाठी मिरज शहराचा मोठा लौकिक आहे. पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी जिल्हा नियोजन समितीमधून आरोग्य सेवांसाठी अधिकचा निधी दिला ही बाब कौतुकास्पद आहे. या निधीमुळेच नवीन एमआयआर मशीन रुग्णांच्या सेवेसाठी उपलब्ध झाले. सांगली व मिरज येथील शासकीय रुग्णालयास लागणाऱ्या आवश्यक यंत्र सामग्रीसाठी व आरोग्य सुविधांसाठी प्राधान्याने निधी दिला जाईल असे त्यांनी सांगितले. मिरज वैद्यकीय महाविद्यालयातील मुला-मुलींच्या वस्तीगृहाच्या दुरुस्तीसाठी प्रस्ताव पाठवावा. या दुरुस्तीच्या कामास मान्यता व निधी दिला जाईल. मिरज वैद्यकीय महाविद्यालयात हृदयरोग विभाग सुरू करण्याबाबत मानस असल्याचे त्यांनी सांगितले. मिरज वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेऊन येथून बाहेर जाणाऱ्या भावी डॉक्टरांनी समाजातील गोर गरीब रुग्णांची सेवा करावी असे आवाहन त्यांनी केले. सांगली मिरज शहरे आरोग्य पंढरी म्हणून ओळखली जातात. सामान्य माणसाला दर्जेदार व कमी खर्चात आरोग्य सेवा मिळाव्यात यास शासनाने नेहमी प्राधान्य दिले असून सांगली, मिरज मधील शासकीय रुग्णालयांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देऊन दिल्या जातील, असे प्रतिपादन कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी केले. ते म्हणाले मिरज महाविद्यालयाच्या रुग्णालयात जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून २५ कोटीचे एमआरआय मशीन उपलब्ध झाल्याने या भागातील रुग्णांच्या उपचारासाठी याची मोठी मदत होईल. कमी खर्चात अचूक निदान झाल्याने पुढील उपचारासाठी त्याचा लाभ होईल. तसेच सी.एस.एस.डी विभागामुळे दान केलेले अवयव आणि वैद्यकीय साधन सामग्रीचे निर्जंतुकीकरण होण्यास मदत होईल. पालकमंत्री डॉ. खाडे म्हणाले, कोरोना काळात मिरज रुग्णालयाने चांगले काम केले आहे. या ठिकाणी सुपर स्पेशॅलिटी हॉस्पिटल बाबतचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठवण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले. मिरज येथील शासकीय रुग्णालयांमधील आवश्यक पायाभूत सुविधांसाठी निधी दिला जाईल. अधिष्ठाता डॉ. नणंदकर यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. कोरोना काळात रुग्णालयाने चांगले काम केले आहे. वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नवीन सुविधा निर्माण होत असल्याने याचा सामान्य रुग्णांना लाभ होणार असल्याचे ते म्हणाले. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक वैद्यकीय अधीक्षक डॉ. रुपेश शिंदे यांनी केले. या कार्यक्रमात अधिष्ठाता डॉ. सुधीर नणंदकर यांचा सेवा निवृत्तीनिमित्त मंत्री महोदयांच्या हस्ते सत्कार करण्यात आला व नूतन अधिष्ठाता डॉ. प्रकाश गुरव यांचे स्वागत करण्यात आले. ०००००

मंगळवार, २५ जून, २०२४

मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त् पुनरिक्षण कार्यक्रम घोषित - जिल्हायधिकारी डॉ. राजा दयानिधी

सांगली दि. 25 (जि.मा.का.) : भारत निवडणूक आयोगाने आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक विचारात घेऊन दि. 1 जुलै 2024 या अर्हता दिनांकावर (Qualifying Date) आधारित मतदार याद्यांचा दुसरा विशेष संक्षिप्ते पुनरिक्षण कार्यक्रम (Special Summary Revision) घोषित केला आहे, अशी माहिती जिल्हाडधिकारी व जिल्हाप निवडणूक अधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी दिली. मतदार याद्यांचा दुसरा विशेष संक्षिप्ता पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत दिनांक 25 जुलै 2024 ते 9 ऑगसट 2024 या कालावधीत मतदान केंद्रस्तिरीय अधिकाऱ्याकडे नमुना-6, नमुना-7, नमुना-8 चे अर्ज उपलब्धस होतील. दिनांक 2 जुलै 2024 रोजी 18 वर्षे पूर्ण होणारे सर्व नागरीक मतदार यादीत नवीन नाव नोंदणीसाठी नमुना 6 मध्येा अर्ज करुन शकतील. दिनांक 25 जुलै 2024 रोजी प्रसिध्दक होणाऱ्या प्रारुप मतदार यादीमधील नावांबाबत आक्षेप नोंदविण्यास अथवा नाव कमी करण्यासाठी नमुना 7 मध्येप अर्ज करता येईल. मतदार यादीमधील मतदारांच्याम तपशीलात दुरुस्तीा करण्यासाठी, एकाच मतदारसंघात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थालांतरीत झाल्यास, मतदान ओळखपत्र बदलून मिळण्यासाठी तसेच दिव्यां ग व्य क्तीं ना चिन्हां कित करणे इत्यादीकरीता नमुना 8 मध्ये अर्ज करता येईल. Voter Portal, Voter Helpline App या ऑनलाईन पध्द्तीचा वापर करुन मतदार स्वात: नोंदणी / वगळणी / स्थoलांतरण / दुरुस्ती‍ इत्यादी करु शकतात. सांगली जिल्ह्यात सर्व तहसिल कार्यालये व 282-सांगली विधानसभा मतदारसंघासाठी जिल्हाा पुरवठा कार्यालय येथे अशी एकूण 11 मतदार मदत केंद्रे स्थांपन करण्या त आली असून येथे ऑफलार्दन पध्दयतीने अर्ज सादर केले जाऊ शकतात. तसेच मतदार ceo.maharashtra.gov.in या संकेतस्थिळावर मतदार यादीत आपले नाव असल्याची खात्री करु शकतात. पुर्व-पुनरिक्षण उपक्रमांतर्गत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांचेद्वारे प्रत्यक्ष घरोघरी भेट देऊन पडताळणी, मतदान केंद्रांचे सुसुत्रीकरण व प्रमाणकरण करणे, दुबार/समान नोंदी, एका पेक्षा अधिक नोंदी, तांत्रिक त्रुटी दूर करणे, आयोगाच्या मानकानुसार छायाचित्र प्राप्त करुन मतदार यादीत सुधारणा करणे, विभाग/विभाग यांची आवश्यकतेनुसार नव्याने मांडणी करुन मतदान केंद्राच्या सीमांची पुनर्रचना तयार करुन मतदान केंद्रांच्या यादीला मान्यता घेणे, कंट्रोल टेबल अद्ययावत करणे, नमुना 1-8 तयार करणे आणि 1 जुलै 2024 या अर्हता दिनांकावर आधारित पुरवणी व एकत्रित प्रारुप यादी तयार करण्याचा कालावधी मंगळवार, 25 जून 2024 ते बुधवार, 24 जुलै 2024 असा आहे. पुनरिक्षण उपक्रमांतर्गत एकत्रिकृत प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध करणे- गुरुवार, 25 जुलै 2024, दावे व हरकती स्वीकारण्याचा कालावधी- गुरुवार, 25 जुलै 2024 ते शुक्रवार, 9 ऑगस्ट 2024, विशेष मोहिमांचा कालावधी- दावे व हरकती स्वीकारण्याच्या कालावधीत मा. मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र यांनी निश्चित केलेले दोन शनिवार व रविवार, दावे व हरकती निकालात काढणे, अंतिम प्रसिद्धीसाठी आयोगाची परवानगी मागणे, डाटाबेस अद्ययावत करणे, पुरवणी याद्यांची छपाई करणे- सोमावार, 19 ऑगस्ट 2024 पर्यंत आणि मतदार यादीची अंतिम प्रसिद्धी करण्याचा दिनांक मंगळवार 20 ऑगस्ट 2024 असा आहे. 000000

राईट टू गीव्ह अपचे अर्ज ३० जून पर्यंत करण्याचे आवाहन

सांगली दि. 25 (जि.मा.का.) : अनुसूचित जाती प्रवर्गातील ज्या विद्यार्थ्यांकडून महाडिबीटी पोर्टलवर नजर चुकीने अथवा अनावधानानने राईट टू गीव्ह अप पर्याय निवडला गेला आहे, अशा विद्यार्थ्यांनी आपल्या महाविद्यालयाच्या प्रार्चायांशी संपर्क साधून महाविद्यालयाच्या प्राचार्य लॉगीन मधून आपला अर्ज Revert Right to give up Applicaton या पर्यायाचा वापर करुन दि. 30 जून 2024 पूर्वी Revert Back करुन घेणे आवश्यक आहे. तसेच Revert Back झालेला अर्ज देखील विहित वेळेत म्हणेजच दि. 30 जून पूर्वी विद्यार्थी स्तरावरुन तसेच महाविद्यालयस्तरावरुन ऑनलाईनरित्याच अर्ज समाज कल्याण कार्यालय स्तरावर विहित वेळेत सादर करावेत, असे आवाहन समाज कल्याण सांगली कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त जयंत चाचरकर यांनी केले आहे. ज्या विद्यार्थ्यांचे अर्ज महाडिबीटी पोर्टलवरील राईट टू गीव्ह अप या पर्यायाचे बटन नजरचुकीने अथवा अनावधानाने निवडलेल्या विद्यार्थ्यांचे अर्ज प्राचार्य लॉगीनला सादर करण्याची सवलत उपलब्ध करुन देण्यास शासनाने मान्यता दिलेली आहे. अशा सर्व विद्यार्थ्यांनी विहित मुदतीत Revert Back करुन घेण्याची संपूर्ण जबाबदारी विद्यार्थ्यांची असेल, असे आवाहनही श्री. चाचरकर यांनी केले आहे. 00000

अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाकडील कर्ज योजना ऑनलाईन अर्जासाठी पोर्टल विकसित

सांगली दि. 25 (जि.मा.का) : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्या.) मुंबई मार्फत राबविण्यात येणाऱ्या थेट कर्ज योजने (कर्ज मर्यादा १ लाख रू.) तसेच केंद्र शासनाकडून राबविण्यात येत असलेली PMAJAY योजनाचे कर्ज प्रस्तावाचे अर्ज गरजू लाभार्थीना ऑनलाईनव्दारे भरता यावेत या करिता पोर्टल विकसित केले असून त्याची वेबसाईट www.lokshahir.in अशी आहे. मातंग समाज व तत्सम 12 पोटजाती, मांग, मातंग, मिनी मादिंग, मादिंग, दानखणी मांग, मांग महाशी, मदारी, राधेमांग, मांग गारुडी, मांग गारोडी, मादगी, मादिगा या जातीतील इच्छुक अर्जदारांनी महामंडळाकडील कर्जासाठी अर्ज ऑनलाईनव्दारे जमा करावेत. योजनेत अर्ज भरांना पोर्टल बाबत काही अडचण आल्यास 9272173469 या भ्रमणध्वनीवर सकाळी 11 ते 6 वाजेपर्यंत संपर्क साधावा, असे आवाहन साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक लक्ष्मण क्षीरसागर यांनी केले आहे. 000000

चिंचणी येथील मुलींच्या शासकीय वसतिगृहात मोफत प्रवेश सुरू

सांगली दि. 25 (जि.मा.का) : चिंचणी (ता. कडेगाव) येथे सामाजिक न्याय विभागामार्फत चालविण्यात येत असलेल्या मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृहात मागासवर्गीय, इतर मागासवर्गीय, अनुसूचित जमाती, अपंग, अनाथ, आर्थिक मागास, विमुक्त जाती भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्गाच्या इयत्ता 8 वी, 11 वी, प्रथम वर्ष शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थींनींसाठी प्रवर्गनिहाय व गुणवत्तेनुसार मोफत प्रवेश सुरू आहेत. प्रवेशासाठी अर्ज वसतिगृहात विनामूल्य उपलब्ध आहेत, असे वसतिगृहाच्या अधिक्षका यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे. वसतिगृहात निवास, भोजन, शालेय साहित्य (वह्या, पुस्तके, स्टेशनरी, इत्यादी), शालेय गणवेश दोन नग, रेनकोट/ छत्री, गमबूट अशा सुविधा मोफत दिल्या जातात. मासिक निर्वाह भत्ता 600 रूपये, सहल खर्च 2 हजार रूपये, महाविद्यालय विभाग स्टेशनरीकरिता 4 हजार रूपये, प्रोजेक्ट 1 हजार रूपये, गणवेशाकरिता 2 हजार रूपये अशा सुविधा दिल्या जातात. प्रवेशासाठी वसतिगृहाच्या अधिक्षका यांच्याशी संपर्क साधावा. 000000

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत 4 जुलै रोजी रोजगार मेळावा - सहायक आयुक्त जमीर करीम

सांगली दि. 25 (जि.मा.का.) : जिल्हास्तरीय पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा अंतर्गत शिकाऊ उमेदवार (Apprentice) पदासाठी गुरुवार, 4 जुलै 2024 रोजी सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेत रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. पात्र उमेदवारांनी www.rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर आपल्या शैक्षणिक पात्रतेनुसार अर्ज करुन प्रत्यक्ष मुलाखतीसाठी दि. 4 जुलै रोजी सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेमध्ये शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (Govt. I.T.I),गोविंदराव मराठे इंडस्ट्रीयल इस्टेट, माधवनगर रोड, सांगली येथे प्रत्यक्ष उपस्थित राहून या रोजगार मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त जमीर करीम व शासकिय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य व्ही.बी. देशपांडे यांनी केले आहे. खाजगी क्षेत्रात, लहान, मध्यम व मोठे उद्योजक व कारखाने यांना आवश्यक असणारे मनुष्यबळ उपलब्ध करुन देण्यासाठी व समाजात दिवसेंदिवस वाढणारी बेरोजगारीची समस्या दूर करण्याच्या दृष्टिकोनातून जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सांगली आणि शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने या रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या रोजगार मेळाव्यामध्ये शिकाऊ उमेदवार पदांसाठी एकूण 10 खाजगी नामवंत कंपन्या सहभागी होणार असून एकूण 238 पदे भरण्यात येणार असल्याचे श्री. करीम यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे. 00000

सोमवार, २४ जून, २०२४

रमाई आवास योजनेच्या लाभासाठी संपर्क साधण्याचे आवाहन

सांगली दि. 24 (जि.मा.का.) : राज्यातील ग्रामपंचायत, नगरपरिषद व महानगरपालिका क्षेत्रातील अनुसूचित जाती व नवबौध्द व्यक्तींना पक्क्या घराचे बांधकाम करणे / कच्च्या घराचे पक्क्या घरात रुपांतर करणे तसेच शासकीय अभिकरणामार्फत घर खरेदी करण्यासाठी ग्रामीण भागासाठी प्रति लाभार्थी 1 लाख 20 हजार रूपये आणि शहरी भागासाठी 2 लाख 50 हजार रूपये अनुदान सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत रमाई आवास योजनेतून दिले जाते. जिल्ह्यातील पात्र व्यक्तींनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन समाज कल्याण सांगली कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त जयंत चाचरकर यांनी केले आहे. महानगरपालिका क्षेत्रासाठी – सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण सांगली, जुना बुधगाव रोड सांगली व सांगली मिरज व कुपवाड शहर महानगरपालिका या कार्यालयाशी, नगरपालिका क्षेत्राकरिता – संबंधित मुख्याधिकारी नगरपरिषद / नगरपंचायत कार्यालयाशी व ग्रामीण क्षेत्राकरिता संबंधित ग्रामपंचायत व पंचायत समिती कार्यालयाकडे अर्ज करता येईल. अर्ज करताना सादर करावयाची कागदपत्रेमध्ये जागेचा 7/12 उतारा / मालमत्ता नोंदपत्र / 8 अ उतारा, जातीचा दाखला, रहिवासी व उत्पन्नाचा दाखला, बँक पासबुक, आधारकार्ड, घरपट्टी / पाणीपट्टी / वीजबील इ. कागदपत्रे आवश्यक आहेत. योजनेतून लाभ घेण्यासाठी ग्रामीण भागासाठी व्यक्तीची उत्पन्न मर्यादा 1 लाख रूपये व शहरीसाठी 3 लाख रूपये इतकी आहे. 00000

तृतीयपंथीय व्यक्तींनी ओळखपत्रासाठी पोर्टलवर नोंदणी करावी - सहाय्यक आयुक्त जयंत चाचरकर

सांगली दि. 24 (जि.मा.का.) : सामाजिक न्याय व अधिकारीता मंत्रालय, नवी दिल्ली यांच्याकडून तृतीयपंथीय व्यक्तींना (NATIONAL PORTAL FOR TRANSGENDER PERSON - https:// transgender.dosje.gov.in) हे राष्ट्रीय पोर्टल 25 नोव्हेंबर 2020 पासून सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवर तृतीयपंथी व्यक्ती ते कुठेही असतील तेथून ओळखपत्र व प्रमाणपत्र मिळणेकामी ऑनलाईन अर्ज करू शकतात. जिल्ह्यातील तृतीयपंथीय व्यक्तींनी या पोर्टलवर नोंदणी करून ओळखपत्र व प्रमाणपत्र प्राप्त करून घ्यावे, असे आवाहन समाज कल्याण सांगली कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त जयंत चाचरकर यांनी केले आहे. तृतीयपंथीयाचे कल्याण व त्यांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी केंद्र शासनाने तृतीयपंथीय व्यक्तींच्या हक्कांचे संरक्षण कायदा 2019 व 2020 व्दारे मार्गदर्शक सुचना निर्गमित केलेल्या आहेत. त्या अनुषंगाने अर्ज भरताना तृतीयंपथीय व्यक्ती यांनी त्यांचे आधारकार्ड / मतदानकार्ड / पॅनकार्ड / जन्माचा दाखला / रेशनकार्ड / पासपोर्ट / पासबुक / जातीचा दाखला / मनरेगा कार्ड या नमूद दस्तऐवजांपैकी कोणतेही एक कागदपत्र आणि रहिवासाबाबत विहीत नमुन्यातील प्रतिज्ञापत्र अर्ज भरताना अपलोड करणे आवश्यक आहे. केंद्र शासनाच्या तृतीयपंथीय व्यक्तींच्या हक्कांचे संरक्षण कायदा 2020 अन्वये तृतीयपंथीयांना प्रमाणपत्र / ओळखपत्र देण्याचे अधिकार जिल्हाधिकारी यांना प्रदान करण्यात आले आहेत, श्री. चाचरकर यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे. 00000

सर्वोच्च न्यायालयात 29 जुलै ते 3 ऑगस्ट दरम्यान विशेष लोकअदालत सप्ताह

सांगली दि. 24 (जि.मा.का.) : सर्वोच्च न्यायालय, नवी दिल्ली येथे 29 जुलै ते 3 ऑगस्ट 2024 या कालावधीत विशेष लोकअदालत सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या विशेष लोकअदालतमध्ये पक्षकारांनी जास्तीत जास्त सहभाग घ्यावा व जास्तीत जास्त प्रकरण मिटवावीत, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा न्यायाधीश पी. के. शर्मा यांनी केले आहे. या लोकअदालतमध्ये सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेली प्रकरणे तडजोडीसाठी ठेवली जाणार आहेत. जिल्ह्यातील ज्या पक्षकारांची प्रकरणे सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असल्यास व ती तडजोडीने मिटावित, अशी ज्यांची इच्छा असेल ती प्रकरणे विशेष लोकअदालतीमध्ये ठेवता येऊ शकतात. या लोकअदालतीमध्ये पक्षकार प्रत्यक्ष किवा आभासी (Online mode) पध्दतीने सहभागी होऊ शकतात. जिल्ह्यातील प्रकरणे सर्वोच्च न्यायालयाच्या विशेष लोकअदालतीमध्ये ठेवण्यासाठी संबंधित वकीलांना कल्पना द्यावी किंवा अधिक माहितीसाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सांगली यांच्याकडे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. 00000

सर्वोच्च न्यायालयातील प्रलंबित खटले निकाली काढण्याची पक्षकारांना संधी

सांगली दि. 24 (जि.मा.का.) : नवी दिल्ली येथील सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेली खटले निकाली काढण्याची संधी पक्षकारांना उपलब्ध झाली असून ज्या पक्षकारांना प्रलंबित खटले तडजोडीद्वारे निकाली काढावयाचे असतील, अशा पक्षकारांनी सांगली जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सांगली येथे संपर्क साधावा, असे आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष पी. के. शर्मा यांनी केले आहे. नवी दिल्ली येथील सर्वोच्च न्यायालयात 29 जुलै 2024 ते 3 ऑगस्ट 2024 दरम्यान विशेष लोकअदालत सप्ताह होत आहे. या विशेष लोकअदालतीत सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेली प्रकरणे तडजोडीसाठी ठेवली जाणार आहेत. जिल्ह्यातील ज्या पक्षकारांची प्रकरणे सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहेत, ती तडजोडीने मिटावित, अशी इच्छा असणाऱ्या पक्षकारांची प्रकरणे या विशेष लोकअदालतीत ठेवता येणार आहेत. त्यासाठी सांगली जिल्हा व सत्र न्यायालयाचे प्रमुख जिल्हा न्यायाधीश पी. के. शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्वबोलणी बैठक जिल्हा विधी सेवा प्राधिकरण या ठिकाणी घेण्यात येणार आहे. संबंधीत पक्षकार प्रत्यक्ष व आभासी (Online mode) पध्दतीने यात सहभागी होऊ शकतात. तरी अशा पक्षकारांनी जिल्हा न्यायालयाच्या आवारातील जिल्हा विधी सेवा प्राधिकरण या ठिकाणी संपर्क साधावा, असे आवाहन सचिव तथा न्यायाधीश गि. ग. काबळे यांनी केले आहे. 00000

सर्वोच्च न्यायालयातील प्रलंबित प्रकरणाबाबत पक्षकार, वकीलांनी संमती अर्ज सादर करावेत

सांगली दि. 24 (जि.मा.का.) : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाने सर्वोच्च न्यायालयात 29 जुलै 2024 ते 3 ऑगस्ट 2024 दरम्यान विशेष लोकआदालत सप्ताहाचे आयोजन केले आहे. या लोक अदालतीमध्ये सर्वोच्च न्यायालयात प्रकरणे प्रलंबित असलेल्या प्रकरणाबाबत जिल्ह्यातील पक्षकार किंवा त्यांच्या वकीलांनी त्यांचे संमती अर्ज संपर्क कमांक आणि ईमेल पत्त्यासह जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या sangli-disa.mh@bhc.gov.in या ईमेलवर किंवा प्रत्यक्षरित्या सादर करावेत, असे आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष पी. के शर्मा यांनी केले आहे. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाने सांगली जिल्ह्यातील प्रलंबित प्रकरणांपैकी काही प्रलंबित प्रकरणांची यादी जिल्हा न्यायालयाच्या https://sangli.dcourts.gov.in/ या संकेत स्थळावर प्रकाशीत केली आहे. यामध्ये जिल्ह्यातील 5 प्रकरणांचा समावेश असून ही प्रकरणे विशेष लोकअदालतीमध्ये निकाली काढण्यात येणार आहेत विशेष लोकअदालतीमध्ये ठेवण्यात आलेल्या प्रकरणांबाबत जिल्ह्यातील 16 नोटीसा पक्षकारांना जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत बजावण्यात आल्या आहेत. तडजोडीच्या चर्चेची तारीख पक्षकार आणि वकीलांना दिली जाईल. पक्षकार प्रत्यक्षपणे किंवा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाद्वारे देण्यात येणाऱ्या लिंकवर दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित राहू शकतात, असे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव गि. ग. कांबळे यांनी कळविले आहे. 00000

शुक्रवार, २१ जून, २०२४

इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाकडील योजनांचा लाभ घेण्याीचे आवाहन

सांगली, दि. 21, (जि. मा. का.) : महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ मर्यादित हे शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत कार्यरत असून या महामंडळाकडून इतर मागासवर्ग प्रवर्गातील व्यक्तींना स्वयंरोजगाराकरीता तसेच उच्च शिक्षणासाठी अर्थसहाय्य उपलब्ध करुन देते. महामंडळामार्फत 20 टक्के बीज भांडवल योजना, थेट कर्ज योजना, वैयक्तीक कर्ज व्याज परतावा योजना, गट कर्ज व्याज परतावा योजना, शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना, महिला स्वयंसिध्दी व्याज परतावा योजना व कौशल्य विकास प्रशिक्षण योजना अशा विविध कर्ज योजना राबविण्यात येत आहेत. या योजनांचा लाभ घेण्यासाठी इतर मागास प्रवर्गातील गरजू व्यक्तींनी www.msobcfdc.org/msobcfdc.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज दाखल करावेत. अधिक माहितीसाठी महामंडळाच्या सांगली जिल्हा कार्यालयास संपर्क करावा, असे आवाहन महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक रविंद्र दरेकर यांनी केले आहे. व्याज परतावा योजनेमध्ये बँकेकडून घेतलेल्या कर्जाचे व्याज 12 टक्के पर्यंत महामंडळाकडून अदा करण्यात येते. यामध्ये सर्व राष्ट्रीयकृत बँका, खाजगी बँका तसेच सहकारी बँकांचा समावेश करण्यात आलेला आहे. 1) वैयक्तीक कर्ज व्याज परतावा योजना (रु. 10 लक्ष पर्यंत) - बँकेने 10 लाख रूपये पर्यंतच्या लाखापर्यंतच्या मर्यादेत कर्ज मंजूर केलेल्या अर्जदाराने कर्जाचे हप्ते वेळेत /नियमित भरल्यानंतर व्याजाची रक्कम (१२ टक्के मर्यादेत) अर्जदाराच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये दरमहा महामंडळामार्फत जमा करण्यात येते. ही योजना संपूर्णपणे संगणकीकृत आहे. 2) गट कर्ज व्याज परतावा योजना (रु.१० लक्ष ते ५० लक्ष पर्यंत) - फक्त महाराष्ट्रातील इतर मागासवर्गीय प्रवर्गातील महामंडळाच्या निकषांनुसार विहित केलेल्या वार्षिक उत्पन्न मर्यादेतील उमेदवारांच्या बचत गट, भागीदारी संस्था, सहकारी संस्था, कंपनी (कंपनी अधिनियम 2013 अंतर्गत), LLP, FPO अशा शासन प्रमाणिकरण प्राप्त संस्थांना बँकेमार्फत स्वयंरोजगार उद्योग उभारणीकरीता जे कर्ज दिले जाईल, त्या कर्ज रक्कमेवरील व्याज परतावा हा बँक प्रमाणिकीकरणानुसार महामंडळाकडून अदा केला जाईल. ही योजना संपूर्णपणे संगणकीकृत आहे. 3) महिला स्वयंसिध्दी व्याज परतावा योजना (रु.५.०० लक्ष ते १०.०० लक्ष पर्यंत)- राज्यातील महिला बचत गटातील इतर मागास प्रवर्गातील महिलांनी उत्पादीत केलेल्या वस्तुंचे उत्पादन, प्रक्रिया, मुल्य आधारित उद्योगाकरीता बँकेमार्फत मंजूर करण्यात आलेल्या 5 लक्ष ते 10 लक्षपर्यंत कर्ज रक्कमेवरील 12 टक्के व्याजाचा परतावा उपलब्ध करून देण्यात येईल. ही योजना महिला आर्थिक विकास महामंडळाच्या लोकसंचलित साधन केंद्र (CMRC) च्या सहाय्याने राबविण्यात येणार आहे. 4) शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना (रु.१० लक्ष ते २० लक्ष पर्यंत) – उच्च शिक्षणासाठी राज्य, देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्याकरीता इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थी/विद्यार्थीनींना बँकेमार्फत उपलब्ध होणाऱ्या शैक्षणिक कर्ज रक्कमेवरील व्याजाचा परतावा करणे, इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थी/विद्यार्थीनींना उच्च शिक्षणासाठी बँकेकडून राज्यांतर्गत व देशांतर्गत अभ्यासक्रमासाठी 10 लक्ष रूपये व परदेशी अभ्यासक्रमासाठी 20 लक्ष रूपये इतके महत्तम कर्ज अदा करण्यात येईल. अर्ज करण्याची कार्यपध्दती - अर्ज करण्यासाठी वेबसाईट www.msobcfdc.org असून महामंडळाच्या वेबसाईटवर गेल्यानंतर MENU मध्ये कर्ज योजनेचा अर्ज दाखल करण्यासाठी NEW REGISTRATION मध्ये जावून USER ID & PASSWORD तयार करुन संपूर्ण माहिती भरावी. अर्जासोबत फोटो, आधार कार्ड, पॅन कार्ड, रेशन कार्ड, लाईट बील/टॅक्स पावती, रहिवासी दाखला, बँक पासबुक, उत्पन्नाचा दाखला (तहसिलदार यांचेकडील), जन्माचा दाखला, शैक्षणिक पुरावा, जातीचा दाखला इत्यादी मुळ कागदपत्र स्कॅन करुन लोड करावीत. 00000

निरोगी राहण्यासाठी नियमितपणे योग करा - पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे

बिरनाळे आर्किटेक्चर कॉलेज येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा सांगली, दि. 21, (जि. मा. का.) : निरोगी राहण्यासाठी सर्वांनी नियमितपणे योग करण्याची गरज आहे. प्रत्येकाने किमान अर्धा तास दररोज योग करावा आणि आपले आरोग्य निरोगी ठेवावे, असे आवाहन पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी आज आंतरराष्ट्रीय योगदिन कार्यक्रम प्रसंगी केले. जिल्हा प्रशासन, क्रीडा विभाग व बिरनाळे आर्किटेक्चर कॉलेज व आयुर्वेदिक महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय योग दिवस बिरनाळे आर्किटेक्चर कॉलेज व आयुर्वेदिक महाविद्यालय येथे उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे, आमदार सुधीर गाडगीळ, जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, कोल्हापूर विभागाचे क्रीडा उपसंचालक माणिक पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी किरण बोरवडेकर, बिरनाळे कॉलेजचे संस्थापक सागर बिरनाळे, महाविद्यालयाच्या प्राचार्या श्रीमती वाटेगावे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व मान्यवर नागरिकांनी सहभाग घेतला. आंतरराष्ट्रीय योग दिन कार्यक्रमात विविध आसने, प्राणायम, ध्यान इत्यादी योग क्रिया घेण्यात आल्या. 00000

लघु उद्योजकांना जिल्हा पुरस्कारासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 15 जुलै - महाव्यवस्थापक विद्या कुलकर्णी

सांगली दि. 21 (जि.मा.का.) : उद्योग क्षेत्रामधील असामान्य कामगिरी करणाऱ्या लघु उद्योजकांकरीता राज्य शासनामार्फत जिल्हा पुरस्कार देण्यात येतात. या पुरस्कारासाठी अर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक 15 जुलै 2024 असून सांगली जिल्ह्यातील पात्र लघु उद्योजकांनी विहीत मुदतीत अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक विद्या कुलकर्णी यांनी केले आहे. जिल्हा पुरस्कारासाठी उद्योग आधार हा स्थायी लघु उद्योग म्हणून उद्योग संचालनालय यांच्याकडे मागील तीन वर्षेपुर्वीचा नोंदणीकृत असावा. मागील तीन वर्षे सलग उत्पादन प्रक्रियेत असलेला असावा. लघु उद्योग हा कोणत्याही संस्थेचा अथवा बँकेचा थकबाकीदार नसावा. तसेच यापुर्वी राज्य अथवा केंद्र शासनाचा कोणताही पुरस्कार प्राप्त नसावा. पुरस्कारासाठी लघु उद्योगाची निवड करताना त्याने केलेली भांडवली गुंतवणूक, अधुनिक तंत्रज्ञान, सुव्यवस्थापन, घटनेचे ठिकाण, सामाजिक कार्य, कर्मचारी सोयी सवलती, आयात-निर्यात क्षमता, स्वावलंबन तसेच उद्योजक हा नवीन पिढीतील नवउद्योजक असावा. उत्पादित वस्तु बाबतची गुणवत्ता इत्यादी विचार करण्यात येतो. जिल्हा पुरस्कार प्रथम क्रमांकास 15 हजार रूपये व व्दितीय क्रमांकास 10 हजार रूपये, शाल, श्रीफळ, प्रमाणपत्र तसेच मानचिन्ह देण्यात येते. पुरस्कारासाठी विहीत नमुन्यातील अर्ज जिल्हा उद्योग केंद्र, सांगली यांच्याकडे विनामुल्य उपलब्ध आहेत. अर्ज करण्याकरीता तसेच पुरस्काराच्या अधिक माहितीसाठी महाव्यवस्थापक जिल्हा उद्योग केंद्र, उद्योग भवन सांगली यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. 00000

डी.एल.एड. प्रथम वर्ष प्रवेशासाठी अर्ज करण्यास 25 जून पर्यंत मुदतवाढ

सांगली दि. 21 (जि.मा.का.) : राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांच्या मार्फत शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी डी.एल.एड (D.El.Ed) प्रथम वर्ष प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी दि. 18 जून 2024 पर्यंत मुदत देण्यात आली होती. परंतु बऱ्याच संस्था, लोकप्रतिनिधी व संघटनांनी मागणी केल्यामुळे आता अर्ज भरण्यासाठी 25 जून 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, असे राज्यस्तरीय डी.एल.एड प्रवेश निवड, निर्णय व प्रवेश संनियंत्रण समिती पुणे चे अध्यक्ष तथा राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषण महाराष्ट्र पुणे चे संचालक राहूल रेखावार यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे. याबाबतच्या सर्व सूचना, प्रवेशपात्रता इत्यादी बाबी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे www.maa.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. ऑनलाईन अर्ज भरल्यानंतरचे फेरीनिहाय सविस्तर सुधारित वेळापत्रक संकेतस्थळावर उपलब्ध आहे. यासाठी उमेदवारांनी व शैक्षणिक संस्थांनी वेळोवेळी संकेतस्थळ पाहण्याची दक्षता घ्यावी, असे प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे. 00000

जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू

सांगली, दि. 21, (जि. मा. का.) : विविध आंदोलने, आगामी सण, उत्सव, जयंतीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था परिस्थिती अबाधित रहावी या करीता प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून जिल्हादंडाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी सन 1951 च्या महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37(1)(3) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार सांगली जिल्हा स्थलसिमा हद्दीत दि. 22 जून 2024 ते दि. 7 जुलै 2024 अखेर पर्यंत खालील कृत्ये करण्यास मनाई केली आहे. या आदेशानुसार शस्त्रे, सोटे, तलवारी, भाले, दंडे, बंदुका, सुरे, काठ्या अथवा लाठ्या किंवा शारिरीक इजा करण्यासाठी वापरता येईल अशी इतर कोणतीही वस्तू बरोबर नेणे, कोणताही दाहक पदार्थ अथवा स्फोटक पदार्थ बरोबर नेणे, दगड किंवा इतर क्षेपणास्त्रे किंवा क्षेपणास्त्रे किंवा सोडावयाची किंवा फेकावयाची उपकरणे किंवा साधने बाळगणे, जमा करणे आणि तयार करणे, व्यक्तीचे अथवा प्रेते किंवा आकृत्या किंवा त्यांच्या प्रतिमा यांचे प्रदर्शन करणे, जाहीरपणे घोषणा करणे, गाणी म्हणणे, वाद्ये वाजविणे या कृत्यांना मनाई केली आहे. तसेच ज्याच्या योगाने शांतता व सुव्यवस्था आणि सार्वजनिक मालमत्तेस धोका निर्माण होईल किंवा सभ्यतेला बाधा येईल अशा पध्दतीने हावभाव करणे, फलक चित्रे किंवा चिन्हे तयार करणे, त्यांचे प्रदर्शन करणे आणि प्रसारीत करण्यास मनाई केली आहे. जिल्ह्यात परवानगीशिवाय पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तीस सार्वजनिक ठिकाणी व रस्त्यावर एकत्र जमण्यास मनाई केली आहे. हा आदेश कायदेशीर कर्तव्य बजावीत असलेल्या शासकीय कर्मचारी, धार्मिक विधी, अंत्यविधी व परीक्षा यांना लागू राहणार नाही. हा आदेश दि. 22 जून 2024 रोजीचे 06.00 वाजल्यापासून ते दि. 7 जुलै 2024 रोजीचे 23.59 वाजेपर्यंत अंमलात राहील, असे आदेश जिल्हादंडाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी दिले आहेत. 00000

गुरुवार, २० जून, २०२४

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त बिरनाळे आर्किटेक्चर कॉलेज येथे कार्यक्रमाचे आयोजन

सांगली दि. 20 (जि.मा.का.) : 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा करण्यात येत आहे. यावर्षी 10 वा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात येत असून या निमित्ताने जिल्हा प्रशासन, क्रीडा विभाग व बिरनाळे आर्किटेक्चर कॉलेज, आयुर्वेदिक कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने बिरनाळे आर्किटेक्चर कॉलेज, आयकर कार्यालय जवळ, सांगली येथे सकाळी 7 वाजता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी किरण बोरवडेकर यांनी दिली. योग शास्त्र ही भारतीयांची जगाला दिलेली देणगी आहे. योग दिनाच्या निमित्ताने जगभरात योगासनाची परंपरा स्वीकारणे व ती करणे ही आपल्या देशासाठी अभिमानाची बाब आाहे. योगाच्या दैनंदिन आचरणामुळे निरोगी राहण्यास व रोग मुक्त होण्यामध्ये मदत होऊन सकारात्मक उर्जा मिळते. योग दिन कार्यक्रमास पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे, मान्यवर लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, विविध योग संघटना उपस्थित राहणार आहेत, असे जिल्हा क्रीडा अधिकारी श्री. बोरवडेकर यांनी कळविले आहे. ०००००

बँकांनी पीक कर्ज व प्राथमिक क्षेत्राकरिता कर्ज वाटप गतीने करावे - जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिध

ी सांगली दि. 20 (जि.मा.का.): खरीप हंगामात शेतकऱ्यांना आवश्यक साधनसामग्री वेळीच उपलब्ध होणे महत्वाचे असून यासाठी पतपुरवठा करणाऱ्या सर्व बँकांनी शेतकऱ्यांना तातडीने पीक कर्ज उपलब्ध करून द्यावे. याबरोबरच प्राथमिक क्षेत्राकरीता देण्यात आलेले कर्ज वाटपाचे उद्दिष्ट बँकांनी गतीने पूर्ण करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी दिले. जिल्हास्तरीय सल्लागार व आढावा समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालय सांगली येथे जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली, यावेळी ते बोलत होते. बैठकीला बँक ऑफ इंडियाचे विभागीय प्रमुख राजीव कुमार सिंग, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक विश्वास वेताळ, आरबीआयचे अग्रणी अधिकारी बिस्वजीत दास, नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक निलेश चौधरी, जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सांगली विवेक कुंभार, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे श्री. पाटील, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक विद्या कुलकर्णी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या नंदिनी घाणेकर, माविम चे व्यवस्थापक कुंदन शिनगारे, बीओंआय आरसेटी चे संचालक महेश पाटील तसेच जिल्ह्यातील बँकांचे व्यवस्थापक व विविध महामंडळांचे जिल्हा व्यवस्थापक उपस्थित होते. बैठकीत जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी पीक कर्ज वाटपाचा बँक निहाय आढावा घेतला. चालू वर्षाचे पीक कर्ज वाढवून उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. शेतकऱ्यांना पीक विमा व हवामान आधारित फळ पीक विमा योजनेमध्ये सहभाग नोंदण्याकरिता बँकांनी पीक विमा हप्ते विमा कंपनीकडे वेळेत वर्ग करावेत. जिल्ह्यातील अधिकाधिक नागरिकांना शासनाच्या योजनांचा लाभ देण्याकरिता बँका आणि विविध महामंडळानी परस्पर समन्वय ठेवून लाभार्थ्यांना लाभ द्यावा. कर्ज वाटपात अत्यल्प काम झालेल्या शासकीय विभाग, महामंडळे व बँकांना कामगिरी सुधारण्यासाठी संबंधितांना नोटीस बजवण्याच्या सूचना यावेळी त्यांनी दिल्या. कृषी पायाभूत विकास निधी (AIF व AHIDF), प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना (PMFME), पीएम विश्वकर्मा, पीएमइजीपी,एनएलएम, सीएमइजीपी, पीएम स्वनिधी व महामंडळाच्या योजनांचा लाभ देऊन नवनवीन व्यवसाय उभारणीस प्रोत्साहन देण्याबाबत बँकाना व सर्व शासकीय विभागांना जिल्हाधिकारी यांनी सूचना केल्या. जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे यांनी पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेचे प्रस्ताव बँकांनी वेळेत पाठवण्याच्या सूचना दिल्या. जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक विश्वास वेताळ यांनी जिल्हा वार्षिक पतपुरवठा सन २०२४-२५ अहवालाची माहिती दिली. त्यांनी वार्षिक पतपुरवठा आराखड्या अंतर्गत कृषी, सूक्ष्म, लघु व मध्यम क्षेत्राचे एकूण प्राथमिक क्षेत्राचे उद्दिष्ट ८ हजार ७९० कोटी व अप्राथमिक क्षेत्राकरिता ३ हजार ५०० कोटी असे एकूण उद्दिष्ट १२ हजार २९० कोटीचे ठेवल्याचे सांगितले. सन २०२४-२५ करिता गाई-म्हैशी व मासेमारी करिता कर्ज वाटपाचे आवाहन नाबार्ड जिल्हा व्यवस्थापक निलेश चौधरी यांनी केले. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक कुंभार यांनी PMFME व AIF योजनेचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचे आवाहन बँकांना केले. यावेळी उपस्थितांना उप आयुक्त पशुसंवर्धन विभाग डॉ. अजय थोरे यांनी NLM योजना व AHIDF योजने संदर्भात उपस्थितांना माहिती दिली. बँक ऑफ इंडिया ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था, सांगली यांनी सन २०२४-२५ मधील प्रशिक्षणाचा आढावा दिला. यावेळी जिल्हाधिकारी यांनी नवनवीन उपक्रमांचे प्रशिक्षण आयोजित करून जास्तीत जास्त नागरिकांना लाभ देण्याबाबत सूचना केल्या. या बैठकीत वार्षिक पतपुरवठा आराखडा सन २०२४-२५ व आरसेटी च्या वार्षिक कार्यअहवालाचे चे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. गत वर्षात CMEGP योजनेत चांगली कामगिरी केलेल्या बँकांना प्रमाणपत्र जिल्हाधिकारी यांच्या हस्ते देण्यात आले. गत वर्षात महिला बचत गटांना उमेद अभियान, माविम व इतर वैयक्तिक लाभार्थ्यांना पीएमस्वनिधी, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ या योजना चांगल्याप्रकारे राबवल्याबद्दल संबंधित महामंडळ व सर्व बँकांच्या कामाचे जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी कौतुक केले. 00000

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेच्या लाभासाठी 15 जुलै पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

सांगली दि. 20 (जि.मा.का.) : राज्यातील सर्व महानगरपालिका, विभागीय शहरे आणि जिल्हास्तरीय शैक्षणिक संस्थामध्ये शिक्षण घेत असलेल्या इतर मागास वर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती (भटक्या जमाती - क धनगर समाजाच्या विद्यार्थी वगळून) आणि विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना इयत्ता 12 वी नंतरच्या उच्च शिक्षण घेत असलेल्या परंतु वसतिगृहामध्ये प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत सुरु करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी दि. 15 जुलै 2024 पर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण, सांगली चे सहाय्यक संचालक अमित घवले यांनी केले आहे. या योजनेंतर्गत भोजन, निवास व इतर शैक्षणिक साहित्य उपलब्ध करुन घेण्यासाठी महानगरपालिका, नगरपालिका आणि तालुका क्षेत्रात उच्च शिक्षण घेणाऱ्या इतर मागास वर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती (भटक्या जमाती - क धनगर समाजाच्या विद्यार्थी वगळून) आणि विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना 43 हजार रूपये रक्कम लाभ म्हणून वित्तरीत केली जाणार आहे. पालकाचे उत्पन्न 2 लाख 50 हजार रुपये पेक्षा कमी असणाऱ्या व योजनेच्या अटी शर्ती पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज सादर करावेत. योजनेचे अर्ज व अधिक माहितीसाठी सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण यांचे कार्यालय सांगली, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन जुना बुधगाव रोड, सांगली येथे संपर्क साधवा, असे आवाहनही श्री. घवले यांनी केले आहे. 0000000

शासकीय वसतिगृहांसाठी इमारत भाडेतत्वावर देण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

सांगली दि. 20 (जि.मा.का.) : इतर मागास बहुजन कल्याण विभाग महाराष्ट्र राज्य यांच्यामार्फत इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग या प्रवर्गातील व्यवसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जिल्हानिहाय वसतिगृहे सुरु करण्यात येणार आहेत. या वसतिगृहांसाठी जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी इमारत भाडेतत्वावर देण्यासाठी इच्छुक मालकांनी प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण, सांगली चे सहाय्यक संचालक अमित घवले यांनी केले आहे. सांगली जिल्ह्याच्या ठिकाणी मुलींसाठी 100 विद्यार्थी क्षमतेचे एक वसतिगृह शासनाकडून सुरु करण्यात येणार आहे. ही वसतिगृहे सुरु करण्यासाठी प्रति वसतिगृह सुमारे 8 हजार ते 10 हजार चौ. फुट क्षेत्रफळ इमारत आवश्यक आहे. वसतिगृहासाठी भाड्याने घेण्यात येणाऱ्या इमारतीकरिता सार्वजनिक बांधकाम विभागाने प्रमाणित केलेले भाडे दरमहा मंजूर केले जाणार आहे. इच्छुक इमारत मालकांनी जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी इमारत असल्यास शासकीय वसतिगृहासाठी इमारत भाडेतत्वावर शासनास देण्याकामी इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या शासन निर्णय दि. 13 मार्च 2023 मधील परिशिष्ट 2 व 3 मधील प्रपत्रात शासकीय वसतिगृहासाठीचा प्रस्ताव सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण, सांगली यांचे कार्यालय डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, जुना बुधगांव रोड, सांगली यांच्याकडे तात्काळ सादर करावा. अधिक माहितीसाठी सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण, सांगली या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहनही श्री. घवले यांनी केले आहे. 00000

पंडीत दीनदयाळ उपाध्यय स्वयंम योजनेच्या लाभासाठी तात्काळ अर्ज करण्याचे आवाहन

सांगली दि. 20 (जि.मा.का.) : राज्यातील सर्व महानगरपालिका, विभागीय शहरे आणि जिल्हास्तरीय शैक्षणिक संस्थामध्ये शिक्षण घेत असलेल्या इयत्ता 12 वी नंतरच्या मान्यताप्राप्त तंत्रशिक्षण तसेच व्यवसाय शिक्षण अभ्यासक्रमाच्या शासकीय तसेच अनुदानित महाविद्यालयामध्ये केंद्रिभूत प्रवेश प्रक्रियेद्धवारे प्रवेश घेतलेल्या पंस्तु शासकीय वसतिगृहामध्ये प्रवेश न मिळालेल्या धनगर समाजातील विद्यार्थ्यांसाठी पंडीत दीनदयाळ उपाध्यय स्वयंम योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तात्काळ अर्ज सादर करावेत, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण, सांगली चे सहाय्यक संचालक अमित घवले यांनी केले आहे. या योजनेअंतर्गत भोजन, निवास व इतर शैक्षणिक साहित्य उपलब्ध करुन घेण्यासाठी महानगरपालिका क्षेत्रात उच्च शिक्षण घेणाऱ्या धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांना रक्कम 43 हजार रुपये रक्कम लाभ म्हणून वितरीत केली जाणार आहे. पालकाचे उत्पन्न 2 लाख 50 हजार रुपये पेक्षा कमी असणाऱ्या व योजनेच्या अटी शर्ती पूर्ण करणाऱ्या धनगर समाजातील विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेण्याकामी तात्काळ अर्ज सादर करावेत. या योजनेचे अर्ज व अधिक माहितीसाठी सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण यांचे कार्यालय सांगली डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन जुना बुधगाव रोड, सांगली येथे संपर्क साधावा, असे आवाहनही श्री. घवले यांनी केले आहे. 000000

मंगळवार, १८ जून, २०२४

वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी सक्षमपणे काम करून पर्यावरण व निसर्गाची उत्तम प्रकारे सेवा करावी - मुख्य वनसंरक्षक एन. आर. प्रवीण

वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या दहाव्या प्रशिक्षण सत्राचा पासिंग आऊट व दिक्षांत समारंभ संपन्न सांगली दि. 18 (जि.मा.का.) : वनपरिक्षेत्र अधिकारी हे वन विभागाचा कणा आहेत. नवोदित अधिकाऱ्यांनी आपले काम अत्यंत सक्षमपणे व प्रमाणिकपणे करून पर्यावरण व निसर्गाची उत्तम प्रकारे सेवा करावी, अशी अपेक्षा महाराष्ट्र राज्य, पुणे चे मुख्य वनसंरक्षक (शिक्षण व प्रशिक्षण) एन. आर. प्रवीण, यांनी व्यक्त केली. कुंडल वन प्रबोधिनी येथे नवनियुक्त वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या दहाव्या प्रशिक्षण सत्राचा दिक्षांत समारंभ आज संपन्न झाला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मुख्य वनसंरक्षक (प्रा.), कोल्हापूर आर. एम. रामानुजम, कुंडल वन प्रबोधिनी चे महासंचालक जे.पी.त्रिपाठी, कांदळवन मुंबई चे उपवनसंरक्षक डॉ. शैलेद्रकुमार जाधव, उपवनसंरक्षक सांगली नीता कट्टे, प्रबोधिनीचे संचालक व सत्र संचालक भरत बाबूराव शिंदे, विभागीय वन अधिकारी सामाजिक वनीकरण प्रशांत वरुडे आदी उपस्थित होते. मुख्य वनसंरक्षक (शिक्षण व प्रशिक्षण) एन. आर. प्रवीण यांनी काम करत असताना घ्यावयाच्या दक्षतेबाबत अनेक मार्गदर्शनपर सूचना केल्या. तसेच केलेल्या कामाची नियमितपणे नोंद ठेवावी, नियमित दैनंदिनी लिहिण्याची सवय ठेवावी, असे केल्यास बदलत्या काळातील वन संरक्षण व संवर्धनाची आव्हाने सहज पेलता येतील असे त्यांनी सांगितले. मुख्य वनसंरक्षक (प्रा.), कोल्हापूर आर. एम. रामानुजम म्हणाले, अधिकारी म्हणून काम करताना अनेक अडचणी व आव्हानांचा सामना करावा लागेल. तक्रारी करत न बसता अडचणी सोडविण्याचा प्रयत्न करा. आपल्या वन परिक्षेत्रात काम करताना प्रत्येक गोष्टीत पुढाकार घेऊन तसेच अधिनस्त कर्मचाऱ्यांच्या अडचणी समजावून घेऊन त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकून त्यांना उत्तम प्रकारे काम करण्यासाठी प्रेरित करावे. अतिक्रमणांपासून वनांच्या संरक्षणासाठी वन कर्मचारी यांची टीम करून त्यांच्या समवेत वन भ्रमंती करणे गरजेचे असल्याचेही ते म्हणाले. प्रास्ताविकात प्रबोधिनीचे महासंचालक जे. पी. त्रिपाठी यांनी आपल्या भारत सरकारच्या पर्यावरण, वने व वातावरण बदल मंत्रालयाच्या अधिनस्थ संचालक, वन शिक्षण, डेहराडून यांच्याकडून आयोजित करण्यात येत असलेल्या वन परिक्षेत्र अधिकारी पदासाठीच्या या प्रशिक्षणाबाबत तसेच प्रबोधिनीमध्ये आयोजित करण्यात येत असलेल्या विविध प्रशिक्षणांबाबत माहिती दिली. ही प्रबोधिनी देशातील अग्रगण्य प्रशिक्षण संस्था असल्याचे त्यांनी नमूद केले. वनक्षेत्रपाल यांचा हरित योद्धे (Green Warriors) असा उल्लेख करून, वृक्ष लागवड, पर्यावरण रक्षण, विविध परिसंस्था व अधिवासांचे संरक्षण करून वसुंधरेचे रक्षण करण्याची जबाबदारी वनक्षेत्रपाल यांच्यावर असल्याचे त्यांनी सांगितले. प्रबोधिनीचे संचालक व या बॅचचे सत्र संचालक भरत शिंदे यांनी निकाल जाहीर केला. मान्यवरांच्या हस्ते प्रशिक्षणार्थीना प्रमाणपत्र व मानचिन्हांचे वितरण करण्यात आले.वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या या तुकडीमध्ये केरळ राज्यातील 33, पश्चिम बंगाल 6 व जम्मू काश्मीर 3 अशा एकूण 42 प्रशिक्षणार्थीना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. पश्चिम बंगाल मधील प्रशिक्षणार्थी नितीशकुमार महातो हे 83.88 टक्के गुण मिळवून सर्वप्रथम आले व सुवर्णपदकाचे मानकरी ठरले. भारत सरकारच्या पर्यावरण, वने व वातावरण बदल मंत्रालयाद्वारे कुंडल वन प्रबोधिनी येथे दि. १९ डिसेंबर २०२२ ते १८ जून २०२४ या कालावधीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या १८ महिने कालावधीच्या नवनियुक्त वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांचा दहाव्या प्रशिक्षण सत्राचा दिक्षांत समारंभ आज संपन्न झाला. तत्पूर्वी प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांच्या पासिंग आऊट परेडचे संचलन प्रबोधिनीच्या मैदानावर झाले. त्यानंतर या अधिकाऱ्यांचा स्टार ओपनिंग समारंभ संपन्न झाला. प्रातिनिधिक स्वरुपात केरळचे वनक्षेत्रपाल प्रशिक्षणार्थी टि. के. श्रीनाथ, पश्चिम बंगालची वनक्षेत्रपाल प्रशिक्षणार्थी रोनिता दास व जम्मू काश्मीरचे वनक्षेत्रपाल प्रशिक्षणार्थी सुमित कुमार यांनी मनोगत व्यक्त केले. या प्रसंगी ‘अरण्य’ (ARANYA Memoir) या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. सूत्रसंचालन निवृत्त सहायक वनसंरक्षक रामदास पुजारी, यांनी केले तर आभार संचालक भरत शिंदे यांनी मानले. या कार्यक्रमास निवृत्त उपवनसंरक्षक एम. एस. भोसले, निवृत्त सहायक वनसंरक्षक रामदास पुजारी व वनविभागाचे इतर अधिकारी तसेच केरळ, पश्चिम बंगाल व जम्मू काश्मीर या राज्यांतून मोठ्या संख्येने आलेले प्रशिक्षणार्थी, अधिकाऱ्यांचे पालक उपस्थित होते. 00000

प्रशिक्षण संस्थेच्या निवडीसाठी 30 जून पर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

सांगली दि. 18 (जि.मा.का.) : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या वतीने प्रशिक्षण संस्थेची निवड केली आणार आहे. निवडण्यात येणाऱ्या संस्थेव्दारे मातंग समाज व तत्सम 12 पोट जातीतील गरजू तरुणांना रोजगार व स्वयंरोजगाराची साधने उपलब्ध व्हावी म्हणून प्रशिक्षण दिले जाणार आहे. प्रशिक्षण घेवू इच्छिणाऱ्या संस्था चालकांनी आपला प्रस्ताव दि. 30 जून 2024 पर्यंत दोन प्रतित सादर करावा, असे आवाहन महामंडळाचे जिल्हा व्यवसापक लक्ष्मण क्षीरसागर यांनी केले आहे. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या सांगली जिल्हा कार्यालयास सन 2024-25 या आर्थिक वर्षाकरिता एकूण 500 प्रशिक्षणार्थीचे कौशल्य विकास उद्योजकता प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्दिष्ट प्राप्त झाले आहे. या महामंडळामार्फत मातंग समाज व तत्सम 12 पोटजातीतील कुटूंबाची सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक उन्नती व्हावी, त्यांना रोजगार व स्वयंरोजगाराची साधने उपलब्ध व्हावी म्हणून समाजातील गरजूनां आवश्यक त्या व्यवसायाचे प्रशिक्षण देवून त्यांना उपजिविकेचे साधन उपलब्ध होण्याकरिता प्रशिक्षण योजना राबविण्यात येत आहे. प्रशिक्षणार्थीने निवडलेल्या प्रशिक्षणाची फी कौशल्य विकास व उद्योजकता विभागाने ठरवून दिलेल्या दराप्रमाणे अदा केली जाणार आहे. प्रशिक्षणार्थीना प्रशिक्षण कालावधी पूर्ण केल्यानंतर शासनाच्या नियमानुसार आवश्यक त्या परिक्षेला बसविण्याची जबाबदारी संस्था चालकाची राहील. त्याशिवाय संस्थेची फी दिली जाणार नाही. प्रशिक्षण संस्थेला प्रशिक्षण कालावधी नुसार टप्प्या टप्प्याने प्रशिक्षण फी अदा करण्यात येईल. सांगली शहरातील डॉ. बाबासाहेब आंबडेकर सामाजिक न्याय भवन येथील साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या जिल्हा कार्यालयात प्रशिक्षण घेवू इच्छिणाऱ्या संस्था चालकांनी आपला प्रस्ताव 30 जून पर्यंत सादर करावा. सांगली जिल्ह्यातील ज्या संस्थेने कौशल्य विकास व उद्योजकता प्रशिक्षण पोर्टलवर नोंदणी केलेली आहे, त्याच संस्था आपला प्रस्ताव दाखल करू शकतील. 30 जून नंतर प्रस्ताव स्विकारले जाणार नाहीत याची संबंधितांनी नोंद घ्यावी, असे आवाहन श्री. क्षीरसागर यांनी केले आहे. प्रशिक्षणासाठी नियम व अटी पुढीलप्रमाणे -अर्जदार मातंग समाज व तत्सम १२ पोट जातीतील असावा. अर्जदार महाराष्ट्रातील रहिवासी असावा. अर्जदाराचे वय १८ ते ५० असावे. अर्जदाराने यापुर्वी शासनाच्या, महामंडळाच्या कोणत्याही प्रशिक्षण योजनेचा लाभ घेतलेला नसावा. अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न तीन लाखापेक्षा जास्त नसावे. एका कुटूंबातील एकाच व्यक्तीस या योजनेचा लाभ घेता येईल. अर्जदाराने आधारकार्ड जोडलेल्या बँक खात्याचा तपशिल सादर करावा लागेल. 00000

स्वावलंबन पोर्टलचे अपग्रेडचे काम सुरू

सांगली दि. 18 (जि.मा.का.) : पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रूग्णालयात केंद्र शासनाच्या स्वावलंबन पोर्टलव्दारे सांगली जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींना ऑनलाईन प्रमाणपत्र वितरीत करण्यात येणार आहे. तथापी, या स्वावलंबन पोर्टलचे अपग्रेड करण्याचे काम 5 मे पासून सुरू आहे. हे पोर्टल सुरू होईपर्यंत दिव्यांगांचे कोणतेही प्रमाणपत्र किंवा त्यांची नोंद पोर्टलवर होणार नाही, अशी माहिती रूग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षकांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे. 00000

जिल्हा नियोजन समितीची सभा शनिवारी

सांगली दि. 18 (जि.मा.का.) : सांगली जिल्हा नियोजन समितीची सभा राज्याचे कामगार मंत्री तथा पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या अध्यक्षतेखाली शनिवार, 22 जून 2024 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा नियोजन समिती सभागृहात आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा नियोजन अधिकारी अशोक पाटील यांनी दिली. या बैठकीत दि. 10 जानेवारी 2024 रोजी संपन्न झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या सभेचे इतिवृत्त व त्यावरील कार्यवाहीच्या अहवालास मान्यता घेणे, जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण, अनुसूचित जाती घटक कार्यक्रम व आदिवासी उपयोजनाबाह्य क्षेत्रातील योजना कार्यक्रम) सन 2023-24 अंतर्गत अंतिम सुधारीत तरतुदीस व मार्च 2024 अखेरील खर्चास मान्यता घेणे, जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण, अनुसूचित जाती घटक कार्यक्रम व आदिवासी उपायोजनाबाह्य क्षेत्रातील योजना कार्यक्रम) सन 2024-25 करिताचे नियोजन आणि अध्यक्षांच्या परवानगीने येणाऱ्या आयत्या वेळच्या विषयावर चर्चा करणे, अशी या बैठकीची विषयसूची आहे. 000000

शुक्रवार, १४ जून, २०२४

तृतीयपंथीयांसाठी 21 जून रोजी विशेष कार्यशाळा

सांगली, दि. 14, (जि. मा. का.) : तृतीयपंथीयांना ओळखपत्रे व प्रमाणपत्रे वितरीत करणे, त्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी त्यांची प्राथमिक माहिती संकलित करणे, तृतीय पंथीयांच्या हक्कांचे संरक्षण व कल्याणबाबत काही अडचणी, समस्या असल्यास त्या जाणून घेणे, या व्यक्तींच्या शासनाप्रती असणाऱ्या अपेक्षा जाणून घेण्यासाठी दि. 21 जून 2024 रोजी विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलेले आहे. ही कार्यशाळा सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण सांगली, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सामाजिक न्याय भवन, जुना बुधगांव रोड, सांगली येथे होणार असून या कार्यशाळेस जिल्ह्यातील सर्व तृतीयपंथीय व्यक्तींनी उपस्थित रहावे, असे आवाहन समाज कल्याण कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त जयंत चाचरकर यांनी केले आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून तृतीयपंथीय व्यक्तींना ओळखपत्र व प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी National Portal for Transgender Persons हे पोर्टल दि. 25 नोव्हेंबर 2020 पासून सुरू करण्यात आले आहे. transgender.dosje.gov.in या लिंकद्वारे तृतीयपंथी व्यक्ती ते कुठेही असतील तेथून अर्ज करू शकतात. या पोर्टलवरून अधिकाधिक तृतीयपंथीयांना ओळखपत्रे व प्रमाणपत्रे देण्यासाठी त्यांच्या माहितीचे संकलन करणे आवश्यक आहे. याकामी जिल्हास्तरीय तृतीयपंथीय तक्रार निवारण समितीच्या मान्यतेने सर्व्हेक्षण अर्ज मंजूर करण्यात आलेला आहे. या कार्यशाळेसाठी तृतीयंपथीय व्यक्ती यांनी त्यांचे आधारकार्ड, मतदानकार्ड, पॅनकार्ड, जन्माचा दाखला, रेशनकार्ड, पासपोर्ट, पासबुक, जातीचा दाखला, मनरेगाकार्ड , शैक्षणिक पात्रताबाबत कागदपत्रे, दिव्यांग असलेस प्रमाणपत्र इ. नमूद दस्तऐवजांची छायांकित प्रत / झेरॉक्स प्रत सोबत घेवून येणे आवश्यक असेल, असे प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे. 00000

चारधाम यात्रेसाठी नोंदणी अनिवार्

य सांगली, दि. 14, (जि. मा. का.) : धाम येथील दर्शनाची प्रक्रिया सुरळीत करण्यासाठी उत्तराखंड शासनाने चारधाम यात्रेसाठी नोंदणीची प्रक्रिया सुरू केली आहे. नोंदणी अनिवार्य असून भाविकांनी चारधाम यात्रा 2024 साठी https://registrationandtouristcare.uk.gov.in/ वर नोंदणी करणे आवश्यक आहे. ज्या तारखेसाठी भक्तांनी नोंदणी केली असेल त्या तारखेलाच धाम येथे दर्शनाची परवानगी असेल. वृद्ध आणि वैद्यकीय पार्श्वभूमी असलेल्यांनी त्यांची यात्रा सुरू करण्यापूर्वी स्वतःची वैद्यकीय तपासणी करून घ्यावी. याबरोबरच वैद्यकीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभाग, उत्तराखंड शासनाने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करावे. याबाबतच्या मार्गदर्शक सूचना https://health.uk.gov.in/pages/display/140-char-dham-yatra-health-advisory वर उपलब्ध आहेत, असे प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविण्यात आले आहे. 00000

पलूस येथील शासकीय वसतिगृहात प्रवेश प्रक्रिया सुरू

सांगली, दि. 14, (जि. मा. का.) : पलूस येथील गुणवंत मुलांचे शासकीय वसतिगृहात राज्यातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विजाभज, इतर मागासवर्गीय, विशेष मागासवर्गीय, आर्थिकदृष्ट्या मागासवर्ग, अनाथ व अपंग या सर्व प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना वसतिगृहातील रिक्त जागेवर विनामुल्य प्रवेश देण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती वसतिगृहाचे अधिक्षक मनिष पानगांवकर यांनी दिली. सन 2024-25 या शैक्षणिक वर्षात पलूस तालुका व जवळील तालुक्यात इयत्ता 11 वी, अभियांत्रिकी पदविका व व्यवसाय शिक्षण अभ्यासक्रम (आय.टी.आय) मध्ये नियमित शिक्षण घेत असलेल्या परगांवावरुन ये-जा करणाऱ्या (पलूस स्थानिक विद्यार्थी सोडून) विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह प्रवेश प्रक्रिया ऑफलाईन सुरू आहे. अशा गरीब होतकरू विद्यार्थ्यांनी फॉर्म भरण्याकरिता वसतिगृहात येऊन नोंदणी करून अर्ज घेऊन जावे, असे आवाहन वसतिगृहाचे अधिक्षक यांनी केले आहे. वसतीगृह गुणवंत मुलांचे असल्याने फक्त इयत्ता 11 वी, प्रथम वर्ष अभियांत्रिकी डिप्लोमा व अभियांत्रिकी आय.टी.आय करीता प्रवेश पात्र असेल. तसेच अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विजाभज, इतर मागासवर्गीय, विशेष मागासवर्गीय, आर्थिकदृष्या मागासवर्ग, अनाथ व अपंग या सर्व प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना इयत्ता 10 वी मध्ये किमान 55 टक्के पेक्षा जास्त गुण आवश्यक आहेत, असे वसतिगृहाचे अधिक्षक यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे. 00000

थायोमेथोक्झामच्या बिज प्रक्रियेद्वारा करा सोयाबिनवरील खोडमाशीचे व्यवस्थापन

सांगली, दि. 14, (जि. मा. का.) : किटकशास्त्र विभागाने बिज प्रक्रिया करूनच सोयाबीन पीक पेरावे या संदर्भात संदेश प्रसारीत केला होता. ज्या शेतकऱ्यांनी बिज प्रक्रिया केली तेथे खोडमाशीवा प्रादुर्भाव अल्प प्रमाणात दिसून आला. त्यामुळे हंगामाच्या सुरुवातीपासूनच या किडीच्या व्यवस्थापणासाठी बिज प्रक्रिया करूनच लागवड करावी, असे डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला किटकशास्त्र विभाग प्रमुख डॉ. डी. बी. उंदिरवाडे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे. या किडींचा प्रादुर्भाव पिकाचे रोपावस्थेपासूनच म्हणजे रोप 10 ते 15 दिवसाचे झाल्यानंतर होतो त्यामुळे त्याचा ताटाचे संख्येवर विपरीत परिणाम होऊन पीकाची दुबार पेरणीची शक्यता असते मात्र बिजप्रक्रिया केल्यास सोयाबीनचे पीक जवळपास 25 ते 30 दिवस पर्यंत या किडीस कमी प्रमाणात बळी पडते. किडीचा जीवनक्रम व नुकसानीचा प्रकार - खोड माशी लहान, चमकदार काळ्या रंगाची असून त्यांची लांबी 2 मि.मी. असते. अंड्यातून निघालेली अळी पाय नसलेली, फिक्कट पिवळ्या रंगाची २-४ मि.मी. लांब असते. ही अळी प्रथम जवळच्या पानाच्या शिरेला छिद्र करते. अळी नंतर पानाच्या देठातून झाडाचे मुख्य खोडात किंवा फांदीत प्रवेश करुन आतील भाग पोखरुन खाते. प्रादूर्भावग्रस्त खोड चिरून पाहिल्यास पांढूरक्या रंगाची अळी किंवा कोषला लसर नागमोडी भागात दिसते. खोडमाशीचा प्रादुर्भाव पिकाच्या सुरुवातीच्या अवस्थेत झाल्यास किडग्रस्त झाड वाळते व मोठ्या प्रमाणात नुकसान होते. मोठ्या रोपावर असा परिणाम दिसत नाही, परंतु अशा रोपावर खोडमाशीच्या अळीचे प्रौढमाशीला बाहेर येण्यासाठी केलेले छिद्र आढळते. खोडमाशीची अळी तसेच कोष फांद्यात, खोडात असतो. अशा किडग्रस्त रोपावरील फुलांची गळ होते व शेंगातील दाण्याचे वजन कमी होऊन उत्पादनात 16-30 टक्के घट होते. सोयाबीन पिकाची पेरणी करण्यापूर्वी बियाण्यास रासायनिक किटकनाशक थायोमेथोक्झाम 30 टक्के एफ एस (उदा. पोलोगोल्ड, स्लेअर प्रो) 10 मि.ली. / 1 कि. बियाणे बिजप्रक्रिया करूनच पेरणी करावी त्यामुळे सुरुवातीच्या 25 ते 30 दिवस सोयबीन पीक खोड माशी या किडीच्या प्रादुर्भावापासून मुक्त राहते. बिज प्रक्रिया करताना सर्वप्रथम रासायनिक बुरशीनाशकाची बिज प्रक्रिया करावी त्यानंतर रासायनिक किटकनाशकाची व सर्वात शेवटी जैविक बुरशीनाशक व जैविक संर्वधकाची बिज प्रकिया करावी. सोयाबीन पिकामधे उगवणीनंतर आठ ते दहा दिवसानंतर पिवळे चिकट सापळे लावून नियमीत खोडमाशीच्या प्रादुर्भावर लक्ष ठेवावे (25/हे.). ज्या ठिकणी काही कारणा अभावी सोयाबीन बियाण्यास थायोमेथोक्झामची बिजप्रक्रिया केली नसल्यास सोयाबीनचे पीक 15 दिवसाचे झाल्यानंतर इथियॉन 50 टक्के (उदा. गोल्डमिट 50, इथिकल, टॅफेथिऑन) 30 मि.ली. किंवा इंडोक्झाकार्ब 15.8 टक्के (उदा. इंडोगोल्ड प्लस, फेगो) 6.7 मि.ली. किंवा क्लोरॅट्रेनिप्रोल 18.5 टक्के (उदा. कोराजन, कव्हर लिक) 3.0 मि.ली. प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. या किडीच्या वाढीसाठी उष्ण तापमान जास्त आर्द्रता, भारी पाऊस व त्यानंतर कोरडे वातावरण पोषक आहे. असे वातावरण आढळल्यास शेतकऱ्यांनी आपल्या सोयाबिन पिकाचे नियमित सर्वेक्षण करून सतर्क राहून नियंत्रणाचे उपाय योजावेत, असे डॉ. डी. बी. उंदिरवाडे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे. 00000

गुरुवार, १३ जून, २०२४

जनावरांची अवैध वाहतूक होऊ नये याची दक्षता घ्यावी प्राणी क्लेष प्रतिबंधात्मक समितीच्या बैठकीतील सूचना

सांगली, दि. 13 (जि.मा.का.) :- बकरी सणानिमित्त जनावरांची कत्तल / कुर्बानी करण्यात येत असते. यावेळी महाराष्ट्र प्राणी रक्षण अधिनियमाची प्रभावी अंमलबजावणी व्हावी. कत्तलीसाठी जनावरांची अवैध वाहतूक होऊ नये यासाठी जनावराची वाहतूक करताना वाहतूक प्रमाणपत्र असल्याची खातरजमा संबधित विभागानी करावी, अशा सूचना प्राणी क्लेष प्रतिबंधात्मक समितीच्या बैठकीत देण्यात आल्या. जिल्ह्यात बकरी ईद मोठ्या उत्साहात साजरी केली जात असून या निमित्ताने महाराष्ट्र प्राणी रक्षण अधिनियमाची अंमलबजावणी व्हावी यासाठी प्राणी क्लेष प्रतिबंधात्मक समितीची बैठक दूरदृश्य प्रणालीद्वारे पार पडली. या बैठकीस जिल्हाधिकारी कार्यालयात तहसिलदार लीना खरात, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. अजयनाथ थोरे, सहायक आयुक्त डॉ. महादेव गवळी उपस्थित होते. तर बैठकीस अतिरिक्त पोलीस अधीक्षक रितू खोखर यांच्यासह जिल्ह्यातील सर्व पशू वैद्यकीय अधिकारी व संबधित विभागाचे अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते. दिनांक 17 जून 2024 रोजी बकरी ईद असून 17 ते 20 जून या कालावधीत ईद सणनिमित्त मोठ्या प्रमाणावर जनावरांची कत्तल किंवा कुर्बानी देण्यात येत असते. या कालावधीत जनावरांची मोठ्या प्रमाणावर वाहतूक होत असते. जनावरांची वाहतूक करण्यासाठी प्राणी छळ प्रतिबंधक कायदा अंतर्गत वाहतूक अधिनियम 2001 मधील नियमाप्रमाणे वाहतूक प्रमाणपत्र बंधनकारक आहे. तसेच कत्तलीसाठी जनावरांची वाहतूक होत असेल तर वाहतूक होणाऱ्या जनावरांचे वाहतूकीपूर्व स्वास्थ्य तपासणी करून विहित नमुन्यातील प्रमाणपत्र घेणे आवश्यक असल्याचे बैठकीत सांगण्यात आले. तसेच इयर टॅगिंग नसलेल्या जनावरांची वाहतूक करता येत नाही. त्यामुळे पोलीस व उप प्रादेशिक परिवहन विभागाने प्रत्येक तपासणी नाक्यावर जनावरांची वाहतूक करणाऱ्या वाहनांची तपासणी करावी व जनावरांची वाहतूक नियमाप्रमाणे होते का याची खातरजमा करावी. जनावरांची अवैध वाहतूक रोखण्यासाठी तपासणी नाक्यावर पोलीस विभागामार्फत तपासणी केली जाणार असल्याची माहिती अपर पोलीस अधीक्षक रितू खोखर यांनी बैठकीत दिली. तपासणी नाक्यावर व कत्तखान्याच्या ठिकाणी पशुसंवर्धन विभागाने त्यांच्याकडील पशुवैद्यकीय अधिकाऱ्याची नियुक्ती करावी. तसेच कत्तलखाना असलेल्या ठिकाणी महापालिका व संबधित विभागाने स्वच्छतेबाबत योग्य ती दक्षता घ्यावी, अशा सूचना त्यांनी केल्या. महाराष्ट्र प्राणी रक्षण अधिनियमानुसार गोवंशीय प्राण्यांची कत्तल करण्यास मनाई आहे. तसेच गर्भधारण केलेले म्हैसवर्गीय पशु व तीन महिन्यापेक्षा कमी वयाचे म्हैसवर्गीय पशु, सक्षम अधिकाऱ्याने कत्तल योग्य असे प्रमाणीकरण न केलेले पशु यांच्या कत्तलीस प्रतिबंध असल्याचे जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. अजयनाथ थोरे यांनी बैठकीत सांगितले. ००००००

गट-क संवर्गातील सरळसेवा भरती परीक्षा केंद्राच्या ठिकाणी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 लागू

सांगली दि. 13 (जि.मा.का.) : सांगली जिल्ह्यात दि. 16 ते 21 जून 2024 या कालावधीत जिल्हा परिषद सांगली कडील गट-क संवर्गातील 754 पदांसाठी सरळसेवा भरती परीक्षा सन-2023 जिल्ह्यातील चार परीक्षा केंद्रावर दि. 16 जून व 18 ते 21 जून 2024 रोजी सकाळी 6 ते सायंकाळी 8 या वेळेत घेण्यात येणार आहे. परीक्षा केंद्राच्या ठिकाणी शांतता व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने जिल्हादंडाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी परीक्षा केंद्राच्या ठिकाणी इमारतीपासून 100 मीटर सभोवतालच्या परिसरात परीक्षा कालावधीत फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 लागू केले असून पुढील कृत्यांना मनाई केली आहे. परीक्षा वेळेत परीक्षेसंबंधी अधिकारी / कर्मचारी व परीक्षेस येणारे विद्यार्थी तसेच त्यांचे लेखनिक वगळता इतर कोणत्याही चार किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्तींना परीक्षा केंद्राच्या ठिकाणी फिरण्यास मनाई केली आहे. एकत्रित गटागटाने फिरणे व उभा राहण्यास, तसेच परिक्षा केंद्राच्या परिसरातील झेरॉक्स मशिन, पब्लिक टेलिफोन बुथ, फॅक्स मशिन, ध्वनीक्षेपक यांचा परिक्षा संदर्भात कोणत्याही गैरप्रकारासाठी वापरण्यास मनाई केली असून परिक्षा केंद्रात विद्यार्थी तसेच त्यांचे लेखनिक यांना मोबाईल, पेजर, ब्लूटूथ, वायफाय डिव्हाईस, डिजिटल कॅमेरा, स्मार्ट वॉच, इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस व डिजिटल डिव्हाईस इत्यादी नेण्यास मनाई केली आहे. ही परीक्षा पद्मभूषण वसंतरावदादा पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी, सांगली-तासगाव रोड, बुधगाव, टेकवेअर टेक्नोलॉजी, विठ्ठल पाटील पॉलीटेक्निक इनामधामनी, सांगली, नानासाहेब महाडिक कॉलेज ऑफ इंजिनियरिंग पेठ, पेठ नाका ता. वाळवा व वसंतदादा पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज ॲन्ड रिसर्च, भारती विद्यापीठ जवळ, सांगली-मिरज रोड वान्लेसवाडी, सांगली या महाविद्यालयाच्या ठिकाणी होणार आहे. हा आदेश कायदेशिर कर्तव्य बजावित असलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना व धार्मिक विधी यांना लागू राहणार नाही, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी जारी केले आहेत. 00000

मका पिकावरील लष्करी अळी व्यवस्थापनासाठी बीज प्रक्रिया महत्वाची

मका पिकावरील लष्करी अळी व्यवस्थापनासाठी बीज प्रक्रिया महत्वाची - डॉ. डी. बी. उंदिरवाडे सांगली दि. 13 (जि.मा.का.) : मागील काही हंगामापासून मका पिकावर फॉल आर्मीवर्म या लष्करी अळीचा प्रादुर्भाव होत आहे. मका पिकाची पेरणी ही बीज प्रक्रिया करूनच केल्यास सुरूवातीपासूनच या किडीच्या प्रादुर्भावास अटकाव करता येईल व याचा फायदा शेतकऱ्यांना होईल. शेतकऱ्यांनी बीज प्रक्रिया करून व शेताचे नियमित सर्वेक्षण करून या किडीचा बंदोबस्त करावा, असे आवाहन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कीटकशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख डॉ. डी. बी. उंदिरवाडे यांनी केले असल्याचे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी विवेक कुंभार यांनी कळविले आहे. मका पिकावरील किडीचे व्यवस्थापना स्वच्छता मोहिम राबवावी व शिफारशीच्या मात्रेच खत द्यावे, नत्र खताचा अतिरीक्त वापर करू नये. लवकर पक्व होणाऱ्या वाणाची निवड करून लवकर पेरणी करावी व याचा गाव किंवा विभागीय पातळीवर अवलंब करावा. मका बियाण्यास सायंट्रेनिलीप्रोल 19.8 + थायोमेथोक्झाम 19.8 टक्के एफएस 2.38 मिली प्रति किलो या प्रमाणे बीजप्रक्रिया करावी. पिकाच्या सुरवातीच्या अवस्थेत एकरी 20 या प्रमाणे पक्षी थांबे उभारावे (30 दिवसापर्यंत). मका +उडीद/मूग/तूर आंतर पीक घ्यावे. मका पिका सभोवताल सापळा पीक म्हणून हायब्रीड नेपीयरच्या 3 ते 4 ओळी पेराव्या व त्यावर प्रादूर्भाव दिसताच शिफारशीनुसार कीटकनाशकाची फवारणी करावी. पतंगाची संख्या 3 पतंग / कामगंध सापळा या प्रमाणात आढळताच ट्रायकोग्रामा प्रेटीओसम, टेलेमोनस रेमंस या परोपजीवी किटकांचे दर आठवड्याने एकरी 50 हजार अंडी याप्रमाणे शेतात सोडावे. त्यानंतर 3 ते 4 दिवसापर्यंत रासायनिक कीटकनाशकाची फवारणी करू नये. पिकाच्या सुरूवातीच्या अवस्थेत पानावरील समुहात दिलेली अंडी किंवा अळ्यांचा समुह असलेली प्रादूर्भाव ग्रस्तपाने (पांढरे चट्टे असलेली) अंडी / अळ्यांसहीत नष्ट करावी. प्रादूर्भाव दिसताच प्रादूर्भावग्रस्त पोंग्यामधे सुकलेली वाळू टाकावी. पतंग मोठ्या प्रमाणावर नष्ट करण्यासाठी कामगंध सापळ्यांचा एकरी पंधरा या प्रमाणे वापर करावा. सापळे पिकाच्या घेराच्या उंचीबरोबर प्राधान्याने सुरूवातीच्या पोंगे अवस्थेत लावावे. उगवणीनंतर 10 ते 15 दिवसांनी या अळीचा प्रादुर्भाव सुरू होतो. सुरवातीस पानातील हरीत लवक खावून पानावर पांढरे लांबट पट्टे/ रेषा किंवा ठिपके दिसतात त्याच वेळी जैविक कीटकनाशकांची फवारणी करावी. बॅसीलस थूरीजीअसीस व कुर्सटाकी 20 ग्रॅम / 10 ली. पाणी किंवा 400 गॅम / एकर या प्रमाणे फवारणी करावी. अंड्याची उबवण क्षमता कमी करण्यासाठी व सुक्ष्म अळ्यांच्या नियंत्रणासाठी 5 टक्के प्रादुर्भाव असल्यास 5 टक्के निंबोळी अर्क किंवा ॲझाडिरेक्टीन 1500 पीपीएम, 50 मिली प्रति 10 लिटर या प्रमाणे फवारावे. रोपे ते सुरूवातीची पोंगे अवस्था (उगवणी नंतर 3 ते 4 आठवड्यांनी) : 5 टक्के प्रादुर्भाव ग्रस्त झाडे आढळल्यास फवारणी करावी. मध्यम उशिरा पोंगे अवस्था (उगवणी नंतर 5 ते 7 आठवड्यांनी) : मध्यम पोंगे अवस्थेमध्ये 10 टक्के पोंगयामध्ये प्रादुर्भाव तर उशिरा पोंगे अवस्थेमध्ये 20 टक्के पोंग्यामध्ये प्रादुर्भाव आढळल्यास फवारणी करावी. गोंडा ते रेशीम अवस्था (उगवणी नंतर 8 आठवड्यांनी) : फवारणीची गरज नाही परंतु 10 टक्के कणसामधे प्रादुर्भाव आढळल्यास फवारणी करावी. ज्या शेतकऱ्यांनी बीजप्रक्रिया केली नसल्यास त्यांनी या किडीला व्यवस्थापनाकरीता उगवणीनंतर 12 ते 15 दिवसांनी फवारणीसाठी क्लोरॅन्ट्रनिलीप्रोल 9.3 टक्के प्रवाही + ल्यँब्डा सायहेलोथ्रिन 4.6 टक्के झेडसी प्रवाही 5 मिली किंवा स्पिनेटोराम 11.7 टक्के एससी प्रवाही, 5.12 मिली किंवा क्लोरॅन्ट्रनिलीप्रोल 18.5 टक्के प्रवाही एससी, 4.32 मि.ली. किंवा इमामेक्टीन बेंन्झोएट 5 टक्के एसजी, 8 ग्रॅम किंवा इमामेक्टीन बेंझोएट 5 टक्के + ल्युफेनुरॉन 40 टक्के डब्ल्युजी, 1.6 ग्रॅम किंवा थायोडिकार्ब 75 टक्के डब्ल्युजी, 20 ग्रॅम किंवा नोव्हाल्युरॉन 5.25 टक्के + इमामेक्टीन बेंन्झोएट 0.9 टक्के प्रवाही एससी, 30 मिली प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. चाऱ्यासाठी घेतलेल्या मका पिकावर कुठल्याही प्रकारच्या रासायनिक कीटकनाशकाची फवारणी करू नये. त्याऐवजी जैविक कीटकनाशकाचा वापर करावा. 00000

पुनर्रचित हवामान आधारीत फळपीक विमा योजनेत सहभागी होण्याचे शेतकऱ्यांना आवाहन

सांगली दि. 13 (जि.मा.का.) : प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत पुनर्रचित हवामान आधारीत फळपीक विमा (मृग बहार) 2024-25 या योजनेची अंमलबजावणी बजाज जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, पुणेमार्फत जिल्ह्यात करण्यात येत आहे. या योजनेत कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी विवेक कुंभार यांनी केले आहे. या योजनेत सहभागासाठी द्राक्ष- (क), पेरु, लिंबू या फळपिकासाठी 25 जून 2024, चिकू या फळपिकासाठी 30 जून 2024, डाळिंब या पिकासाठी 14 जुलै 2024 आणि सिताफळ या फळपिकासाठी 31 जुलै 2024 अशी अंतिम मुदत आहे. ही योजना शासन निर्णयातील अधिसूचित केलेल्या क्षेत्रातील अधिसूचित फळपिकांसाठी लागू राहील. कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित फळपिकांसाठी ऐच्छिक आहे. अधिसूचित केलेल्या क्षेत्रातील अधिसूचित फळपिकांसाठी खातेदारांचे व्यतिरिक्त कुळाने अगर भाडेपट्टीने शेती करणारे या योजनेत भाग घेण्यास पात्र आहेत. मात्र भाडेपट्टी शेती करणारास नोंदणीकृत (रजिस्टर्ड) भाडेकरार पीक विमा संकेतस्थळावर अपलोड करणे बंधनकारक आहे. या योजनेचा लाभ जास्तीत जास्त शेतकऱ्यांना घेता यावा यासाठी जमीन भूधारणेच्या मर्यादेत एका शेतकऱ्यास अधिसूचित फळपिकासाठी कमीत कमी 0.20 हे. अशी मर्यादा राहील तसेच जास्तीत जास्त 4.00 हेक्टर क्षेत्र मर्यादेपर्यंत विमा नोंदणी करता येईल. अधिसूचित फळपिकांपैकी एका फळपिकासाठी एका वर्षात एकाच क्षेत्रावर मृग अथवा अंबिया बहारापैकी कोणत्याही एकाच बहाराकरीता विमा संरक्षणासाठी अर्ज करता येईल. (उदा. डाळींब व द्राक्ष). केवळ उत्पादनक्षम फळबागांनाच विमा संरक्षणाचे कवच लागू राहाणार आहे. उत्पादनक्षम अधिसूचित वय डाळींब व द्राक्ष 2 वर्ष, पेरु व सीताफळ 3 वर्ष, लिंबू 4 वर्ष, व चिकू 5 वर्ष असून या पेक्षा कमी वयाच्या फळबागा लागवडीस विमा संरक्षण घेतल्याचे निदर्शनास आल्यास विमा संरक्षण संपुष्टात येईल. या योजनेंतर्गत केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार केंद्र शासनाने त्यांचा विमा हप्ता 30 टक्के दरापर्यंत मर्यादित केलेला आहे. त्यामुळे 30 टक्के वरील विमा हप्ता राज्य शासन व शेतकरी यांनी स्वीकारणे क्रमप्राप्त आहे. या योजनेंतर्गत 30 ते 35 टक्के पर्यंतचे अतिरिक्त 5 टक्के विमा हप्ता दायित्व राज्य शासनाने स्वीकारले असून 35 टक्केवरील विमा हप्ता राज्य शासन व शेतकरी यांनी 50:50 टक्के प्रमाणे भरावयाचा आहे. अधिसूचित फळपिके, विमा संरक्षित रक्कम प्रती हेक्टरी, विमा हप्त्यात शेतकरी हिस्सा प्रती हेक्टरी , समाविष्ट धोके व विमा संरक्षण कालावधी पुढीलप्रमाणे- चिकू पिकासाठी विमा संरक्षित रक्कम प्रती हेक्टरी 70 हजार रुपये, विमा हप्त्यात शेतकरी हिस्सा प्रती हेक्टरी 3 हजार 500 रुपये असून जादा आद्रता व जास्त पाऊस हे समाविष्ट धोके तर विमा संरक्षण कालावधी 01 जुलै ते 30 सप्टेंबर असा आहे. द्राक्ष-(क)पिकासाठी विमा संरक्षित रक्कम प्रती हेक्टरी 3 लाख 80 हजार रुपये, विमा हप्त्यात शेतकरी हिस्सा प्रती हेक्टरी 19 हजार रुपये असून पाऊस, आद्रता व किमान तापमान हे समाविष्ट धोके तर विमा संरक्षण कालावधी 15 जून ते 15 नोव्हेंबर असा आहे. डाळिंब पिकासाठी विमा संरक्षित रक्कम प्रती हेक्टरी 1 लाख 60 हजार रुपये, विमा हप्त्यात शेतकरी हिस्सा प्रती हेक्टरी 8 हजार रुपये असून पाऊसाचा खंड या धोक्यासाठी विमा संरक्षण कालावधी 15 जुलै ते 15 ऑक्टोबर तर जास्त पाऊस या धोक्यासाठी 16 ऑक्टोबर ते 31 डिसेंबर हा विमा संरक्षण कालावधी आहे. लिंबू पिकासाठी विमा संरक्षित रक्कम प्रती हेक्टरी 80 हजार रुपये, विमा हप्त्यात शेतकरी हिस्सा प्रती हेक्टरी 4 हजार रुपये असून कमी पाऊस या धोक्यासाठी विमा संरक्षण कालावधी 15 जून ते 15 जुलै तर पावसाचा खंड या धोक्यासाठी 16 जुलै ते 15 ऑगस्ट हा विमा संरक्षण कालावधी आहे. पेरु पिकासाठी विमा संरक्षित रक्कम प्रती हेक्टरी 70 हजार रुपये, विमा हप्त्यात शेतकरी हिस्सा प्रती हेक्टरी 3 हजार 500 रुपये असून कमी पाऊस या धोक्यासाठी विमा संरक्षण कालावधी 15 जून ते 14 जुलै तर पावसाचा खंड व जास्त तापमान या धोक्यासाठी 15 जुलै ते 15 ऑगस्ट हा विमा संरक्षण कालावधी आहे. सिताफळ पिकासाठी विमा संरक्षित रक्कम प्रती हेक्टरी 70 हजार रुपये, विमा हप्त्यात शेतकरी हिस्सा प्रती हेक्टरी 3 हजार 500 रुपये असून पावसाचा खंड या धोक्यासाठी विमा संरक्षण कालावधी 1 ऑगस्ट ते 30 सप्टेंबर तर जास्त पाऊस या धोक्यासाठी 1 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर हा विमा संरक्षण कालावधी आहे. या योजनेमध्ये पीक निहाय अधिसूचित महसूल मंडळाची संख्या पुढील प्रमाणे आहे. द्राक्ष- (क) पिकासाठी-50, डाळींब पिकासाठी -18, लिंबू पिकासाठी-2, पेरु पिकासाठी- 20, सिताफळ पिकासाठी- 13 व चिकू पिकासाठी-4. या योजनेत शेतकऱ्यांचा सहभाग ऐच्छिक असल्याने अधिसूचित क्षेत्रातील सहभागी होऊ इच्छिणाऱ्या कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी आपले बँक खाते असणाऱ्या जवळच्या प्राधिकृत बँका / प्राथमिक कृषि पतपुरवठा सहकारी संस्था/ संबधित विमा कंपनीची कार्यालये किंवा विमा प्रतिनिधीशी संपर्क साधून विमा प्रस्ताव विहीत प्रपत्रात योग्य त्या विमा हप्त्यासह, 7/12 खाते उतारा / आधार कार्ड / आधार नोंदणी प्रत / बँक खात्याचे पासबुक प्रत, स्वयंघोषणापत्र (सह्पत्र ४), बागेबाबत अक्षांश-रेखांश सह छायाचित्र (Geo Tagging), भाडेपट्टा करार असलेल्या शेतकऱ्यांचे करारपत्र इत्यादी कागदपत्रासह विहीत वेळेत जमा करावे. बिगर कर्जदार फळपिक उत्पादक शेतकरी यांनी बँकेतील गर्दी टाळण्यासाठी प्राधिकृत आपले सरकार सेवा केंद्राशी संपर्क करुन सहभाग नोंदवावा. या योजनेंतर्गत विहीत मुदतीत नुकसान भरपाई देण्याची जबाबदारी व दायित्व विमा कंपन्याची असून नुकसान भरपाई देण्याची कोणतेही दायित्व शासनावर नाही. योजनेच्या अधिक माहितीसाठी नजिकच्या तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे. 0000000

बुधवार, १२ जून, २०२४

जिल्ह्यातील सर्व कॅफे शॉपसाठी नियमावली जारी आदेशाप्रमाणे आस्थापनांमध्ये बदल करण्यासाठी 22 जून पर्यंत मुदत

जिल्ह्यातील सर्व कॅफे शॉपसाठी नियमावली जारी आदेशाप्रमाणे आस्थापनांमध्ये बदल करण्यासाठी 22 जून पर्यंत मुदत सांगली दि. 12 (जि.मा.का.) : सांगली जिल्ह्यातील सर्व कॅफे शॉप (कॉफी कॅफे/हॉटेल), अशा तत्सम आस्थापनांना नियमावली घालून देण्यात आली असून या नियमावलीचे पालन करणे बंधनकारक असल्याचे आदेश जिल्हादंडाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार जारी केले आहेत. आदेशाप्रमाणे संबंधित आस्थापनांमध्ये योग्य ते बदल करण्यासाठी संबंधित आस्थापना यांना दिनांक 22 जून 2024 पर्यंत मुदत देण्यात आली असल्याचे आदेशात म्हटले आहे. जिल्ह्यातील सर्व कॅफे शॉप (कॉफी कॅफे/हॉटेल), अशा तत्सम आस्थापनांना पुढीलप्रमाणे नियमावलीचे पालन करणे बंधनकारक असल्याचे आदेशात म्हटले आहे. कॅफे शॉपमधील पूर्ण बैठक व्यवस्था सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या कक्षेत यावी अशी सीसीटीव्ही यंत्रणा कॅफे शॉप (कॉफी कॅफे/ हॉटेल) मध्ये बसवणे बंधनकारक आहे. कॅफे शॉप (कॉफी कॅफे/ हॉटेल) मधील सर्व दरवाजे पारदर्शक काचेचे असावेत, दोन्ही बाजूस बसलेले लोक एकमेकांचे सहज दृष्टीस पडतील असे असावेत, सर्व बैठक व्यवस्था स्पष्ट दिसेल अशी प्रकाश योजना असावी, अंतर्गत बंदिस्त कंपार्टमेंट करण्यात येऊ नयेत, कॅफे शॉप (कॉफी कॅफे/ हॉटेल) मध्ये सक्षम प्राधिकाऱ्यासाठी भेट पुस्तिका (व्हिजिट बुक) ठेवावी, कॅफे शॉप (कॉफी कॅफे/ हॉटेल) मध्ये (डेक, डॉल्बी इतर) ध्वनीक्षेपण व्यवस्था, ध्वनी प्रदुषण नियमांचे उल्लंघन करणारी नसावी, कॅफे शॉप (कॉफी कॅफे/ हॉटेल) मध्ये धुम्रपान करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. कॅफे शॉप (कॉफी कॅफे/ हॉटेल) मध्ये शासनाने ठरवून दिलेल्या वेळेतच चालू राहतील याची काटेकोरपणे काळजी घ्यावी, असे आदेशात म्हटले आहे. या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी जिल्ह्यातील पोलीस प्रशासन हे सक्षम प्राधिकारी असतील. या नियमावली प्रमाणे तपासणीचे अधिकार पोलीस उपनिरीक्षक व त्यापेक्षा वरिष्ठ दर्जाचे अधिकारी यांना असतील. हा आदेश दिनांक 23 जून 2024 रोजीचे 00.01 वाजल्यापासून ते दि. 22 ऑगस्ट 2024 रोजीचे 23.59 वाजेपर्यंत अंमलात राहील, असे आदेश जिल्हादंडाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी जारी केले आहेत. 00000

गट-क संवर्गातील सरळसेवा भरती परीक्षा केंद्राच्या ठिकाणी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 लागू

सांगली दि. 12 (जि.मा.का.) : सांगली जिल्ह्यात दि. 13 ते 15 जून 2024 या कालावधीत जिल्हा परिषद सांगली कडील गट-क संवर्गातील 754 पदांसाठी सरळसेवा भरती परीक्षा सन-2023 जिल्ह्यातील चार परीक्षा केंद्रावर घेण्यात येणार आहे. परीक्षा केंद्राच्या ठिकाणी शांतता व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने जिल्हादंडाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी परीक्षा केंद्राच्या ठिकाणी इमारतीपासून 100 मीटर सभोवतालच्या परिसरात परीक्षा कालावधीत फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 लागू केले असून पुढील कृत्यांना मनाई केली आहे. परीक्षा वेळेत परीक्षेसंबंधी अधिकारी / कर्मचारी व परीक्षेस येणारे विद्यार्थी तसेच त्यांचे लेखनिक वगळता इतर कोणत्याही चार किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्तींना परीक्षा केंद्राच्या ठिकाणी फिरण्यास मनाई केली आहे. एकत्रित गटागटाने फिरणे व उभा राहण्यास, तसेच परिक्षा केंद्राच्या परिसरातील झेरॉक्स मशिन, पब्लिक टेलिफोन बुथ, फॅक्स मशिन, ध्वनीक्षेपक यांचा परिक्षा संदर्भात कोणत्याही गैरप्रकारासाठी वापरण्यास मनाई केली असून परिक्षा केंद्रात विद्यार्थी तसेच त्यांचे लेखनिक यांना मोबाईल, पेजर, ब्लूटूथ, वायफाय डिव्हाईस, डिजिटल कॅमेरा, स्मार्ट वॉच, इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस व डिजिटल डिव्हाईस इत्यादी नेण्यास मनाई केली आहे. ही परीक्षा पद्मभूषण वसंतरावदादा पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी, सांगली-तासगाव रोड, बुधगाव, टेकवेअर टेक्नोलॉजी, विठ्ठल पाटील पॉलीटेक्निक इनामधामनी, सांगली व नानासाहेब महाडिक कॉलेज ऑफ इंजिनियरिंग पेठ, पेठ नाका ता. वाळवा या महाविद्यालयाच्या ठिकाणी दिनांक 13 जून 2024 रोजी सकाळी 6 ते दुपारी 4 व दि. 15 जून 2024 रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 8 या वेळेत तर वसंतदादा पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज ॲन्ड रिसर्च, भारती विद्यापीठ जवळ, सांगली-मिरज रोड वान्लेसवाडी, सांगली या महाविद्यालयाच्या ठिकाणी दि. 13 ते 15 जून 2024 रोजी सकाळी 6 ते सायंकाळी 8 या वेळेत होणार आहे. हा आदेश कायदेशिर कर्तव्य बजावित असलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना व धार्मिक विधी यांना लागू राहणार नाही, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी जारी केले आहेत. 00000
जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन 18 जूनला सांगली, दि. 12, (जि. मा. का.) : तालुका, जिल्हा, विभागीय व मंत्रालयीन स्तरावर महिला लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. प्रत्येक महिन्याच्या चौथ्या सोमवारी तालुकास्तरीय महिला लोकशाही दिन तर प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन आयोजित करण्यात येतो. माहे जून महिन्यातील तिसऱ्या सोमवारी दि. 17 जून रोजी बकरी ईदची सार्वजनिक सुट्टी असल्याने माहे जून महिन्याचा जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन मंगळवार, 18 जून 2024 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय सांगली येथे आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी संदीप यादव यांनी दिली. समस्याग्रस्त व पिडीत महिलांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ मिळावे, तसेच त्यांच्या हक्काचे संरक्षण होवून न्याय मिळावा या दृष्टीने महिलांच्या तक्रारी, अडचणी यांची शासकीय यंत्रणेकडून सोडवणूक करण्यासाठी व समाजातील पिडीत महिलांना सुलभ मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी एक प्रभावी उपाययोजना म्हणून महिला लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. महिलांनी आपल्या तक्रारी, अडचणी शासकीय यंत्रणेकडून सोडवणूक कराव्यात. न्यायप्रविष्ठ प्रकरणे, सेवा व आस्थापना विषयक बाबी, सामुहिक स्वरूपाचे तक्रार अर्ज स्वीकारले जाणार नाहीत याची नोंद घ्यावी, असे आवाहन श्री. यादव यांनी केले आहे. 00000

मातोश्री शासकीय आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय वसतिगृहामध्ये प्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन

सांगली, दि. 12 (जि.मा.का.) :- मातोश्री शासकीय आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय वसतिगृहामध्ये सन 2024-25 या वर्षात 80 विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार प्रवेश देण्यात येणार आहे. वसतिगृहात प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांच्या निवासाची व भोजनाची मोफत सुविधा असून पात्र व इच्छुक विद्यार्थ्यांनी 30 जून पर्यंत वसतिगृहामध्ये प्रवेशासाठी अर्ज करावेत, असे आवाहन वसतिगृहाचे प्रमुख ना.ना. वाघमारे यांनी केले आहे. उच्च व तंत्र शिक्षण विभागामार्फत चालविण्यात येत असलेले हे वसतिगृह कासेगाव एज्युकेशन सोसायटी संचलित, राजारामबापू इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी सांगली येथील मिरा हौसिंग सोसायटी, माधवनगर रोड, सांगली येथे कार्यरत आहे. वसतिगृहात 8 वी ते 10 वी विद्यार्थ्यांसाठी 20 जागा, 11 वी व 12 वी विद्यार्थ्यांसाठी 30 जागा व महाविद्यालयीन विभागातील B.A., BCom आणि BSc च्या विद्यार्थ्यांसाठी 30 जागा आहेत. प्रवेशासाठी 3 जून पासून अर्ज वाटप सुरू असून 30 जून पर्यंत अर्ज स्वीकारले जाणार आहेत. विहीत नमुन्यातील भरलेला प्रवेश अर्ज (शाळा, महाविद्यालयामध्ये प्रवेशाबाबत प्राचार्यांच्या प्रमाणपत्रासह), सन 2023-24 या आर्थिक वर्षातील तहसिलदार यांच्याकडील रूपये एक लाख रूपये पर्यंतच्या उत्पन्नाच्या दाखल्याची मूळ प्रत, मागील परीक्षा उत्तीण गुण पत्रकाची सत्यप्रत, पोलीस पाटील यांच्याकडील वर्तुणुकीच्या दाखल्याची मूळ प्रत, गाव कामगार तलाठी यांच्याकडील रहिवासी दाखला मूळ प्रत, मागासवर्गीय असल्यास जातीच्या दाखल्याची सत्य प्रत आणि पासपोर्ट आकाराचे दोन फोटो या कागदपत्रासह अर्ज वसतिगृहामध्ये (शासकीय सुट्टी खेरीज) अर्ज करावा, असे वसतिगृह प्रमुख यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे. 00000

सैनिक मुलां-मुलींचे वसतिगृहात प्रवेशासाठी 25 जून पर्यंत अर्ज करा

सांगली, दि. 12 (जि.मा.का.) :- सैनिक मुलां-मुलींचे वसतिगृह सांगली येथे शैक्षणिक वर्ष 2024-25 करीता सेवारत सैनिक, माजी सैनिक, विधवा, सिव्हीलियन यांच्या उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलां-मुलींना गुणवत्तेच्या आधारावर सवलतीच्या दरात प्रवेश देण्यात येणार आहे. इच्छुकांनी संबंधित वसतिगृहातून प्रवेश अर्ज प्राप्त करून परिपूर्ण भरलेले अर्ज आवश्यक कागदपत्रासह दिनांक 25 जून 2024 पर्यंत जमा करावेत, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले. कर्नल डॉ. भिमसेन चवदार (निवृत्त) यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय सांगली दुरध्वनी क्रमांक 0233-2990712, अधिक्षक सैनिकी मुलांचे वसतिगृह सांगली दुरध्वनी क्रमांक 9419290797, अधिक्षिका सैनिकी मुलींचे वसतिगृह सांगली दुरध्वनी क्रमांक 8888503873 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहनही डॉ. चवदार यांनी केले आहे. 00000

आपत्कालीन परिस्थितीत सर्व यंत्रणांनी दक्ष रहावे - जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी

सांगली, दि. 12, (जि. मा. का.) : यंदा हवामान विभागाने 100 टक्के पावसाचा अंदाज वर्तविला आहे. या परिस्थितीत संबंधित यंत्रणांनी आपत्कालीन परिस्थितीत दक्ष रहावे. तसेच त्यांच्यावर सोपविण्यात आलेली जबाबदारी अचूकपणे पार पाडावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी आज दिले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात मान्सून तयारी आढावा बैठक पार पडली. यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी महानगरपालिका आयुक्त शुभम गुप्ता, अपर पोलीस अधीक्षक रितू खोखर, जिल्हा पुरवठा अधिकारी आशिष बारकुल, मिरज उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे, तहसिलदार अर्पणा मोरे, लिना खरात, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी रफिक नदाफ आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी म्हणाले, महानगरपालिका व नगरपालिका क्षेत्रातील नाले व गटार सफाई तात्काळ करून त्यामधील गाळाची योग्य विल्हेवाट लावावी. नागरिकांना दुषित पाणी मिळणार नाही याची दक्षता घ्यावी. त्याचबरोबर आवश्यक त्या ठिकाणी फॉगींग करावे. सार्वजनिक बांधकाम विभागाने जिल्ह्यातील पाण्याखाली जाणाऱ्या रस्त्यांची माहिती एस.टी. व उपप्रादेशिक परिवहन विभागाला त्वरीत द्यावी. त्याचबरोबर महसूल प्रशासन, पोलीस, जिल्हा परिषद व सार्वजनिक बांधकाम विभागाने नागरिकांसाठी उभारण्यात आलेल्या तात्पुरत्या निवारा केंद्राची पाहणी संयुक्तरित्या करावी. आपत्ती निवारण कामामध्ये एन.डी.आर.एफ.च्या जवानांसह पोलीस तसेच सेवाभावी संस्थांचा सहभाग घ्यावा. पूरपरिस्थितीत वॉटर रिसोर्सेसची तपासणी करत असताना त्यामध्ये क्लोरीनचे प्रमाण योग्य राहील याची दक्षता संबंधित विभागाने घ्यावी. तात्पुरत्या निवारा केंद्रासाठी जिल्ह्यातील मोठ्या मंगल कार्यालयांची यादी तयार करण्यात यावी, असे निर्देशही जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी यावेळी दिले. तर शहरातील धोकादायक इमारतीवर महानगरपालिकेने मोठ्या प्रमाणावर कार्यवाही केल्याची माहिती मनपा आयुक्त शुभम गुप्ता यांनी यावेळी दिली. प्रारंभी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी रफिक नदाफ यांनी जिल्ह्यातील 13 मंडळामध्ये 65 मि.मी. पेक्षा अधिक पाऊस झाला असल्याची माहिती दिली. तसेच जिल्ह्यात कोठेही जिवीत हानी झाली नसल्याचे सांगितले. या बैठकीसाठी संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. 00000

शनिवार, १ जून, २०२४

समतानगर रेल्वे गेट ते कृपामाई ब्रिज रस्त्यावर मनाई आदेश जारी

सांगली दि. 1 (जि.मा.का.) :- 44-सांगली लोकसभा मतदार संघात झालेल्या मतदानाची मतमोजीणी 4 जून 2024 रोजी सेंट्रल वेअर हाऊस मिरज येथे होणार आहे. मतमोजणीच्या दिवशी निकाल ऐकण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरीक येण्याची शक्यता आहे. मतमोजणी प्रक्रिया शांततेत व सुरळीतपणे पार पडावी, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मंगळवार, 4 जून रोजी सकाळी 5 ते मतमोजणी संपेपर्यंतच्या कालावधीसाठी सेंट्रल वेअर हाऊसचे मुख्य गेट समोरील समतानगर रेल्वे गेट ते कृपामाई ब्रिजकडे येणाऱ्या व जाणाऱ्या रस्त्यावर पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 34 अन्वये मनाई आदेश जारी केले आहेत. या आदेशानुसार सेंट्रल वेअर हाऊसचे मुख्य गेट समोरील समतानगर रेल्वे गेट ते कृपामाई ब्रिजकडे येणाऱ्या व जाणाऱ्या रस्त्यावर पोलीस वाहने, ॲम्बुलन्स, फायर बिग्रेड व इतर शासकीय वाहने या खेरीज इतर सर्व प्रकारच्या वाहनांना मनाई करण्यात आली आहे. मनाई करण्यात आलेल्या मार्गास पर्यायी वाहतूक व्यवस्था करण्यात आली असून समता नगरकडून सांगलीकडे जाणाऱ्या वाहनांसाठी समतानगर- मिरज रेल्वे स्टेशन रोड-आंबेडकर उद्यान-वंटमुरे कॉर्नर पासून सांगलीकडे (परतीचा मार्ग तोच रोहील) तर कृपामाई ब्रिजकडून समतानगरकडे जाणाऱ्या वाहनांसाठी- कृपामाई ब्रिज-वंटमुरे कॉर्नर-रेल्वे स्टेशन रोड मार्गे समतानगर (परतीचा मार्ग तोच राहील). मतमोजणी दिवशी सकाळी 5 पासून मतमोजणी पूर्ण होईपर्यंत पार्किंगसाठी (१) मारुती मंदिर ते सूतगिरणीकडे जाणारे रोडचे उत्तरेस- भूमापन क्र. 926, (2) शेठ रतीलाल गोसलिया डी. एड. कॉलेजचे पूर्व बाजूचे मोकळे मैदान-भूमापन क्र. 878, (3) सुखसमृद्धी अपार्टमेंटच्या पूर्व बाजूचे मोकळे मैदान-भूमापन क्र. 919, (4) सुखसमृद्धी अपार्टमेंटच्या पश्चिम बाजूचे मोकळे मैदान-भूमापन क्र. 919 आणि (5) भोकरे कॉलेज आवारातील मोकळे मैदान अधिगृहीत केले आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर महाराष्ट्र पोलीस कायदा 1951 प्रमाणे कारवाई करण्यात येईल, असेही पोलीस अधीक्षक श्री. घुगे यांनी आदेशात नमूद केले आहे. 00000