बुधवार, १२ जून, २०२४

जिल्ह्यातील सर्व कॅफे शॉपसाठी नियमावली जारी आदेशाप्रमाणे आस्थापनांमध्ये बदल करण्यासाठी 22 जून पर्यंत मुदत

जिल्ह्यातील सर्व कॅफे शॉपसाठी नियमावली जारी आदेशाप्रमाणे आस्थापनांमध्ये बदल करण्यासाठी 22 जून पर्यंत मुदत सांगली दि. 12 (जि.मा.का.) : सांगली जिल्ह्यातील सर्व कॅफे शॉप (कॉफी कॅफे/हॉटेल), अशा तत्सम आस्थापनांना नियमावली घालून देण्यात आली असून या नियमावलीचे पालन करणे बंधनकारक असल्याचे आदेश जिल्हादंडाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार जारी केले आहेत. आदेशाप्रमाणे संबंधित आस्थापनांमध्ये योग्य ते बदल करण्यासाठी संबंधित आस्थापना यांना दिनांक 22 जून 2024 पर्यंत मुदत देण्यात आली असल्याचे आदेशात म्हटले आहे. जिल्ह्यातील सर्व कॅफे शॉप (कॉफी कॅफे/हॉटेल), अशा तत्सम आस्थापनांना पुढीलप्रमाणे नियमावलीचे पालन करणे बंधनकारक असल्याचे आदेशात म्हटले आहे. कॅफे शॉपमधील पूर्ण बैठक व्यवस्था सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या कक्षेत यावी अशी सीसीटीव्ही यंत्रणा कॅफे शॉप (कॉफी कॅफे/ हॉटेल) मध्ये बसवणे बंधनकारक आहे. कॅफे शॉप (कॉफी कॅफे/ हॉटेल) मधील सर्व दरवाजे पारदर्शक काचेचे असावेत, दोन्ही बाजूस बसलेले लोक एकमेकांचे सहज दृष्टीस पडतील असे असावेत, सर्व बैठक व्यवस्था स्पष्ट दिसेल अशी प्रकाश योजना असावी, अंतर्गत बंदिस्त कंपार्टमेंट करण्यात येऊ नयेत, कॅफे शॉप (कॉफी कॅफे/ हॉटेल) मध्ये सक्षम प्राधिकाऱ्यासाठी भेट पुस्तिका (व्हिजिट बुक) ठेवावी, कॅफे शॉप (कॉफी कॅफे/ हॉटेल) मध्ये (डेक, डॉल्बी इतर) ध्वनीक्षेपण व्यवस्था, ध्वनी प्रदुषण नियमांचे उल्लंघन करणारी नसावी, कॅफे शॉप (कॉफी कॅफे/ हॉटेल) मध्ये धुम्रपान करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. कॅफे शॉप (कॉफी कॅफे/ हॉटेल) मध्ये शासनाने ठरवून दिलेल्या वेळेतच चालू राहतील याची काटेकोरपणे काळजी घ्यावी, असे आदेशात म्हटले आहे. या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी जिल्ह्यातील पोलीस प्रशासन हे सक्षम प्राधिकारी असतील. या नियमावली प्रमाणे तपासणीचे अधिकार पोलीस उपनिरीक्षक व त्यापेक्षा वरिष्ठ दर्जाचे अधिकारी यांना असतील. हा आदेश दिनांक 23 जून 2024 रोजीचे 00.01 वाजल्यापासून ते दि. 22 ऑगस्ट 2024 रोजीचे 23.59 वाजेपर्यंत अंमलात राहील, असे आदेश जिल्हादंडाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी जारी केले आहेत. 00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा