शनिवार, २४ फेब्रुवारी, २०१८

सांगली फर्स्टमधून तरूण व युवा उद्योजकांना प्रोत्साहन - केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले

सांगली, दि. 24, (जि. मा. का.) : सांगली फर्स्ट उपक्रम विविध क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांसाठी चांगली संधी उपलब्ध करून देणारा आहे. या उपक्रमातून सांगली जिल्ह्यातील तरूणांना, युवा उद्योजकांना प्रोत्साहन मिळणार आहे. तसेच, नवीन उद्योजक निर्माण होण्यासाठी सांगली फर्स्ट उपक्रम उपयुक्त ठरेल, असा विश्वास केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज येथे केले.
वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालय येथे आयोजित सांगली फर्स्ट या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. खासदार संजय पाटील, माजी महापौर विवेक कांबळे, जगन्नाथ ठोकळे, गोपाळराजे पटवर्धन, श्रीनिवास पाटील व्यासपीठावर उपस्थित होते.
केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले म्हणाले, सांगलीचा इतिहास सहकार क्षेत्रामध्ये दिशादर्शक आहे. तसेच, उपसा सिंचन योजनांच्या माध्यमातून अनेक ठिकाणी पाण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे. सांगलीकरांमध्ये कष्ट करण्याची, धडपड करण्याची तयारी आहे. खडकाळ माळरानावर इथल्या नागरिकांनी निर्यातक्षम द्राक्षे उत्पादित केली आहेत. या पार्श्वभूमिवर सांगलीच्या औद्योगिक विकासासाठी आणि सांगलीला मॅग्नेटिक बनवण्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवणे गरजेचे आहे. जगातील उद्योग जगतातील अद्ययावत तंत्रज्ञान त्यांच्यापर्यंत पोहोचवले पाहिजे. त्यासाठी सांगली फर्स्ट उपक्रम महत्त्वाचा ठरणार आहे, असे ते म्हणाले.
खासदार संजय पाटील म्हणाले, नवनवीन संकल्पना घेऊन पुढे येणाऱ्यांसाठी, त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांना प्रोत्साहन देण्याच्या हेतूने सांगली फर्स्ट उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. औद्योगिक विकासासाठी रस्ते, रेल्वे मार्ग आणि त्यांचे दुहेरीकरण आणि अन्य मूलभूत पायाभूत सुविधा देण्याचा प्रयत्न आहे. या माध्यमातून औद्योगिक क्रांतीला गती मिळेल, अशी आशा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
प्राईड ऑफ सांगली पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. दीपक शिंदे म्हैसाळकर यांनी प्रास्ताविक केले. हे प्रदर्शन 25 फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. या प्रदर्शनात यंत्रमाग उद्योगातील तंत्रज्ञान, कृषिपूरक अन्न प्रक्रिया उद्योगातील तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि आरोग्य क्षेत्रामधील विविध स्टॉल्स सहभागी झाले आहेत. याचा लाभ घ्यावा, असे आवाहन संयोजकांतर्फे करण्यात आले आहे. यावेळी विविध शासकीय अधिकारी, मान्यवर, नागरिक, युवा वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. 


00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा