सोमवार, २४ जून, २०२४

सर्वोच्च न्यायालयातील प्रलंबित खटले निकाली काढण्याची पक्षकारांना संधी

सांगली दि. 24 (जि.मा.का.) : नवी दिल्ली येथील सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेली खटले निकाली काढण्याची संधी पक्षकारांना उपलब्ध झाली असून ज्या पक्षकारांना प्रलंबित खटले तडजोडीद्वारे निकाली काढावयाचे असतील, अशा पक्षकारांनी सांगली जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सांगली येथे संपर्क साधावा, असे आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष पी. के. शर्मा यांनी केले आहे. नवी दिल्ली येथील सर्वोच्च न्यायालयात 29 जुलै 2024 ते 3 ऑगस्ट 2024 दरम्यान विशेष लोकअदालत सप्ताह होत आहे. या विशेष लोकअदालतीत सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेली प्रकरणे तडजोडीसाठी ठेवली जाणार आहेत. जिल्ह्यातील ज्या पक्षकारांची प्रकरणे सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहेत, ती तडजोडीने मिटावित, अशी इच्छा असणाऱ्या पक्षकारांची प्रकरणे या विशेष लोकअदालतीत ठेवता येणार आहेत. त्यासाठी सांगली जिल्हा व सत्र न्यायालयाचे प्रमुख जिल्हा न्यायाधीश पी. के. शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्वबोलणी बैठक जिल्हा विधी सेवा प्राधिकरण या ठिकाणी घेण्यात येणार आहे. संबंधीत पक्षकार प्रत्यक्ष व आभासी (Online mode) पध्दतीने यात सहभागी होऊ शकतात. तरी अशा पक्षकारांनी जिल्हा न्यायालयाच्या आवारातील जिल्हा विधी सेवा प्राधिकरण या ठिकाणी संपर्क साधावा, असे आवाहन सचिव तथा न्यायाधीश गि. ग. काबळे यांनी केले आहे. 00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा